पादचारी पुलावरील छप्पर गायब
कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः द्रुतगती मार्गावरील पादचारी पुलावर छप्पर नसल्याने प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात त्रास सहन केला, निदान पावसाळ्यापूर्वी तरी पालिकेकडून छप्पर लावण्यात येईल, अशी अपेक्षा होती, मात्र पावसाळा सुरू होऊनदेखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेने प्रवाशांचा विचार करून छप्पर बसवावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कांदिवली पूर्वेला द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने ये-जा करण्यासाठी प्रवासी समता नगर पोलिस ठाणे पादचारी पुलाचा वापर करतात. एमएमआरडीएने द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी या ठिकाणी पादचारी पूल उभारले. हा पूल देखभालीसाठी एमएमआरडीएने पालिकेच्या ताब्यात दिले. वाऱ्यामुळे काही पुलावरील छप्पर उडाले होते. त्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी छप्पर काढण्यात आले. याबाबत पालिकेच्या सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पादचारी पुलाचा दररोज हजारो प्रवासी वापर करतात. वाऱ्यामुळे छप्पर उडाले, पालिकेने ते दुरुस्त करण्याऐवजी काढून टाकले. यामागील कारण समजू शकले नाही. पालिकेने प्रवाशांचा विचार करावा.
- गणेश पावडे, सामाजिक कार्यकर्ते