पनवेलमध्ये १०० हेक्टरवर ‘एज्युसिटी’
सिडकोचा प्रकल्प; जागतिक दर्जाचे कॅम्पस उभारणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : सिडको महामंडळातर्फे पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’अंतर्गत अंदाजे १०० हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई हे नजीकच्या काळात जागतिक शिक्षण केंद्र म्हणून उदयास येणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकात्मिक आरोग्यविषयक आणि शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडासंकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने हे केंद्र विकसित करण्यात येणार आहे. १४ जून २०२५ रोजी सिडको, राज्य सरकार आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करून नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी त्यांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली.
सिडकोच्या एज्युसिटी उपक्रमांतर्गत नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस स्थापन करण्यात येणार आहे. कुंडेवहाळ येथे सुमारे १०० हेक्टरवर एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे. ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तीन-चार किमीच्या परिघात आहे. याव्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांद्वारेदेखील कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबईहून वाहनाद्वारे एज्युसिटी एक तासाच्या अंतरावर असून एरोसिटी, नैना शहर, खारघर काॅर्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स व पनवेल महापालिका क्षेत्रापासूनही नजीकच्या अंतरावर आहे.
-----
महामार्गावरून थेट प्रवेश
एज्युसिटीच्या जमिनीच्या सपाटीकरणाचे काम आवश्यक असून, जमिनीच्या चार स्वतंत्र भूखंडांवर विकासाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे भाग १ व भाग २ मधील ५० हेक्टर जमिनीच्या विकासासह ४५ मीटर बाय ३० मीटर रुंद प्रवेश मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, ई-निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ३४८ (राष्ट्रीय महामार्ग ४बी) जेएनपीएवरून एज्युसिटीत थेट प्रवेश मिळणार आहे.
-----
मेट्राे लाईनने जाेडणार
सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल रेल्वेस्थानक जोडणारी मेट्रो लाईन एम २४ची योजना आखत आहे. या मार्गिकेचा विस्तार नैना क्षेत्रापर्यंत विस्तारून ती प्रस्तावित एरोसिटी आणि एज्युसिटीला जोडली जाणार आहे.
----------------------------------
काेट
आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशात शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक प्रकल्प आहे. या प्रकल्पात देशातील विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठे व नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ज्ञान आणि सांस्कृतिक आदानप्रदानासह संशोधनाला चालना मिळणार आहे. या ठिकाणी १०हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा सहभाग असून, हा देशातील एकमेव उपक्रम ठरेल.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.