सोन्याच्या दरांवर कोरोनाचा परिणाम; 2013नंतरचा उच्चांकी दर 

टीम ई-सकाळ
Monday, 24 February 2020

जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूच्या फैलावाचा विपरित परिणाम झाल्यामुळे जगभरात गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.

मुंबई : सोन्याच्या किमतींनी 2 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी घेत, फेब्रुवारी 2013 नंतरचा सर्वाधिक दर गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 663.06 डॉलर प्रति औंसवर पोचली आहे. चीनबाहेर अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतात मुंबईत आज, दुपारी चार नंतर सोन्याचा दर 44 हजार 730 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा परिणाम
जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूच्या फैलावाचा विपरित परिणाम झाल्यामुळे जगभरात गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. सोने हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय समजला जातो. कोरोनाच्या फेलावामुळं जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठी पडझड झाली आहे. त्यातच, चीनची प्रत्यक्ष संबंध न दिसता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हे चिंतेचे कारण असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूचा परिणाम जर असाच सुरू राहिला तर लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1 हजार 700 डॉलर प्रति औंसची पातळी गाठेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इतर महत्त्वाच्या धातूंमध्ये पॅलाडियम 2 हजार 711.81 प्रति औंस, चांदी 1.1 टक्क्यांनी वधारून 18.67 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घटून 970.36 डॉलर प्रति औंसवर पोचल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rates high in last 7 years impact coronavirus India