ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल
ठाणे, ता. १३ ः बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी वाहतूक विभागाने मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी रस्त्यावरील वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. पुढील सहा महिने हा बदल असणार आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ठाणे ते बोरिवली असा भूमिगत रस्ता तयार केला जात आहे. ठाण्याच्या दिशेने भूमिगत रस्त्याचे (बोगदा) काम सुरू झाले आहे. आता पुढील कामासाठी बोगद्याच्या ठिकाणी कामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात उतरविले जाणार आहे. साहित्य उतरविताना परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात होणारी साहित्याची वाहतूक आणि कामाची गती वाढविण्यासाठी बोगद्याकडे जाणाऱ्या हिल क्रेस्ट सोसायटीजवळील मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा रस्ता दीर्घकाळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर ते ११ मे २०२६ पर्यंत हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाने या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला असून, वाहनचालकांनी त्याच मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
बंदीची वेळ : रोज रात्री १:०० ते सकाळी ६:००
दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:००
बंद मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेल्या मार्गाने विरुद्ध दिशेने जातील.
नियमातून वगळलेली वाहने : पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने