राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील भुसारा यांची निवड
मोखाडा, ता. १७ (बातमीदार) ः विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष यांची नुकतीच पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीने भाकरी फिरवत प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड केल्यानंतर त्यांनी भुसारांना नियुक्तिपत्र देऊन, त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरुणांना काम करण्याची संधी दिल्याचे बोलले जात आहे.
सुनील भुसारा हे पक्ष स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असून त्यांचे वडील दिवंगत चंद्रकात भुसारा हे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सभापती आदी पदांवर कार्यरत होते. त्यानंतर त्याच्या मातोश्री पार्वती भुसारा यांनीसुद्धा जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम पाहिले आहे. याच राजकीय पार्श्वभूमीतून अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील भुसारा हे राजकारणात सक्रिय होऊन युवकचे जिल्हाध्यक्ष, त्यानंतर पालघर जिल्हाध्यक्ष झाले. आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी पालघरसह नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा जिल्हा प्रभारी म्हणून पक्षाचे काम केले आहे. एकसंघ राष्ट्रवादी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती; मात्र पक्ष फुटल्यानंतर त्यांनी निष्ठा जपत शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राज्यातील आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, या दृष्टीने आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करणार असल्याचे भुसारांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले आहे.