तुम्हाला नियमितपणे रक्कम हवीय ?

अरविंद शं. परांजपे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते.

निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते.

कष्ट करून मिळविलेल्या पैशाविषयी सर्वांनाच जास्त काळजी वाटत असते. विशेषतः निवृत्तीनंतरच्या काळात तर आता कुठलाच धोका नको म्हणून निवृत्त झालेले बहुसंख्य लोक गुंतवणुकीसाठी फक्त सुरक्षित अशा पोस्ट किंवा बॅंक ठेवींचीच निवड करताना दिसतात. पण, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येते आणि महागाईचा मुकाबला करणे त्यांना अवघड होते. तसेच काही जणांना पैसे कमी पडायला लागले की खर्चाला कात्री लावावी लागते. यावर उपाय म्हणून काही जण अधिक व्याज देणाऱ्या कंपन्यांमध्ये ठेवी ठेवताना किंवा डिबेंचर घेताना दिसतात. परंतु एकाच कंपनीतील ठेवी किंवा कर्जरोखे हे धोकादायक ठरू शकतात. बॅंकेचे व्याजदरही कमी असल्याने फक्त ठेवीवरील व्याजातून मिळणारा परतावा कमी वाटणे स्वाभाविक आहे. विशेषतः जे ठेवीदार करदाते आहेत, त्यांनी कर भरल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष किती परतावा मिळतो, याचाही विचार केला पाहिजे. महागाईवाढीचा विचार करून संचित रकमेतून निवृत्तीनंतरची सर्व वर्षे व्यवस्थितरित्या राहाता येईल, अशी सोय कशी करता येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गुंतविलेल्या रकमेवर ठेवींपेक्षा जास्त दराने करोत्तर परतावा मिळण्याबरोबरच आपल्या बॅंक खात्यात नियमितपणे रक्कमही जमा होईल, अशी सोय करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या योजनेतसुद्धा गुंतवणूक केली पाहिजे.

इक्विटीच्या समावेशाची गरज
शेअर बाजाराशी जोडलेल्या योजनेत म्हणजे ‘इक्विटी स्कीम’मध्ये अजिबात पैसे न ठेवणे ही पण एक जोखीम आहे. सर्वच सेवानिवृत्तांनी कंपनीतील मुदत ठेव किंवा रोख्यांमधील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम आणि अधिक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या हायब्रीड (बॅलन्स्ड) योजनेचा विचार करावा. अशा बॅलन्स्ड योजनेत, निश्‍चित उत्पन्न (फिक्‍स्ड इन्कम) देणारे प्रकार आणि इक्विटी शेअर्स यातील एकत्रित गुंतवणूक केली जाते. 

यात दोन प्रकार आहेत. १) ६५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त इक्विटी शेअर्स असलेले ः याला आक्रमक हायब्रीड योजना म्हणतात. याला इक्विटी योजनेला लागू असलेली कर सवलत लागू केली जाते. त्यामुळे एका आर्थिक वर्षात एक लाख रुपये कॅपिटल गेन झाल्यास त्यावर १० टक्के एवढ्या कमी दराने प्राप्तिकर भरावा लागतो. २) दुसऱ्या प्रकारच्या हायब्रीड योजनेत इक्विटी शेअर्सचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत आणि उरलेले डेट प्रकार असतात. त्यामुळे त्याची जोखीम आणि परतावा हा आक्रमक हायब्रीड योजनांच्या तुलनेत कमी असतो. म्युच्युअल फंडाच्या योजनेतून लाभांश किती व कधी मिळणार, हे नक्की सांगता येत नाही. निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते.

‘एसडब्ल्यूपी’ कसा करावा?
म्युच्युअल फंडाची योग्य ती बॅलन्स्ड/इक्विटी योजना निवडून त्या योजनेत आधी एकरकमी रक्कम भरायची असते. आपण आधीपासूनच गुंतवणूक केलेली असल्यास अधिक चांगले.

त्यानंतर लगेचच ‘एसडब्ल्यूपी’ चालू करता येतो. आपल्याला किती वर्षे आणि दरमहा किती रक्कम हवी आहे, याचा तपशील ‘एसडब्ल्यूपी’च्या अर्जावर लिहून दिला की तुमचे काम झाले.

ज्या दिवशी रक्कम हवी असते, त्या दिवशीच्या ‘एनएव्ही’ने अपेक्षित रकमेला भागून जेवढी युनिट्‌स येतात, तेवढ्या युनिट्‌ची त्या योजनेतून विक्री होते आणि ती रक्कम युनिटधारकांना दिली जाते. उदा. जर ५००० रुपये काढायची सूचना असेल आणि त्या दिवशी त्या योजनेतील युनिटची एनएव्ही ५० रुपये असेल, तर ५०००/ ५०= १०० युनिट्‌सची विक्री होऊनही रक्कम दिली जाईल. रक्कम काढण्याच्या तारखेला अशीच कार्यवाही प्रत्येक वेळी केली जाते. म्हणजेच रक्कम निश्‍चित असते, पण बदलणाऱ्या ‘एनएव्ही’प्रमाणे युनिट्‌स कमी-जास्त होतात.

म्युच्युअल फंडातील जोखीम 
तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य योजनेतील युनिट्‌सच्या ‘एनएव्ही’प्रमाणे म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे बदलत राहते. तसेच म्युच्युअल फंडाच्या योजनेत असलेली रक्कम बॅंकेच्या ठेवीप्रमाणे ठरावीक वेगाने वाढत नाही. त्यामुळे आपली मूळ रक्कम तात्पुरत्या कालावधीसाठी कमी होऊ शकते, अशी खुणगाठ बांधूनच या योजनेत गुंतवणूक करावी. ‘एसडब्ल्यूपी’ करताना पूर्ण रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनेतच राहते आणि त्यातील आवश्‍यक तेवढीच रक्कम काढली जाते. त्यामुळे त्या रकमेला योजनेच्या वृद्धीचा फायदा मिळतो. आपण किती रक्कम काढावी, हे तुमच्या गरजेवर अवलंबून असते. पण, मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा थोड्या अधिक दराने तुम्ही ‘एसडब्ल्यूपी’ची सूचना देऊ शकता म्हणजे तुम्ही ठेवलेल्या रकमेवर वर्षाला साधारण ९ ते १० टक्के एवढी रक्कम काढू शकता. (रु. १० लाखांवर वर्षाला १ लाख रुपये किंवा दर तीन महिन्याला २५ हजार रुपये किंवा दरमहा ८३३३ रुपये) सोबतच्या चौकटीतील उदाहरणात जर १० लाख रुपयांची गुंतवणूक करून वार्षिक १० टक्के दराने (दरमहा रु. ८३३३) मागील १० वर्षे मुदतीसाठी ‘एसडब्ल्यूपी’ केले असते तर किती काय झाले असते, हे तीन चांगल्या कामगिरी करणाऱ्या हायब्रीड योजनांचे उदाहरण घेऊन स्पष्ट केले आहे. याशिवाय एलअँडटी, अदित्य बिर्ला यांच्या हायब्रीड योजनांचाही विचार करता येईल.

‘एसडब्ल्यूपी’विषयी अधिक माहिती
१) ‘एसडब्ल्यूपी’ हा ‘एसआयपी’च्या उलट आहे. ‘एसआयपी’ने आपण म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे रक्कम जमा करत जातो, तर ‘एसडब्ल्यूपी’ करून नियमितपणे रक्कम काढत राहतो. २) ‘एसडब्ल्यूपी’ कितीही योजनांमधून करता येत असले तरीही चारपेक्षा जास्त योजनांमधून करू नये. ३) ज्या योजनेतून ‘एसडब्ल्यूपी’ चालू आहे, त्या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेणे जरुरीचे आहे. ४) सूचना देऊन ‘एसडब्ल्यूपी’ रद्द करता येतो किंवा रक्कम बदलता येते.

काय लक्षात ठेवाल?
इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम आहे.
पण गुंतवणूक न करण्यातही जोखीम आहेच.
जोखीमविरहीत गुंतवणूक असे काही अस्तित्वात नसते.
महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवरील जोखीम तुम्ही सहजपणे स्वीकारलेली असली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arthavishwa Money Investment Amount