Orange
Orange 
अ‍ॅग्रो

बहुविध अन्‌ आंतरपिकांचे वैशिष्ट्य जपलेले ढवळे

गोपाल हागे

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील यादवराव केशवराव ढवळे यांनी शेतीत विविध प्रकारची प्रयोगशीलता जपली आहे. नवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादन व उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बहुविध किंवा मिश्र पीकपद्धतीचा वापर हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील यादवराव ढवळे यांची २४ एकर शेती आहे. कायम प्रयोगशीलता जपत हंगामी पिकांना फळबाग पिकांची जोड त्यांनी दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दरवर्षी होणाऱ्या शिवार फेरीत ढवळे १९९० पासून सलगपणे हजेरी लावतात. स्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही घेऊन जातात. तेथे विद्यापीठाचे नवे संशोधन, तंत्रज्ञान पाहतात. तेथील नवे वाण आणून त्याचे प्रयोग करतात. आपण केलेल्या प्रयोगांची माहिती अन्य शेतकऱ्यांना व्हावी, त्यातील तंत्र शेतकऱ्यांना कळावे, यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांत ते संवाद घडवून आणण्याचे काम करतात.  

नव्या वाणांच्या लागवडीचा छंद 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभऱ्याच्या हिरवा चाफा, गुलक १, काक-२, काक-४ हे वाण सर्वांत आधी ढवळे यांनी आपल्या शेतात लावले. त्यापासून बियाणे तयार करून त्याची स्वतः विक्रीही केली. शेतीतील प्रयोगांसाठी वडील (कै.) केशवराव ढवळे यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आहे. गुलक वाणाचे एकरी ८ ते १० क्विंटल तर काक-२ (काबुली हरभरा) वाणाचे एकरी ६ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. तुषार पद्धतीने पाणी देतात. 

साग व सीताफळ शेती 
हलक्या जमिनीत वनशेती व फळशेतीचा प्रयोग केला. यात १० बाय १० फूट अंतरावर सागाची लागवड केली. त्यात सीताफळ लावले. पंधरा वर्षे वयाच्या सागाची यावर्षी तोडणी केली. सीताफळाची झाडे उभी आहेत. सागाची विक्री नगावर केली. गोलाई व घनफूट निकषांनुसार मोठा नग २००० रुपये तर त्याहून लहान नगाची विक्री १५०० ते ६०० रुपयांपर्यंत दराने केली. त्यातून ८० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे. 

हरभरा व करडई 
पट्टा पद्धतीने सहा ओळी हरभरा व तीन ओळी करडई अशी लागवड केली. यामध्ये अंदाजे चार एकर हरभरा तर दोन एकर करडई होती. एकरी सहा क्विंटल हरभरा मिळाला. तर सहा एकरांत करडईचे २६ क्विंटल उत्पादन मिळाले.   

हळद लागवडीत सातत्य
वाशीम जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र शिरपूर भागात अधिक आहे. ढवळे २००० पासून हळदीचे पीक घेत आहेत. सेलम वाणाच्या वाळलेल्या हळदीचे एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत तर एकदा ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पीक घेताना फेरपालट हा मुद्दा त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो. एका बियाणे क्षेत्रातील कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी सखाराम वाळले यांचे मार्गदर्शन त्यांना लागवडीसाठी मिळाले. भाडेतत्त्वावर यंत्र घेऊन उकळणी आणि पॉलिशिंग करून विक्री होते.  

संत्र्याची फळबाग 
नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून २०१५ मध्ये संत्र्याची २५० कलमे आणून लागवड केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. दोन वर्षांपूर्वी नव्याने ४०० झाडांची लागवड केली आहे. ढवळे यांना वृक्ष लागवडीचाही छंद आहे. त्यातून रामफळ, चिकू, आंबा अशा विविध फळझाडांची बांधावर तसेच शेतात लागवड केली आहे. ते गुलाबापासून आंब्यापर्यंत सर्व कलमे तयार करतात. 

गव्हाच्या विविध वाणांची लागवड 
गव्हाची पेरणी एक फूट अंतरावर करतात. यामुळे फुटवे जास्त येतात व दाण्याची संख्या जास्त मिळते. परिणामी, उत्पादन वाढीत मोठा हातभार लागत आहे. मध्य प्रदेशातील चंदोशी, शरबती या वाणांचा वापर त्यांनी केला आहे. बीजोत्पादनही घेतले आहे. गव्हाची स्वच्छता करून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

सामूहिक शेततळे 
पावसाळा कमी होत असल्याने सिंचनासाठी पाणी कमी पडते आहे. यावर तोडगा म्हणून ३४ बाय ३४ मीटर व वीस फूट खोलीचे शेततळे तयार केले. सोबतच गावाजवळील शेतामधून नाला वाहतो. त्यावर कृषी विभागामार्फत सिमेंट बंधारा बांधून घेतला. यामुळे विहिरींची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. 

उन्हाळी तिळाचा प्रयोग 
अकोला येथीलच कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण असलेल्या एकेटी १०१ तिळाचे १५ ग्रॅम बियाणे २००९ मध्ये मिळवले. त्यापासून पुढे एक किलो बियाणे तयार केले. केळी पिकात ५०० ग्रॅम लागवड करून दीड क्विंटल बियाणे तयार केले. तेव्हापासून सलगपणे उन्हाळी तीळ ते घेतात. एकरी चार ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तिळाला ७००० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो. यंदा हा दर १५ हजार रुपये होता. काही वेळा २० हजार रुपये दरानेही तिळाची विक्री त्यांनी साधली आहे.

यादवराव ढवळे - ९८२३३७६८११ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT