अकोला - ‘तू माझे पैसे चोरलेस’ या संशयावरून एका १८ वर्षीय तरुणाला दोन आरोपींनी जबरदस्तीने फ्लॅटवर नेऊन बेदम मारहाण करत आत्महत्या केल्याचा बनाव रचण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शास्त्रीनगर येथे उघडकीस आली आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन किरण राठोड (१८) रा. कारंजा लाड, सध्या रा. राऊतवाडी, हे ९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जठारपेठ येथील अभ्यासिका बाहेर उभे असताना सार्थक भेंडे (रा. गोकुळ कॉलनी, जवाहर नगर, अकोला) व त्याचा एक अनोळखी मित्र त्यांच्या जवळ आले.
‘खूप दिवसांनी भेटला, चल फिरून येऊ’ असे म्हणत त्यांनी रोहन यांना जबरदस्तीने गाडीत बसवले आणि शास्त्रीनगर येथील फ्लॅटवर घेऊन गेले. तेथे आरोपींनी रोहन यांना दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर "तू माझ्या रूममधून पैसे चोरले" असा आरोप करत दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी, लाकडी बांबूने व कंबरेच्या पट्ट्याने अमानुष मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता, त्यांनी "तुझ्या मैत्रिणीला इथे बोलाव, नाहीतर तुला फ्लॅटवरून खाली फेकून देऊन आत्महत्या केल्याचा बनाव करू" अशी जीवघेणी धमकी दिली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे एएसआय राजेश जाधव (ब.नं. १३२३) यांच्या रिपोर्टवरून भा.ज.स. कलम ११५(२), ११८(१), ३५१(२)(३), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. युवकावर झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.