शिफारस केलेल्या
उमेदवारांना प्राधान्य द्या!
सिद्घार्थ हत्तीअंबिरे यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव मतदारसंघात अनुसूचित जाती विभागाने शिफारस केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली. टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीत नगर परिषदांचे उमेदवार निश्चित करण्यात आले.
हत्तीअंबिरे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुसूचित जाती विभागाने तयारी सुरू ठेवली आहे. विभागातील अनेकजण निवडणुकीत उतरण्यास इच्छुक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक नगराध्यक्षपद एससी वर्गासाठी राखीव आहे. अनेक पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील उमेदवारांना निवडणुकीत प्रामुख्याने संधी द्यावी, अशी शिफारस विभागाने केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सपकाळ सकारात्मक असून, संघटनेत सक्रिय असलेले, निवडणूक लढवण्याची क्षमता असलेले आणि गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केल्याचे हत्तीअंबिरे यांनी सांगितले.