esakal | 'म्युच्युअल फंड सही है, लेकिन...'
sakal

बोलून बातमी शोधा

mutual-funds

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या किती टक्के तोटा सहन करू शकतो, हे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वीच निश्चित करणे आवश्यक आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी शेअर बाजार हा पर्याय नाही आणि नसतो.

'म्युच्युअल फंड सही है, लेकिन...'

sakal_logo
By
आदित्य मोडक

म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष पर्याय आहे. अनेकदा असे सांगितले जाते, की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचा विचार करावा लागत नाही. फंड मॅनेजर त्याचे कौशल्य वापरून शेअर बाजारात नोंदविल्या गेलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. यामुळे गुंतवणूकदाराला कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, आज बाजार कसा आहे, जागतिक पातळीवर काय घडत आहे आदीकडे लक्ष द्यावे लागत नाही. हे खरे असले, तरी एखादी व्यक्ती सांगते किंवा आपण कोठे तरी वाचले असल्याने पूर्वी दिलेल्या चांगल्या परताव्याच्या आधारावर किंवा भविष्यातही तशाच प्रकारचा चांगला परतावा मिळेल, या अपेक्षेने एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये गुंतवणूक करणे योग्य नाही. 

अशी होईल संपत्तीनिर्मिती!
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या किती टक्के तोटा सहन करू शकतो, हे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वीच निश्चित करणे आवश्यक आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी शेअर बाजार हा पर्याय नाही आणि नसतो. पण जोखीम आहे म्हणून बाजारात गुंतवणूक करायचीच नाही, असे नाही. ही गुंतवणूक किमान अभ्यासपूर्ण असली पाहिजे. यामुळे तोटा सहन करण्याची आपली मानसिक तयारी होते आणि फायदा झाला तर तो आपलाच असतो. असा फायदा ‘बुक’ करून तीच रक्कम शेअर बाजारात न गुंतविता सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवावी. यामुळे आपल्या सुरक्षित गुंतवणुकीची वाटचाल हळूहळू संपत्तीनिर्मितीकडे होऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्ञान वाढवायला हवे!
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना संबंधित (नवी योजना असल्यास) फंड कोणत्या सेक्टरमधील शेअरमध्ये का विशिष्ट शेअरमध्ये गुंतवणूक करणार आहे, एंट्री लोड-एक्झिट लोड आहे का नाही, क्लोज एंडेड का ओपन एंडेड आहे, फंड मॅनेजरचा अनुभव कसा आहे, जुन्या योजनेमध्ये गुंतवणूक करताना आतापर्यंत कसा परतावा दिला आहे (यासाठी शक्यतो दोन ते तीन वर्षांची जुनी योजना असावी) आणि ती योजना गुंतवणूक करीत असलेल्या शेअर वा सेक्टरला भविष्यात मागणी कशी राहू शकते, याचा किमान अभ्यास आवश्यक आहे. 

जोखीम विभागायला हवी!
म्युच्युअल फंडाच्या इक्विटी, डेट, सेक्टोरल, इंडेक्स, हायब्रिड, ब्ल्यू चिप किंवा लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टि कॅप, डायव्हर्सिफाइड, मल्टि ॲसेट आदी अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना असतात. त्यामुळे या फंडांचे किंवा योजनेचे गुंतवणुकीचे धोरण काय आहे, याचा अभ्यास किंवा माहिती असणे आवश्यक असते. विशिष्ट फंडात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का, हे तपासावे लागते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम विभागून करायला हवी. म्हणजेच एका फंडात सर्व रक्कम गुंतविण्यापेक्षा वेगवेगळ्या फंडात गुंतवावी.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘फायनान्शिअल डॉक्टर’चे महत्त्व
आपण आरोग्याविषयी जेवढे जागरूक असतो, तेवढीच जागरूकता ‘फायनान्शिअल हेल्थ’विषयी असणे आवश्यक आहे. आपण हेल्थ चांगली राहण्यासाठी डॉक्टरकडे जातो. तसेच, शेअर बाजारात गुंतवणूक करताना या विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या तज्ज्ञाकडे (सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर) आपण जाऊ शकतो. 

शेअर बाजारात परताव्यापेक्षा तोटा सहन करण्याची क्षमता महत्त्वाची असते. म्हणूनच आपल्याला चांगला परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे अंधानुकरण करू नये. एखाद्या फंडात (विशेषतः इक्विटी) एकरकमी गुंतवणूक न करता ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चा (एसआयपी) पर्याय निवडावा. तसेच, आपल्या गुंतवणुकीचा नियमितपणे आढावा घेणे आवश्यक आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

थोडक्यात, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी वरील मुद्द्यांचा गांभीर्यांने विचार करायला हवा, तरच आपण म्हणू शकू, की ‘म्युच्युअल फंड सही है...!’
(लेखक सीए असून, कमॉडिटी व शेअर बाजाराचे अभ्यासक आहेत.)