esakal | तुमच्या संपत्तीत खरोखरच वाढ होतेय का?
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या संपत्तीत खरोखरच वाढ होतेय का?

आपल्या उत्पन्नवाढीचा दर महागाईदरापेक्षा जास्त असतो तेव्हाच संपत्तीत खऱ्या अर्थाने भर पडते. अन्यथा वाढती महागाई संपत्तीला हळूहळू संपवत जाते.

तुमच्या संपत्तीत खरोखरच वाढ होतेय का?

sakal_logo
By
अनिल लांबा, चार्टर्ड अकाउंटंट

संपत्तीची वाढ ही आपले उत्पन्न आणि खर्च यावर अवलंबून असते. इथे उत्पन्न म्हणजे दरमहिन्याचे वेतन किंवा मासिक उत्पन्न अधिक गुंतवणुकीतून मिळणारा परतावा. जेव्हा महागाई वाढते तेव्हा क्रयशक्ती कमी होते. म्हणजेच संपत्ती कमी होते. आपल्या उत्पन्नवाढीचा दर महागाईदरापेक्षा जास्त असतो तेव्हाच संपत्तीत खऱ्या अर्थाने भर पडते. अन्यथा वाढती महागाई संपत्तीला हळूहळू संपवत जाते. गुंतवणूक करताना जर महागाईला मात देऊ शकलो तर निवृत्तीनंतर कोणतेही काम न करता आपला खर्च भागू शकतो. मात्र, महागाई दराला मात देण्यात अपयशी ठरलो तर आपली संपत्ती पुरेशी न ठरता आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तरुणपणी वेतनात वाढ होत असते त्यामुळे महागाईचा तडाखा पूर्णपणे जाणवत नाही. मात्र निवृत्तीनंतर वेतन थांबवल्यावर आणि जेव्हा बचतीवर आणि गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर अवलंबून असतो तेव्हा महागाई अडचणीत आणू शकते. बघता बघता बचत संपू शकते. त्यामुळेच गुंतवणूक करताना नेहमी महागाईला मात देण्याचा विचार करावा.

महागाईवर मात करण्यासाठी गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा बाजारातील प्रत्यक्ष महागाईपेक्षा जास्त असला पाहिजे, तरच संपत्तीत वाढ होईल.

आणखी वाचा येथे ►क्लिक करा 

तुम्ही गुंतवलेला पैसा किती दिवसात दुप्पट होईल हे जाणून घ्यायचे असेल तर, ‘रुल ऑफ ७२’ उपयोगी ठरतो. तुमच्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज किंवा परताव्याने ७२ या संख्येला भागल्यास येणारा आकडा हा किती वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल, हे दर्शवितो. उदा. तुम्हाला मिळणारे व्याज किंवा परतावा सहा टक्के असेल तर ७२/६ = १२ वर्षे लागतील. आता याच्याशी महागाईचा असलेला संबंध पाहूया. समजा महागाईदर सहा टक्के असेल तर ७२/६ = १२ वर्षे, म्हणजेच दर १२ वर्षांनी वस्तूंच्या किमती दुप्पट होतील किंवा तुमची क्रयशक्ती निम्मी होईल.

आज शंभर रुपयांची वस्तू १२ वर्षांनी दोनशे रुपयांची असेल. त्याचाच अर्थ आज तुम्ही २४ वर्षांचे असाल आणि ६०व्या वर्षी (३६ वर्षांनी) निवृत्त होणार असाल तर तुमचे आजचे राहणीमान तसेच राखण्यासाठी तुम्हाला आज कमावत असलेल्या उत्पन्नापेक्षा आठपट अधिक कमावावे लागेल. एखाद्या व्यक्तीचे आयुर्मान ८५ वर्षे गृहित धरल्यास ८५व्या वर्षी तुम्हाला लागणारी रक्कम ही तुमच्या आजच्या उत्पन्नाच्या ६४ पट असेल. अर्थात हे गणित तुमचे आजचे राहणीमान लक्षात घेऊन केलेले आहे. मात्र, तुमचे राहणीमानाचा खर्च दरवर्षी वाढतच जाणार आहे. ‘रुल ७२’च्या नियमामुळे पूर्णपणे अचूक उत्तर मिळते, असे नाही तर एकूण उत्पन्न, परतावा आणि महागाई यांच्यासंदर्भातील एक आडाखा बांधतो येतो.

यामुळेच निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा महागाईदरापेक्षा अधिक असला पाहिजे. महागाईमुळे तुम्ही केलेल्या बचतीची रक्कम कमी होत नाही तर वाढत्या खर्चामुळे वस्तू विकत घेण्याची तुमची क्षमता कमी होते. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये महागाईचा विचार होणे अत्यावश्‍यक आहे.

loading image
go to top