
देशात कोरोनाकाळात एचडीएफसी बँकेच्या १००० शाखा
मुंबई - ग्राहकांना जास्त चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी एचडीएफसी बँकेने कोरोना काळातही देशभर एक हजार जादा शाखा उघडल्याची माहिती दिली आहे. कोरोना काळात रोज दोन शाखा या गतीने त्यांनी गेल्या वर्षभरात बँकेने ७३४ नव्या शाखा उघडल्या. यात एकाच दिवसात (३१ मार्च २०२२) देशभरात अनेक ठिकाणी मिळून २५० शाखा उघडण्यात आल्या. बँकेचे एमडी व सीईओ एस. जगदीशन यांनी दृकश्राव्य माध्यमाच्या साह्याने या शाखांचे उद्घाटन केले, हा एक विक्रमच असल्याचे सांगण्यात येते.
एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने देखील या कामगिरीस मान्यता दिली आहे. प्रोजेक्ट फ्यूचर रेडी प्रकल्पानुसार ही कामगिरी करण्यात आली. या आर्थिक वर्षअखेर देशभरातील तीन हजार १८८ शहरांमध्ये बँकेच्या एकूण सहा हजार ३४२ शाखा व १८,१३० एटीएम खातेदारांना सेवा देत आहेत. जादा शाखांमुळेच जादा खातेदार जोडले जातील, असे बँकेचे कंट्री ड अरविंद व्होरा म्हणाले. आतापर्यंत बँकेच्या सेवेत एक लाख ४१ हजार ५७९ कायम कर्मचारी असून त्यात मोठी वाढ करण्याची घोषणा बँकेने यापूर्वीच केली आहे.