शंभरपेक्षा अधिक अधिकाऱ्यांना अडकवण्याचा डाव!
सतर्कतेमुळे काही जण सहाय्यक आयुक्ताच्या जाळ्यातून निसटले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्ताने वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पातील गुंतवणुकीची योजना केंद्र आणि राज्य शासनातील सुमारे १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र काही सतर्क अधिकारी या जाळ्यातून थोडक्यात निसटले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सहाय्यक आयुक्तांच्या शब्दावर आणि हमीवर विश्वास ठेवत पैसे गुंतवल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी ‘सकाळ’कडे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर नोंदविली.
हा विषय सर्वांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया नोंदवत राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाला, की गेल्या काही महिन्यांपासून संबंधित सहाय्यक आयुक्ताने पुनर्विकास प्रकल्पात १०० टक्के रक्कम आगाऊ दिल्यास घर, व्यावसायिक गाळे अगदी स्वस्तात पडतील. भविष्यात इमारत बांधून तयार होईपर्यंत ही गुंतवणूक दुप्पट होईल, अशी योजना घेऊन १००हून अधिक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या; मात्र त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी तत्पूर्वीच या प्रकल्पाबाबत माहिती घेतल्याने ते वेळीच सतर्क झाले. त्यामुळे अनेक जण त्याच्या जाळ्यातून निसटले. दरम्यान, याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आपला निर्णय योग्य होता, असे म्हणत अनेकांनी निःश्वास सोडला, अशी मिश्किल प्रतिक्रियाही या अधिकाऱ्याने नोंदवली.
संबंधित सहाय्यक आयुक्त महापालिकेत अधिकारी असल्याने काही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. काळा पैसा गुंतवणारे अधिकारी भविष्यात तक्रार करणार नाहीत. केलीच तर आपले वलय वापरून त्यातून निसटू, असा विचार करून या सहाय्यक आयुक्ताने ही योजना अनेकांच्या गळी उतरवली असावी, असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला. याबाबत संबंधित सहाय्यक आयुक्ताकडे विचारणा केली असता, आपलीच या प्रकरणात फसवणूक झाल्याचे सांगितले. माझीच कायदेशीररीत्या २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. पटेलने आपल्यासह अनेकांची फसवणूक केल्याचा दावा त्याने केला. दरम्यान, ‘सकाळ’च्या वृत्ताने पोलिस, पालिकेसह विविध शासकीय विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. हा सहाय्यक आयुक्त नेमका कोण, गुंतवणूक करणारे कोण, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
----
चौकशीस बोलावले, मात्र जबाब नोंदवला नाही
तक्रारदार निशित पटेल यांना गुरुवारी खार पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले; मात्र त्यांचा जबाब नोंदवण्यात आला नाही. जबाब नंतर नोंदवण्यात येईल, असे सांगत त्यांना माघारी पाठविण्यात आले. याबाबत परिमंडळ नऊचे उपआयुक्त दीक्षित गेडाम यांच्याकडे माहिती विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.