विषारी औषध पिऊन चालकाची आत्महत्या
नालासोपारा, ता. १७ ( बातमीदार) : ॲपआधारित टॅक्सी चालवणाऱ्याने विष पिऊन जीवन संपवल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. सनोज सक्सेना (वय ४६) असे त्याचे नाव आहे. बुधवारी (ता. १६) संध्याकाळी त्याने आपल्या राहत्या घरी विष घेतले. तुळिंज रुग्णालयात उपचार सुरू असताना आज (ता. १७) दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कंपन्या वेळेवर पैसे देत नसल्यामुळे तो मानसिक त्रासात होता आणि त्यातून त्याने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या सहकारी चालकांनी केला आहे. टॅक्सी चालवणे परवडत नसल्याने आर्थिक संकट आले आहे. त्यातूनच ही आत्महत्या झाली, असे नातेवाइकांनी सांगितले.