इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात

इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात

अकोला : भारतीय चलनातून काल ओघात अनेक मोठ्या नोटा बंद झाल्या आहेत. त्यात आता दोन हजाराच्या नोटीचाही समावेश होणार आहे. यापूर्वी अशा एक हजार, पाच हजार व १० हजाराची नोट भारतीय चलनातून बाद झाली आहे. या नोटा मात्र आजही संग्रालयाची शोभा वाढवत आहे. अकोल्यातील युवकाने हा लाखमोलाचा संग्रह केला आहे. (A young man's hobby in Akola is a rare note in the English monarchy)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता केलेली नोटबंदीची घोषणा सर्वांनाच आठवते. ही घोषणा आज विनोदाचा भागही बनली आहे. त्यांनी ५०० व एक हजार रुपयांची नोट बंद करून चलनात ५०० व दोन हजाराची नवीन नोट आणली होती. आता ही दोन हजाराची नोटही लवकरच चलनातून बाद होणार आहे. भारत सरकारने दोन हजाराच्या नोटीची छपाई बंद केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही नोटही लवकरच संग्रालयाची शोभा होणार आहे. भारतीय चलानातून बाद झालेली ही पहिलीच मोठी नोट नाही. यापूर्वी ४३ वर्षांआधी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी चलनातून एक हजार, पाच हजार व १० हजार रुपयांची नोटा बाद केली होती.


इंग्रजी राजवटीतील नोटा
भारतात इंग्रजांचे राज्य असताना भारतात चालणारी सर्वांत मोठी नोट १० हजार रुपयांची होती. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा नव्या सरकारने १९४९ साली १० हजार रुपयांची नोट चलनात आणली. सोबतच पाच हजार रुपयांची नोटासुद्धा चलनात आणली होती. तेव्हा या नोटांचे महत्त्व व मूल्य एवढे मोठे होते की, केवळ अती श्रीमतांजवळच या नोटा दिसत असत. सामान्य माणसाला तर या नोटांचे दर्शनसुद्धा होत नव्हते. त्या काळात पगारदार नोकर व अधिकारी यांचा पगारसुद्धा ५० रुपये ते १८०० रुपयांपर्यंतच होता. त्यामुळे त्यांच्या हातात पाच किंवा १० हजार रुपयांची नोट कधी आलीच नाही. सन १९४९ सालात सोन्याचा भाव सुद्धा केवळ ९४ रुपये तोळा एवढाच होता. त्यामुळे एक किलो सोन्याची खरेदी नऊ हजार ४०० रुपयांमध्ये होत होती. या वरून त्या काळातील १० हजार रुपयांच्या नोटीचे वजन व दबदबा लक्षात येवू शकतो.


असे बदलत गेले नोटीचे रंग
ता.१ एप्रिल १९५४ साली एक हजार रुपयांची नोट चलनात आणल्या गेली, तेव्हा ही नोट लाल रंगाची होती. त्यानंतर २५ जुलै १९७५ रोजी हिरव्या रंगाची एक हजार रुपयांची नोट चलनात आणल्या गेली. या नोटेच्या मागील बाजुस तंजावर मंदिराचे चित्र छापलेले होते. त्यानंतर २४ मार्च १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या मोठ्या रकमेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर आक्टोबर १९८७ साली ५०० रुपयांची नोट नव्या स्वरुपात छापण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर आक्टोबर २००० सालात लाल रंगाची एक हजार रुपयाची नोट पुन्हा चलनात आणल्या गेली. नंतर या दोन्ही नोटा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून बंद केल्यात.

अक्षय केला संग्रह
भारतीय चलनातून बंद झालेल्या नोटा व पुरातन काळातील नाण्यांची किंमतसुद्धा हजारो व लाखोंच्या घरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सोन्याचे नाणे (होन) आजही अस्तित्वात असून, त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांपर्यंत असल्याचीही माहिती नाणे संग्रहाक अक्षय खाडे यांनी दिली. चलनातून बाद झालेल्या नोटांचाही त्यांनी संग्रह केला आहे.

संपादन - विवेक मेतकर

A young man's hobby in Akola is a rare note in the English monarchy