4 वर्षात 4000% रिटर्न, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

4 वर्षात 4000% रिटर्न, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा...

मुंबई : सन्मित इंफ्रा लिमिटेडने (Sanmit Infra Ltd) गेल्या 4 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. आता त्यांचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात म्हणजेच स्टॉक स्प्लिटमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे.

1:10 च्या अर्थ असा आहे की कंपनी तिच्या प्रत्येक 1 शेअरची 10 लहान शेअर्समध्ये विभागणी करेल. त्यांच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून 31 ऑक्टोबर 2020 निश्चित केल्याचे सन्मित इन्फ्राने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे.

सन्मित इन्फ्राच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची 4 ऑक्टोबरला बैठक झाली, ज्यामध्ये स्टॉक स्प्लिटच्या उद्देशाने 31 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टॉक स्प्लिट अंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या कंपनीच्या प्रत्येक 1 शेअरला 10 शेअर्समध्ये विभागले जाईल.

सन्मित इन्फ्रा ही रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी असून तिचे मार्केट कॅप 869.44 कोटी आहे. सन्मित इन्फ्रा ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे.

सन्मित इन्फ्राचे शेअर्स 21 डिसेंबर 2018 ला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले होते. त्यावेळी त्याच्या शेअर्सची किंमत 13.18 रुपये होती. तेव्हापासून, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 4,093 टक्के बंपर परतावा दिला आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 170.33 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, 2022 च्या सुरुवातीपासून कंपनीच्या स्टॉकमध्ये 83.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन्मित इन्फ्राच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्टॉक स्पिल्ट म्हणजे काय ?

जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात, तेव्हा लहान गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लहान गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सकडे आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात मागणी वाढवण्यासाठी कंपनी स्टॉक स्प्लिट करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market