सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ ः ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या सुमारे १५ एकर जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे- सांगळे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले.
नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचा आदेश गुरुवारी जारी केला. ताथवडे हे गाव पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे. ही जागा मोक्याची असून, या जागेची किंमत कोट्यवधी रुपये आहे. ताथवडे सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे. ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ ची नोंदणी करताना नियमांचे उल्लंघन करून खरेदीखत करण्यात आले असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘सकाळ’ने दिले होते. त्याची दखल घेत नोंदणी महानिरीक्षक यांनी ही कारवाई केली. या जमिनीवर पशुसंवर्धन आयुक्तांचा ताबा असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावरही तशी नोंद आहे. परंतु दस्तनोंदणीच्या वेळी बडे यांनी अद्ययावत किंवा नजीकच्या कालावधीतील सातबारा उतारा जोडण्याची बाब दुर्लक्षित केली, तसेच जुना सातबारा जोडलेला दस्त रजिस्टर केला. त्यांनी दस्त नोंदणीच्या तारखेस लागू असलेला सातबारा तपासला असता, तर त्यावर ‘शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी’ हा प्रतिबंधात्मक शेरा दिसला असता आणि दस्त नोंदणी नाकारता आली असती. तसेच उताऱ्यावरील मालक मयत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही, तांत्रिक अडचणीचे कारण देत ‘स्किप’ या पर्याय वापरून दस्त नोंदणी पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नाही. अनियमितता करून व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी आदेशात म्हटले आहे.
------------------
असा झाला गैरव्यवहार...
------------------
१) ताथवडे येथील जमिनीचा दस्त ९ जानेवारी रोजी नोंदविला.
२) दस्त नोंदविताना चालू सातबारा उतारा न जोडता ७ जून २०२३ रोजीचा सातबारा उतारा जोडला.
३) २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर भोगवटादार सदरी खासगी व्यक्तीचे नाव तर इतर अधिकारात पशुसंवर्धन विभाग किंवा कोणत्याही शासकीय विभागाच्या ताब्याबाबतची नोंद नाही.
४) हा सातबारा उतारा दस्त नोंदविताना घेण्यात आला.
५) फेब्रुवारीतील सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात पशुसंवर्धन आयुक्त यांचा ताबा असा स्पष्ट शेरा आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.