‘उंबरठा’ चित्रपटात स्मिता पाटील आणि गिरीश कार्नाड.
‘उंबरठा’ चित्रपटात स्मिता पाटील आणि गिरीश कार्नाड. 
सप्तरंग

घराबाहेर...

सकाळ वृत्तसेवा

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक
सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक! 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची पदवीधर नव्हे, गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुलभा महाजनला हवं तर हे यश मिरवत सुखासीन आयुष्य जगता आलं असतं, पण तो तिचा पिंड नव्हता. तसं पाहिल्यास तिला घरात काहीच कमी नव्हतं. आलिशान बंगला, नवरा सुभाष हा प्रतिष्ठित वकील, पाच-सहा वर्षांची गोजिरवाणी मुलगी, मोठा दीर शहरातला नामांकित डॉक्‍टर आणि जाऊबाई घरातलं सगळं सांभाळणारी. सासूबाई नानी यांचा मात्र सगळ्यांना धाक. घरात त्यांचा शब्द अखेरचा. त्या ‘सोशल वर्क’ करणाऱ्या. साहजिकच समाजात त्यांचं मोठं ‘स्टेटस’! तरीदेखील सुलभाची या घरात घुसमट होतेय. तिला समाजकार्याची, स्त्रियांच्या प्रश्‍नांवर काम करण्याची आवड आहे.

सासूचं म्हणणं असं, की तिच्या समाजकार्यात सुलभानं हातभार लावावा. पण सुलभाला अशा दिखाऊ कार्यात रस नसतो. मुळात तिला ढोंगीपणाबद्दल विलक्षण चीड असते. त्यापायी ती घरात एकटी पडते. स्वभावानं एकलकोंडी होत जाते. मुलगी राणीलाही आईपेक्षा काकूचा अधिक लळा लागलेला. अशातच सुलभाला एका महिला अनाथाश्रमाची अधीक्षिका होण्याची संधी चालून येते. शहरापासून दूर अशा एका लहानशा गावात वसलेलं हे परित्यक्ता स्त्रियांचं सुधारगृह. नवरा आणि सासू यांचा विरोध डावलून ती ही नोकरी स्वीकारते. त्या आडगावात, प्रत्यक्ष त्या सुधारगृहात राहायला जाते. 

आल्या दिवसापासूनच तिला या सुधारगृहाचं भेसूर रूप कळत जातं. नाना प्रकारच्या परित्यक्ता स्त्रिया इथं आणून (की डांबून?) ठेवलेल्या असतात. कुणी नवऱ्यानं टाकलेली, तर कुणी फूस लावून पळवून नंतर टाकून दिलेली, कुणी कुमारी माता, तर कुणी ‘वेडी’ म्हणून घरातून काढून टाकलेली... सर्व प्रकारच्या सुविधांपासून वंचित असं जिणं त्या साऱ्याजणी जगत असल्यानं एकूण वातावरणाला बकालपणा आलेला. आश्रमात अनेक गैरप्रकार सुरू असतात. काही मुली मौजमजा करायला बाहेरच्या मुलांसोबत पळून जातात.

गावच्या आमदाराला काही मुली पुरवल्या जात असतात. आश्रमासाठीच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार सुरू असतो. व्यवस्थापन समितीच्या प्रमुख असलेल्या चेअरमन बाईंच्या आशीर्वादानं हे प्रकार बिनबोभाट सुरू असतात.

सुलभा या सगळ्या प्रकारांना चाप लावते. सर्व मुली-स्त्रियांनी नीटनेटकं राहावं, दररोज सकाळी प्रार्थना म्हणावी, अशी सक्ती करते. अर्थात, ही वाटचाल सोपी नसते. प्रत्येक कामात तिच्यासमोर अडथळे येत राहतात.

बायकांमधले हेवेदावे, त्यांची भांडणं, लैंगिक अतृप्तीमुळं काहींमध्ये असलेले समलैंगिक संबंध, त्यातून इतर स्त्रियांनी त्यांना ‘वाळीत’ टाकणं, काहींनी थेट पळून जाण्याचा प्रयत्न करणं, मुलींचा पुरवठा व्हावा यासाठी आमदाराकडून धमक्‍यांचे फोन येणं... एक ना दोन, असंख्य अडचणींना सामोरं जात सुलभा हा कारभार हाकत असते. अनेकींना ताळ्यावर आणते.

काही चांगले उपक्रम राबवते. जमेल तसा घरच्यांशी संपर्क ठेवते. दुर्दैवानं, आश्रमातून पळालेल्या दोन मुलींना पुन्हा पकडून आणून डांबून ठेवल्यानं त्या दोघी जाळून घेऊन आत्महत्या करतात. हे प्रकरण चांगलंच तापतं.

विधानसभेपर्यंत त्याची धग पोचते. आत्महत्या केलेल्या दोन मुलींच्या मृत्यूची जबाबदारी सुलभावर टाकली जाते. इतरही अनेक आरोप केले जातात. शासनानं नेमलेल्या आयोगाच्या चौकशीत सुलभा खंबीरपणे स्वतःची बाजू मांडते. ती निर्दोष ठरते. पण त्याउपरही ती नोकरीचा राजीनामा देऊन घरी परत जाते. मात्र तिचंच घर तिला आता परकं वाटू लागतं. मुलगी राणी तिच्याशी बोलायचं टाळते. नोकरी सोडल्याचं ती सुभाषला रात्री एकांतात सांगते. तो कोरडेपणानं तिचं स्वागत करतो. खरं तर मधल्या काळात अन्य एका स्त्रीशी त्याचे संबंध आलेले असतात. सुभाष ही बाब तिच्यासमोर उघड करतो. ‘‘आमच्यात कोणताही भावनिक धागा नाही, केवळ एकमेकांची गरज म्हणून आमचे संबंध ठेवले आहेत. तू माझ्याशी कोणताही संपर्क ठेवला नाहीस. जणू शारीरिक संबंध ही माझी एकट्याचीच गरज होती. तुझी गरज मी समजून घेतली, आता तू माझी समजून घेशील ही अपेक्षा. आपलं नातं मोडायलाच हवं असं नाही. तू इथंही राहू शकतेस...’’ तो थंडपणे तिला सांगतो. 

एकमेव आशेनं घरी परत आलेल्या सुलभावर हा मोठा आघात असतो. आता या घरात राहण्यात तिला स्वारस्य उरत नाही. दुसऱ्याच दिवशी ती घरादाराचा त्याग करून पुन्हा प्रवासाला निघते. अज्ञात ठिकाणी... 
ध्येयवाद, आदर्शवाद हे नुसते शब्द नसून ते जगण्याचा श्‍वास बनावेत असं ठामपणे मानणारी ही आगळी सुलभा महाजन ‘उंबरठा’ (हिंदीत ‘सुबह’ -१९८२) या चित्रपटात पाहायला मिळाली. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, पटकथा व संवाद लेखक विजय तेंडुलकर (हिंदी आवृत्तीचे संवाद लेखक वसंत देव) आणि मध्यवर्ती भूमिकेतली स्मिता पाटील यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही नायिका आठवणीत राहिली. संपूर्ण चित्रपटच स्मिताच्या अभिनयानं तोलून धरला होता. सुलभाची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय विश्‍वासार्ह वाटण्यात स्मिताच्या अभिनयाचा मोठा वाटा होता. एखाद्या भूमिकेतला ठामपणा कुठलाही अभिनिवेश न ठेवता कसा व्यक्त करावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणून स्मिताच्या या भूमिकेकडे बघायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: निकाल येण्याआधी मानली हार? सुळेंनी ५० हजारांचं लीड घेताच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे लावलेले बॅनर काढले

Lucknow Lok Sabha Result: भाजपच्या बालेकिल्ल्यात राजनाथ सिंहांची हॅट्रिकच्या पक्की, घेतली लाखांची आघाडी

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

India Lok Sabha Election Results Live : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमध्ये धक्का! इंडिया आघाडी किती घेतली लीट?

Maharashtra Lok Sabha Election Results Live : हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर

SCROLL FOR NEXT