Summer Heat
Summer Heat Sakal
फॅमिली डॉक्टर

उन्हाची झळ

सकाळ वृत्तसेवा

सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा केंद्रबिंदू आहे. दिवस-रात्र, ऋतू वगैरे निसर्गाची सर्व चक्रे तसेच वातावरणातील बदल वगैरे सर्व सूर्यावरच अवलंबून असतात.

- डॉ. मालविका तांबे

सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा केंद्रबिंदू आहे. दिवस-रात्र, ऋतू वगैरे निसर्गाची सर्व चक्रे तसेच वातावरणातील बदल वगैरे सर्व सूर्यावरच अवलंबून असतात. कुठलेही जीवनचक्र सुरू राहायला सूर्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार असतोच. परंतु कुठलीही गोष्ट चांगली असली तरी तिचे प्रमाण आपल्याला बघावेच लागते. जसे अमृत आकंठ प्यायले तर उलटी होऊ शकते किंवा विपरीत परिणाम होऊ शकतात. तसेच ग्रीष्म ऋतूत असलेला सूर्य सकाळच्या वेळी सूर्यकिरणांना सूर्यरश्मी म्हटले जाते तर दुपारच्या वेळी तोच सूर्य आग ओतू लागतो. ही उष्णता वाऱ्याबरोबर आल्यास त्याला उन्हाच्या झळा (लू) म्हटले जाते. मनुष्य हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे. म्हणजे मनुष्याच्या शरीराचे तापमान एका निश्र्चित अंशावर असले तरच त्याच्या शरीराचे काम व्यवस्थित चालू शकते.

मनुष्याच्या शरीराचे तापमान कमी वा जास्त झाले तर शरीराच्या चयापचय क्रिया बिघडू शकतात. उन्हाळा या ऋतूत बाहेरून आल्यानंतर शरीर फार गरम झाल्यामुळे मळमळ होणे, डोके दुखणे, पित्त वाढणे, मान दुखणे, चक्कर येणे, प्रचंड थकवा जाणवणे, जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे त्वचाविकार होणे, लघवीला जळजळ होणे वा लघवी अडकल्यासारखी वाटणे वगैरे त्रास होताना दिसतात. उन्हाळ्यात बाहेरच्या उष्णतेमुळे शरीरातील रसधातूचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्याचा परिणाम शरीरातील चयापचय क्रियांवर होतो तसेच मनाची प्रसन्नता, उल्हसितपणा कमी होताना दिसतो. बहुधा याच कारणामुळे या ऋतूत अनेक मंडळींची चिडचिड वाढते, राग पटकन येतो.

आवश्यक तेवढे सूर्याच्या उष्णतेचे प्रमाण आपण योग्य दिनचर्या पाळून कसे घेऊ शकू याची चर्चा आपण आज करणार आहोत.

अशी काळजी घ्यावी

अगदीच आवश्यक काम असेल तरच सकाळी ११ च्या अगोदर किंवा सायंकाळी ५ नंतर घराबाहेर पडावे. बाहेर जाताना स्वतःच्या पोशाखाकडे नक्की लक्ष द्यावे. शक्यतो सुती व फिक्या रंगाचे सैलसर कपडे घालणे अधिक योग्य ठरते, जेणेकरून शरीराला मोकळी हवा मिळू शकेल. डोक्यावर छत्री घ्यावी किंवा टोपी वा रुमाल-स्कार्फ बांधूनच घराबाहेर पडणे योग्य ठरते.

घरातून बाहेर जाताना बरोबर पाण्याची बाटली नक्की असावी. शक्यतो प्लास्टिकची बाटली वापरू नये कारण अधिक उष्णतेमुळे प्लास्टिक व पाण्यामध्ये चुकीची प्रक्रिया होऊ शकते, त्यामुळे धातूची बाटली घेणे उत्तम.

प्यायचे पाणी जलसंतुलन घालून उकळल्यास शरीरातील पित्तसंतुलनाकरता मदत होऊ शकते. अशा प्रकारे उकळलेले पाणी माठामध्ये गार करून आरोग्याकरता उत्तम ठरते.

उन्हाळ्यात भूक कमी लागते, अन्नात रुची वाटत नाही. उन्हाळ्यात मधुर, लघु, शीतल गुणधर्माच्या गोष्टी, त्याही द्रवस्वरूपात असल्या तर अधिक उत्तम, सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदाने दिलेला आहे. त्यामुळेच की काय या ऋतूत आपल्याला संत्री, मोसंबी, द्राक्षे, ऊस, कलिंगड, खरबूज, शहाळे, आंबा, सफरचंद वगैरे रसाळ फळे निसर्गाकडून अधिक प्रमाणात उपलब्ध होताना दिसतात. घरी न्याहरीच्या वेळी संत्री, मोसंबी, कलिंगड यांचा रस घेणे योग्य ठरू शकते. उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश भरून यायला मदत मिळते, शरीरातील उष्णता कमी होते. आवडत असल्यास संत्री-मोसंबीच्या रसात थोडे गार पाणी किंवा बर्फाचे १-२ तुकडे घालावेत, तसेच या रसात थोडी जिरे पूड व खडीसाखर घालून रस थोडा थोडा घेतला तर अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते.

बाहेर पडले की सध्या शीतपेये पिण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. बाहेर काही प्यायचे झालेच तर शहाळ्याचे पाणी घेणे उत्तम. शहाळ्याच्या पाण्यामुळे पोटाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, ते शीत गुणधर्माचे असते, मूत्रल असते. त्यामुळे शहाळ्याचे पाणी घेतल्यास लघवी साफ व्हायला, शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी मदत मिळते, तसेच ते मनाला स्फूर्ती मिळते. शहाळ्याचे पाणी पचायला सोपे असल्यामुळे लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती असे सर्वच शहाळ्याचे पाणी घेऊ शकतात.

या ऋतूत आहारात ओल्या नारळाचा चव, नारळाचे दूध यांचा वापर करणे योग्य ठरते.

उसाच्या रसाचेही साधारण गुण शहाळ्याचे पाण्यासारखेच असतात. ऊस शुक्रधातूसाठी हितकर असतो. क्वचित शहाळ्याचे पाणी किंचित तुरट असू शकते, पण उसाचा रस नेहमीच गोड असतो. उसाचा रस काढत असताना स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे तसेच त्यात बर्फ वा पाणी टाकलेले नाही याची खात्री असावी.

दुपारच्या जेवणात आंब्याचा रस घेता येतो. आंब्याचा रसात दूध घालू नये. आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरविण्यापेक्षा किंवा चाळणीतून काढण्यापेक्षा आंबा हाताने चोळून रस काढावा असे केल्याने फळात असलेल्या तंतूंचाही (फायबर्स) फायदा मिळतो. असा रस पोळी, फुलका यांच्याबरोबर खावा. वाटीभर आंब्याच्या रसात दोन चमचे साजूक तूप, चिमूटभर सुंठ पूड घातल्यास पचनाला मदत मिळते, सांध्यांमध्ये त्रास होत असल्यास तो कमी व्हायला मदत मिळते.

आंबा हृदयाकरता चांगला सांगितलेला आहे, तो शुक्रधातूपोषकही असतो. त्यामुळे एक वाटी रस आहारात असेल तर चालू शकते. कैरीपासून बनविलेले पन्हेसुद्धा अमृताप्रमाणे असते, जेवणाआधी अर्धा-पाऊण वाटी पन्हे घेण्याने पचनाला मदत होते, जेवणाची रुची वाढते.

लहान मुलांना खायची इच्छा होत नसल्यास दुधात बदाम, चारोळी, खसखस, वेलची वगैरे घालून केलेली थंडाई देणे आरोग्याकरता उत्तम असते. ही थंडाई बनवताना साखरेऐवजी अनंत कल्प घालणे अधिक फायद्याचे ठरते. आवडत असल्यास थंडाई बनवताना संतुलन गुलकंद स्पेशल घातले तर त्यातील गुलाब व प्रवाळ यांच्या शीतलतेमुळे उष्णतेचे त्रास कमी व्हायला मदत मिळते, शिवाय ही थंडाई अतिशय चविष्ट लागते.

न्याहारीच्या वेळी एक चमचा गुलकंद स्पेशल चावून खाल्ल्यास दिवस भरात बाहेर गेल्यास उन्हाचा त्रास होत नाही असा अनुभव आहे.

या ऋतूत जेवणात मुगाच्या डाळीचा समावेश करणे उत्तम. मूग डाळ वीर्याने शीत असते, त्यामुळे आमटी, सूप, कढण वगैरेंसाठी मूग डाळ वापरणे हितकर ठरते.

या ऋतूत मऊ भात दूध व तूप घालून किंवा नुसते तूप घालून खाल्ल्यास शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते.

संतुलन पित्तशांती किंवा मोतीयुक्त प्रवाळपंचामृत गोळ्या रोज नियमाने घेणे आरोग्यासाठी उत्तम असते. शरीराची ताकद टिकून राहण्यासाठी संतुलन धात्री रसायन, संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घेणे उत्तम ठरते. रात्री झोपायाच्या आधी सॅनकूल चूर्ण घेतल्यास सकाळी पोट साफ व्हायला मदत मिळते. उन्हामुळे डोके दुखायची प्रवृत्ती असल्यास टाळूवर संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल जिरविण्याचा फायदा होतो.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस सगळीकडे उष्णता वाढत चाललेली आहे. उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक गाठला जात आहे असे आढळून येते आहे. अशा वेळी आयुर्वेदाने सुचविल्यानुसार आरोग्याची काळजी कशी घेता येते हे समजून घेतल्यास उन्हाळ्यात होऊ शकणाऱ्या त्रासांपासून दूर राहण्यास आपल्याला मदत मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : जवळपास २९४ जिंकूनही NDA टेन्शनमध्ये! हे तीन नेते देणार BJP ला दगा? इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग

Kalyan Loksabha 2024 Election Result: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा झाले खासदार, ठाकरे गटाच्या दरेकर पराभूत

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील तर हातकणंगलेतून माने 14723 मतांनी विजय; सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : विखेंना मोठा धक्का! नगरकरांनी दिली निलेश लंकेंना दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी

SCROLL FOR NEXT