स्थावर मालमत्ता क्षेत्रात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मंदीच्या कचाट्यात सापडलेले स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्ता क्षेत्राला गुंतवणुकीच्या ओघाने तरतरी मिळाली असून ते पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास फिक्कीच्या स्थावर मालमत्ता समितीचे अध्यक्ष आणि टाटा रियल्टी अँड इन्फ्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त यांनी व्यक्त केला.

मुंबई :चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. मंदीच्या कचाट्यात सापडलेले स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्ता क्षेत्राला गुंतवणुकीच्या ओघाने तरतरी मिळाली असून ते पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास फिक्कीच्या स्थावर मालमत्ता समितीचे अध्यक्ष आणि टाटा रियल्टी अँड इन्फ्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त यांनी व्यक्त केला. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील पत पुरवठा या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

2019 या वर्षाची सकारात्मक सुरूवात झाली आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रात पहिल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. सुधारणांमुळे या क्षेत्रात परिवर्तन झाले असून गुंतवणूकदारांचा विश्‍वास पुन्हा एकदा संपादन केला असल्याचे दत्त यांनी सांगितले. ते म्हणाले की, पायाभूत सेवा सुविधा, रस्ते, जलद मेट्रो, फाईव्ह-जी सारखे तंत्रज्ञान स्थावर मालमत्ता क्षेत्राला कलाटणी देणारे ठरेल. "रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट"सारख्या संस्थांमुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे दत्त यांनी सांगितले. बहुतांश फंड आणि संस्थात्मक गुंतवणूकदार व्यावसायिक प्रकल्प आणि शीतगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरळीत पत पुरवठा आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे देशातील स्थावर मालमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले, असल्याचे हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. पुढील काही वर्षात स्थावर मालमत्ता क्षेत्राची 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वृद्धी होईल, असे त्यांनी सांगितले. को-लिव्हींग, को-वर्किंग यासारख्या संकल्पना स्थावर मालमत्ता क्षेत्राची नवी ओळख बनू पाहत आहेत, असे त्यांनी सांगितले. "फिक्की"कडून भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्राचा आढावा घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज मेंदा, डॉ. श्रीनिवास राव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: investment in real estate sector