बाजारात दिवाळी, मग  चिंता का मन जाळी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात. सर्वप्रथम, आजची भारतीय अर्थव्यवस्था कधी नव्हे एवढी मजबूत आहे. चालू खात्यावरील तूट व वित्तीय तूट आटोक्‍यात आहे आणि त्यातच मोदी सरकारने लावलेला विविध सुधारणांचा रेटा. ‘जीएसटी’ अर्थव्यवस्थेत स्वीकारला जात आहे आणि काहीसा अडखळत का होईना पुढील काळात स्थिरावेल, असे बाजाराला वाटते.

अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात. सर्वप्रथम, आजची भारतीय अर्थव्यवस्था कधी नव्हे एवढी मजबूत आहे. चालू खात्यावरील तूट व वित्तीय तूट आटोक्‍यात आहे आणि त्यातच मोदी सरकारने लावलेला विविध सुधारणांचा रेटा. ‘जीएसटी’ अर्थव्यवस्थेत स्वीकारला जात आहे आणि काहीसा अडखळत का होईना पुढील काळात स्थिरावेल, असे बाजाराला वाटते. सरलेल्या आठवड्यात महागाई दर नीचांकी पातळीवर आला आहे आणि त्यातच ‘आयआयपी’मध्ये चांगलीच घट झाली. (तेजीत त्याचा अर्थ, आतातरी उर्जित पटेल व्याजदर कमी करून उपकृत करतील, असा घेतला जातो.) बाजाराच्या नवनव्या उच्चांकाचा हा पाया आहे. 

दुसरे कारण हेही लक्षात घेतले पाहिजे, की गुंतवणुकीच्या इतर वाटा नीरस दिसायला लागल्या आहेत. सोन्याची झळाळी कमी झालेली आहे (जोपर्यंत अमेरिकी डॉलर व भारतीय रुपया मजबूत आहेत, तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी संभवत नाही.) बांधकाम क्षेत्रात मंदी आहे, घरांचे भाव स्थिर असले तरी दुसऱ्या घराची ओढ कमी झालेली आहे आणि त्यात बॅंकेतील ठेवींचे व्याजदर घसरलेले आहेत! तेव्हा शेअर बाजाराकडे गुंतवणूकदार वळतोय, यात नवल नाही. 

प्रथमच भारतीय पैशाची ताकद बाजाराला कळली आहे. म्युच्युअल फंडात दरमहा येणारा पैसा तेजी ओसरू देत नाही. त्यात आता ‘आयआरडीए’ने नवीन नियम आणून युलिप जास्त कार्यक्षम व गुंतवणूकदारभिमुख केल्यामुळे तो पैसाही बाजारात येत आहे. एकूण काय बाजारात दिवाळी सुरू आहे हे नक्की! पण तरीही प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक नक्कीच आहे- हा तेजीचा बुडबुडा तर नाही? जरा तपासून बघूया. 

आज जगातील सर्व शेअरचे बाजारमूल्य ७७ लाख कोटी डॉलरच्यावर, जागतिक ‘जीडीपी’च्या १०० टक्‍क्‍यांहून जास्त आहे. भारतातही मुंबई बाजारातील शेअरचे बाजारमूल्य १,३२,००० कोटींवर आहे म्हणजे आपल्या ‘जीडीपी’च्या १०० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. येथेही एक पळवाट तज्ज्ञांनी शोधली आहे- २००८ च्या तेजीत हे प्रमाण ‘जीडीपी’च्या १४३ टक्‍क्‍यांवर होते. आपल्या अर्थव्यवस्थावाढीचा दर जर या वर्षी ८ टक्‍क्‍यांवर गेला आणि त्यामुळे उद्योगांची कामगिरी झळाळून उठली, तर ‘सेन्सेक्‍स’साठी ३५ हजार काय ४० हजार अंशांचा टप्पाही दूर नाही. ‘परसेप्शन’मुळे बाजार वाढतो आणि ‘परफॉर्मन्स’मुळे टिकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

मोदी सरकार आल्यापासून, म्हणजे २०१४ पासून विश्‍लेषक दरवर्षी ‘सेन्सेक्‍स’च्या नफ्यात १०-१५ टक्‍क्‍यांची वाढ होणार, असे भाकीत करतात आणि तोंडावर आपटतात. नफ्यात वाढ झालीच नाही आणि २०१५ व २०१६ मध्ये बाजार ३० हजार अंशांना टेकून खाली आला. या वर्षी पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत नफा वाढला नाही तर बाजार एकवेळ माफ करेल; पण तिसरी तिमाहीसुद्धा वाईट गेली तर मग थोडीशी आपटी अपरिहार्य आहे. 

मित्रहो, शेअर बाजार उद्यापासून खाली येईल, असे मी म्हणत नाही. ते होऊ शकते इतकेच. बाजाराची गती व भट्टी इतकी जमली आहे, की आज प्रत्येक वेळी शेअरचे भाव खाली आले, तर नवी मागणी येऊन पुन्हा ते वाढताना दिसतील. त्यातही विश्‍लेषकांचे अंदाज जर बरोबर ठरले तर गगनभरारी निश्‍चितच! पण सावध राहायला काय हरकत आहे? 

गुंतवणूकदारांनी करावे तरी काय?
गुंतवणूकदारांनी आपले भांडार तपासावे. रोज वर जाणाऱ्या शेअरमध्ये आपल्याकडील ५० टक्के तरी आहेत का, हे बघावे. वर जाण्याऱ्या क्षेत्रांचा मागोवा घ्यावा व न घाबरता त्यातल्यात्यात खालच्या भावात थोडी गुंतवणूक करावी. आपला बाजारपेठेतील हिस्सा वाढविणारे वाहन उद्योगातील मारुती, टीव्हीएस मोटर, तसेच लुमॅक्‍स ऑटो, मिंडा, सुंदरम फासनर्स यांसारखे काही शेअर सुचतात. निर्देशांकांकडे बघत बसण्यापेक्षा ‘स्टॉक स्पेसिफिक’ राहावे. आपल्याकडील गुंतवणुकीची किमान १० ते २० टक्के रक्कम सध्या दुर्लक्षित असलेल्या; पण उत्कृष्ट प्रवर्तक असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवावी. असे अनेक उद्योग आहेत. औषध उद्योगात औरो फार्मा, सन फार्मा, डिव्हीज लॅब, नाटको, बायोकॉन, सिंजेन अशी नावे घेता येतील. दूरसंचार उद्योगही दुर्लक्षित आहे. ‘रिलायन्स’ला या क्षेत्रात धरायला हवे. या उद्योगाची सध्याची अवस्था फार काळ टिकणार नाही. सरकारच्या सहानुभूतीमुळे स्पेक्‍ट्रम खरेदीमध्ये पूर्वीसारखी पिळवणूक होणार नाही, हे मानायला जागा आहे. व्होडाफोनच्या विलीनीकरणामुळे ‘आयडिया’सुद्धा तेजीत येऊ शकतो. मात्र एक पथ्य पाळावे लागेल- आपल्या शिकल्या सवरलेल्या मुलाला नोकरी लागेपर्यंत आपण जसे सांभाळतो, तसे कदाचित हे शेअर त्यात वाढ होईपर्यंत सांभाळावे लागतील. त्याचे दुःख होता कामा नये. 

सध्या शेअर्सच्या नव्या पब्लिक इश्‍यूमध्ये चांगले पैसे मिळत आहेत. हे तेजी असेपर्यंत चालेल. किमान १० टक्के रक्कम येथे सावधपणे गुंतवावी. असा शेअर पुढे किती वाढणार, याचा विचार न करता थोडे थांबून, विक्री करून गुंतवणूक फिरती ठेवावी.

(डिस्क्‍लेमर - लेखक ‘अर्थबोध शेअर्स’चे कार्यकारी संचालक आहेत. गेली ३० वर्षे शेअर बाजारात कार्यरत असून, या बाजाराचे अभ्यासक-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मते व्यक्त केली आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishaw news