सदैव झळाळणारे सोने 

सदैव झळाळणारे सोने 

कल सध्या वाढीचाच
सध्याचा स्थितीत सोने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा 1,920 डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारताचा रुपया आणखी कमकूवत होण्याची शक्यता आहे. तात्पर्य, पुढील काही काळात जागतिक पातळीवर सोने 1,950 डॉलर प्रति औंस पोचू शकते. भारतात 77 रुपये प्रति डॉलर हा चलनदर राहिल्यास सोने 50 हजार 500 ते 52 हजार रुपये प्रतिदहा ग्रॅम या पातळीवर जाऊ शकते. सोन्यात होणारी प्रत्येक घट ही गुंतवणुकीची संधी मानण्यास हरकत नाही. गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर डॉलर किमतीत सोन्याने सुमारे 25 टक्क्यांपेक्षा अधिक, भारतीय रुपयाच्या मूल्यात सुमारे 40 टक्के अधिक परतावा दिला आहे. 

गुंतवणुकीचा नवा नियम? 
गेल्या 13 ते 14 वर्षांतील कालावधीत जागतिक स्तरावर डॉलर मूल्यात वार्षिक 9.5 टक्के, भारतीय रुपयाच्या मूल्यात वार्षिक 14 टक्के एवढा परतावा सोन्याने दिला आहे. हा परतावा पाहता गुंतवणुकीची व्याख्या बदलल्याचे जाणवत आहे. आता सुरक्षित गुंतवणूक (सोने) जास्त परतावा तर असुरक्षित गुंतवणूक (शेअर बाजार) कमी परतावा, असा नवा आर्थिक नियम झाल्यासारखे वाटू शकेल. वर्ष 2008-12 दरम्यान घटलेले शेअर बाजार पुन्हा वेगाने वाढले. मात्र, त्यावेळेस सोने मात्र घटले नाही. हीच परिस्थिती याही वेळेस दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. शुक्रवारी म्हणजे 17 एप्रिल रोजी  एमसीएक्सवर सोन्याचा बंद भाव 45,700 रुपये प्रतिदहा ग्रॅम नोंदविला गेला होता. 

अन् गुंतवणूक सोन्याकडे वळली 
वर्ष 2008 पासून सोने भावात पुढील चार वर्षे सतत वाढ होत गेली व सोन्याचे प्रतिऔंस आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव 800 डॉलरपासून 1920 डॉलरपर्यंत वाढले. याला सोन्याचे स्वतःचे असणारे विशेष गुणधर्म याचबरोबरीने 2008 च्या आर्थिक संकटामुळे विविध बँकांनी औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांना मदत म्हणून जाहीर केलेल्या सवलतींमुळे निर्माण झालेली जास्तीची रोकड सुलभताही कारणीभूत होती.

परकी गंगाजळीला पर्याय? 
सद्दस्थितीत युरोपीय अर्थव्यवस्थांनी व अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने कोरोना व औद्योगिक मंदी यासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्यामधून पुन्हा एकदा रोकड सुलभता बाजारात उपलब्ध झाली आहे. त्याचे परिणाम आपण सध्या सोन्यात येत असलेल्या तेजीच्या माध्यमातून बघतोय. सोने हे खरोखरच चलनाला पर्याय आहे. कारण सोन्याचे भाव हे 'स्टँडर्डाईज' डॉलरच्या किमतीत सांगितले जातात व प्रत्येकच देश आपापल्या चलनात ते परिवर्तीत करून घेतो. म्हणजेच सोने हे देशातील कुठल्याही चलनाशी हस्तांतरित होऊ शकते. कित्येक देश हे विविध चलनातील परकी गंगाजळीचे साठे सोन्यामध्ये रुपांतरित करून ठेऊ इच्छितात. अशावेळेस मात्र सोन्याची मागणी काही काळासाठी अचानक वाढते व त्या काळात सोन्याचे भाव हे असाधारणपणे वाढतात.

अशाश्वत काळात गुंतवणूकदारांची पसंती पुन्हाएकदा सोन्याला मिळाली. त्यामुळेच जगातील विविध आर्थिक बाजार 22 मार्च ते 10 एप्रिल या दरम्यान 20 टक्क्यांनी घटले तर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणजे सोने हे वीस टक्क्याने वधारले. परिणामी, पुन्हाएकदा सोने हाच सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्याचे अधोरेखित झाले. 

लेखक कमाँडिटी बाजार तज्ज्ञ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com