संयुक्त नावावरील गृहकर्जाचे फायदे-तोटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर

संयुक्त नावावरील गृहकर्जाचे फायदे-तोटे

आजकाल मध्यमवर्गीय कुटुंबात बहुदा पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतात. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्नही बऱ्यापैकी असते. तसेच घरातील सदस्यांची संख्यासुद्धा जेमतेम चार-पाच इतकीच (आई-वडील धरून)असते. असे असले तरी घर मोठे हवे असते त्यात किमान दोन-तीन बेडरूम असणे आजकाल गरजेचे झाले आहे. मात्र घराच्या किमती सातत्याने वाढत असल्याने मोठे घर घेणे परवडत नसे तथापि आता दोघेही कमावते असल्याने दोघांच्या उत्पन्नातून घराचा हप्ता भरून मोठे घर घेणे आजकाल शक्य झाले आहे. बँकाही आता दोघांच्या संयुक्त नावाने गृहकर्ज देण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. असे असले तरी संयुक्त नावावर कर्ज घेण्याचे काही फायदे-तोटे आहेत ते समजून घेऊनच संयुक्त नावाने कर्ज घेतलेले बरे. त्यादृष्टीने नेमके काय फायदे-तोटे आहेत ते आपण पाहू.

फायदे काय आहेत?

दोघांच्या एकत्रित उत्पन्नामुळे जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते. शियाय परतफेडीचा कालावधी वाढीव मिळत असल्याने ‘ईएमआय’ कमी होतो.(आजकाल बँका २५ ते ३० वर्षे इतका परतफेडीचा कालावधी देऊ लागल्या आहेत.)

कर्जाची रक्कम वाढत असल्याने आपल्याला पाहिजे तसे घर घेणे शक्य होते.

कर्ज परतफेडीची जबाबदारी विभागली जात असल्याने एकावरच ताण येत नाही.दोघानाही सेक्शन ‘८० सी’ व ‘सेक्शन २४’ नुसार मुद्दलाची परतफेड व व्याज याचा फायदा मिळत असल्याने दोघांनाही प्राप्तिकर वाचविता येतो.

महिला कर्जदारास बँका व्याजात ०.०५ टक्के इतकी सूट देत असल्याने संपूर्ण कर्जावरील व्याज दर ०.०५ टक्क्यांनी कमी लावला जातो. दीर्घकालीन कर्जावरील ०.०५ टक्के इतका कमी व्याज दराने निश्चितच परतफेडीची रक्कम कमी होते.(उदा: एक कोटी रुपये कर्जाचा व्याजदर ८.५० व कालावधी ३० वर्षे असेल तर ‘ईएमआय’ ७६,८९१.३५ रुपये इतका असेल आणि८.४५ टक्के दराने ७६,५३७.२८ रुपये इतका असेल. या दरमहाच्या ३५४.०७ रुपये फरकाने ३० वर्षांत १,२७,४६५.२० रुपये एवढी कमी परतफेड करावी लागते.)

तोटे काय आहेत?

दोघांपैकी कोण एकाची नोकरी अथवा व्यावसायिक उत्पन्न आजारपण, अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणाने थांबले, तर दरमहाचा हप्ता भरण्याची जबाबदारी एकावरच येऊन पडते व अशा वेळी कर्जफेड करणे अवघड होऊन जाते. प्रसंगी कर्ज खाते अनियमित होते व त्यामुळे बँकेचा वसुलीसाठी तगादा सुरू होतो यातून कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली जाऊ शकते.

दोघांपैकी एकाने ‘ईएमआय’मधील हिस्सा भरण्यास टाळाटाळ केली किंवा अपुरा भरला, तर दोघांचाही क्रेडिट स्कोअर खराब होतो व भविष्यात वाहन/मुलांचे शिक्षण यासाठीचे कर्ज मिळण्याची शक्यता दुरावते.घटस्फोट किंवा कायदेशीररित्या विभक्त होताना यावर सामंजस्याने तोडगा निघाला नाही, तर संयुक्त नावावरील गृहकर्ज हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.

दोघांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास उर्वरित कर्ज परतफेडीची जबाबदारी एकावरच येऊन पडते आणि त्यातच मृत व्यक्तीच्या आजारपणावर झालेला खर्च जास्त असेल, तर कर्ज परतफेड अवघड होऊन जाते. त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

थोडक्यात असे म्हणता येईल, की सयुंक्त नावाने गृहकर्ज घेणे निश्चितच फायदेशीर आहे, मात्र वरील बाबींचा विचार करून व त्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करूनच संयुक्त नावाने गृह कर्ज घ्यावे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)