मंदीचा परिणाम, औरंगाबादमध्ये पन्नास हजार कामगारांची गेली नोकरी

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - जागतिक मंदीचा फास घट्ट होत असून, औरंगाबादच्या कामगारांनाही त्याचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे. पंधरा दिवसांत औरंगाबादमध्ये जवळपास पन्नास हजार कंत्राटी कामगारांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती कामगार नेते उद्धव भवलकर यांनी दिली. येत्या काळात हा फास आणखी आवळल्या जाण्याची शक्‍यता आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

जागतिक मंदीचा तीव्र परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. यात सर्वाधिक परिणाम ऑटोमोबाईल्स कंपन्यांवर झाला आहे; मात्र असे असले तरीही अन्य बहुतांश सर्व प्रकारचे उद्योग अडचणीत आले आहेत. औरंगाबाद प्रामुख्याने ऑटो आणि मद्य हब म्हणून ओळखले जाते. आज हे दोन्ही उद्योग अडचणीत सापडले आहेत. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या मध्यम व लघू कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका अधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन आणि चित्तेगाव या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे अडीच हजार उद्योग असून, साडेचार लाख कामगार काम करीत आहेत. यामध्ये तीन लाखांच्या जवळपास कंत्राटी कामगार आहेत. सध्या अंदाजे विविध कारणांमुळे त्यातील पाचशे उद्योग बंद पडले आहेत. यात गेल्या पंधरा दिवसांत 50 हजार कामगारांना काढण्यात आल्याचे श्री. भवलकर यांनी सांगितले. 

औरंगाबादेत स्कोडा, बजाज कंपनीवर अडीचशेहून अधिक ऑटोमोबाईल्स आणि इंजिनिअरिंगचे लघू-मध्यम उद्योग अवलंबून आहेत. या मोठ्या कंपन्यांनी चार महिन्यांपासून उत्पादन घटविले आहे. त्यामुळे लहान कंपन्या संकटात आल्या आहेत. 
 
निर्यातदार कंपन्याही अडचणीत 
डिस्टिलरी, फार्मास्युटिकल्स आणि टायर कंपन्यांवरही मंदीचा परिणाम झाला आहे. वाळूजमधील बीकेटी कंपनी उत्पादनापैकी 90 टक्के टायर निर्यात करते; मात्र ही निर्यात 60 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा येथील डिस्टिलरी कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात बिअर विदेशात जाते; परंतु तीही निर्यात घटल्याने या कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन पडून आहे. 
 
दिवाळी अडचणीत 
दसरा-दिवाळीत नागरिकांचा वाहन खरेदी व अन्य विविध वस्तू खरेदीवर भर असतो; मात्र खरेदीदारांच्याच रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. साधारण 50 हजार कामगारांचा रोजगार गेला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये वेतन गृहीत धरले तर ही रक्‍कम 50 कोटी होते. ही रक्कम यंदा दसरा, दिवाळीत मार्केटमध्ये येणार नाही. या परिस्थितीने जे कामावर आहेत, त्यांच्या बोनसचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. 
 
ट्रेड युनियन एकवटल्या 
राज्यातील दहा प्रमुख ऑर्गनाइज इंडस्ट्रिअल सेक्‍टरवर येत्या काही दिवसांत मंदीचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगाराच्या शोधात बहुतांश लोक शहरांत आले आहेत; मात्र आज मंदीमुळे रोजगार गमवावा लागल्याने गावाकडे परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे, सरकारने काय धोरण राबविणे गरजेचे आहे, यासाठी नाशिक येथे राज्यभरातील कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी पातळीवर दबाव आण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आल्याचे उद्धव भवलकर यांनी सांगितले. 
 
 

आर्थिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रात सध्या भयावह परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासकीयस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे; मात्र सत्ताधारी विविध यात्रा काढून सत्तेच्या खुर्चीसाठी काम करीत आहेत. 
- उद्धव भवलकर, कामगार नेते 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com