दक्षिण मुंबईत भरारी मिळेल
मुंबई, ता. १३ : ‘मुंबई शहराचा ११ वर्षांत विकास कोणी केला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी मिळवून दिला किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी ५६० चाैरस फुटांचे घर कोणी दिले, हे महत्त्वाचे आहे. कोण एकत्र येतेय याला काहीच महत्त्व नाही. उद्धव ठाकरे आणि मनसे यांनी मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे; आम्ही १० कामे दाखवतो,’ असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या वेळी दिले.
मनसेची स्थापना २००७मध्ये झाली. शिवउद्योग सेनेतून किती मराठी तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध केले, किती मराठी तरुणांना उद्योजक केले, हे सांगा. निवडणूक झाली, महापौर बसला की मराठी माणसांना विसरता. पुन्हा पालिका निवडणुकीच्या सहा महिने आधी तुम्हाला मराठी माणसे आठवतात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार हे आठवते, असा टाेलाही साटम यांनी लगावला. दक्षिण मुंबईत चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. बीडीडी चाळ, अभ्युदयनगरचा विकास यामुळे दक्षिण मुंबईमध्ये जेथे आमचे कमी नगरसेवक आहेत तिथे चांगली भरारी घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत ८२ जागांवर तर आमचे माजी नगरसेवक आहेत. मुंबईत मागे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ८४ नगरसेवक निवडून आले. त्यांच्यापैकी ५८ आता शिवसेनेमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणाचा कुठे परफॉर्मन्स चांगला आहे, लोकांची पसंती आपल्या वार्डातील समस्यांना न्याय देऊ शकेल, या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत, असेही ते म्हणाले.
----
दोन भाऊ पुढच्या वर्षी एकत्र असतील काय?
२० वर्षे एकमेकांची तोंडे बघितली नाहीत. या काळात दोघे एकमेकांच्या घरी गेले नाहीत. आता घरीसुद्धा जातात अन् भाऊबीज करतात. पुढच्या वर्षीच्या गणपतीला, भाऊबीजला ते एकमेकांच्या घरी जाऊन हे सण साजरे करणार का, हे आम्हाला बघायचे आहे. याची मी डायरीत नाेंद केली आहे. मनसेला आमच्याकडे येण्याकरिता आधी त्यांना पालिकेत खाते उघडावे लागेल. मुळात महायुतीला पालिका निवडणुकीत सुमारे दीडशे जागा मिळतील. त्यामुळे आम्हाला कुणाची गरजच भासणार नाही, असा टाेला त्यांनी लगावला.
---------
मतदार यादीचा आरोप रडीचा डाव
वोटचोरी वगैरे हे नॅरेटिव्ह पसरवण्याचे धंदे आहेत. वोटचोरी होती तर लोकसभेत तुमचे ३१ आणि आमच्या १७ जागा कशा आल्या? त्या वेळी ईव्हीएमही तेच होते. तुम्ही जिंकता तेव्हा लोकशाही जिंकते आणि तुम्ही हरता तेव्हा वोटचोरी हा रडीचा डाव आहे. मतदार याद्यांवरूनही तेच सुरू आहे, असे साटम म्हणाले.
नव्या चेहऱ्यांना संधी!
मागील निवडणुकीत नवीन मुलांना संधी दिली होती. या वेळी आम्ही बऱ्यापैकी जागा लढवतोय. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. नवे चेहरे आणि अनुभवी चेहरे देण्याचा आमचा प्रयत्न असेल. नगरसेवकाची कामगिरी, जनभावना या आधारावर उमदेवारी दिली जाणार आहे.
---
मुंबईत वर्षानुवर्षे राहणारा मराठीच
मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवताे. काही लाेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात. मुंबईत भाजपचे ५० टक्के आमदार मराठी आहेत. मुंबई अध्यक्ष मराठी आहे. देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेला कुठलाही माणूस वर्षानुवर्षे येथे राहत असेल आणि मराठी भाषा बोलत असेल आणि मराठीबद्दल प्रेम असेल तर तो मराठी आहे असे आम्ही मानतो, असे साटम म्हणाले. तुमचे मराठीचे प्रेम खरे असेल तर तुमच्या मुलांना बॉम्बे स्काॅटिशमध्ये का शिकवले; तुमच्या पोरांनी जर्मन, फ्रेंच का घेतले, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
-----
समस्यांवर कायमचा तोडगा
जगभरातील शहरांचा अभ्यास करून मुंबईचा कसा कायापालट करायचा याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाण्याचा निचरा, हॉकिंग झोन, शहरातील मोकळ्या जागा यांचे व्यवस्थापन महापालिकाच करेल. कुठेही खासगी भागीदारी आणणार नाही. मुंबईतील सर्व पदपथ हे काँक्रीटचे करणार, एसटीपी प्लांटचे काम मार्गी लावणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मराठी शाळा चुकीमुळे बंद झाल्या
उद्धव ठाकरेंच्या २५ वर्षांच्या कालावधीत मराठी शाळांची पटसंख्या ही ७० टक्क्यांपेक्षा जास्त कमी झाली. हे मराठीच्या मोठ्या गप्पा मारतात, मात्र आपल्या नातवाला बालमोहन विद्यामंदिर मराठी शाळेमध्ये शिकवू शकत नाहीत. मराठी शाळांकडे दुर्लक्ष झाले, त्यांना सोयी-सुविधा दिल्या नाहीत. मराठी शाळांची पटसंख्या कमी झाली. त्या बंद झाल्या. या शाळांना आपण सोयी-सुविधा, शिक्षक आदी देऊ शकतो.
----
मुंबई पिंजून काढणार
आमच्या पक्षात अध्यक्ष एकटा काम करीत नाही; ही कलेक्टिव्ह लीडरशिप आहे. यात मोदीजींचे व्हिजन आणि देवेंद्रजींचे मार्गदर्शन आहे. आम्ही मुंबईचे सगळे आमदार, सगळे नेते, पालकमंत्री एकत्र मिळून काम करीत आहाेत. मला सगळ्यांचे खूप चांगले सहकार्य मिळत आहे. माझ्यावरती कोणतेही दडपण नाही. मी लवकरच नागरिकांचे ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये मेळावे घेणार आहे.
----------------
सर्व समाज घटकांशी संवाद
दोन महिने आम्ही ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्यावर आम्ही मुंबईकरांच्या मुंबई शहरासाठी सूचना गाेळा करीत आहाेत. यातून त्यांच्या अपेक्षा जाणून घेत आहाेत. या प्लॅटफॉर्मसाठी ऑनलाइन लिंक तयार केलेली आहे. आतापर्यंत दोन लाख २० हजार सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांच्या आधारावर आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा तयार करणार आहोत, असे साटम म्हणाले.
----
मुंबईची सुरक्षा आणि विकास
काही राजकीय गणितापेक्षा विकास, प्रशासनाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली आहे. सत्ता असेल तर सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणू शकतो. आता आम्ही मुंबई एअरपोर्ट केले. भाजपचा मुख्यमंत्री होता म्हणून केले आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी करू शकलो. विकास, पारदर्शकता व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि मुंबईची सुरक्षितता यावर आमचा भर आहे. मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याला आमची प्राथमिकता असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.