म्युच्युअल फंडांचा ज्येष्ठांनाही आधार!

उज्ज्वल मराठे
सोमवार, 22 जानेवारी 2018

ज्येष्ठ नागरिक जेव्हा गुंतवणुकीचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त परतावा मिळविणे, हा एकमेव हेतू असणे पुरेसे नसते. त्यांनी परताव्याबरोबरच इतर गोष्टींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
 

ज्येष्ठ नागरिक जेव्हा गुंतवणुकीचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त परतावा मिळविणे, हा एकमेव हेतू असणे पुरेसे नसते. त्यांनी परताव्याबरोबरच इतर गोष्टींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
 

निवृत्तीच्या वेळी असलेली मर्यादित पुंजी, घटणारे व्याजदर, निवृत्तीनंतरचा वाढता वैद्यकीय खर्च, गुंतवणुकीच्या उत्पन्नावर कमीत कमी प्राप्तिकर भरणे, गुंतवणूक साधनातील आवश्‍यक असलेली तरलता, गुंतवणुकीतील सुलभता, जोखीम घेण्याची क्षमता आणि मानसिकता या काही त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चलनवाढ किंवा महागाईदरापेक्षा अधिक दराने परतावा मिळविणे आता अनेकांना गरजेचे झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर उत्तम गुंतवणूक साधन म्हणून म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांचा ज्येष्ठांना आधार मिळू शकतो.

ज्येष्ठांनी काय करावे?
ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक करताना आपल्या गरजेप्रमाणे अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधीची गुंतवणूक अशी विभागणी करावी. प्रत्येक कालावधीसाठी योग्य त्या म्युच्युअल फंडाच्या योजनेची निवड केल्यास अनेक उद्दिष्टे साधता येतील. अल्प कालावधीसाठी लिक्विड किंवा शॉर्ट टर्म फंड उपयुक्त ठरतात. मध्यम कालावधीसाठी इन्कम फंड, इक्विटी इन्कम फंड योग्य असतात. दीर्घ कालावधीसाठी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड, बॅलन्स्ड आणि काही प्रमाणात इक्विटी फंड निवडता येतात. या सर्व प्रकारच्या योजनांची निरनिराळ्या प्रमाणात ‘डेट’ आणि ‘इक्विटी’मध्ये गुंतवणूक केली जाते. पोर्टफोलियोमधील एकूण ‘डेट’ आणि ‘इक्विटी’चे प्रमाण हे गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता, त्याच्याकडे असलेला निधी यांचा आढावा घेऊन ठरवावे लागते.

ठरविलेल्या डेट-इक्विटीच्या आराखड्यात कोणत्या प्रकारच्या योजनांतून आणि किती प्रमाणात गुंतवणूक करावी आणि कोणत्या योजना निवडाव्यात, याचा सारासार विचार करून निर्णयच घ्यायला हवा. यासाठी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरते. गुंतवणूक साधनातील जोखीम किती आहे आणि त्याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर किंवा त्यावरच्या उत्पन्नावर का होऊ शकतो, हे समजून घेतले पाहिजे. योजनांची निवड केल्यावर लाभांश (डिव्हिडंड) पर्याय का वृद्धी (ग्रोथ) पर्याय, याची निवड करायला हवी. दरमहा निश्‍चित आवक हवी असल्यास ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ (एसडब्ल्यूपी) निवडावा.

सोबतच्या तक्‍त्यात ज्येष्ठ नागरिकांचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कसा असावे, हे प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे.

तक्‍त्यातील प्रमाण हे गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुसार, उद्दिष्टांनुसार बदलू शकेल. मात्र, पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारच्या मिळून ७-८ योजनांपेक्षा अधिक योजना नसाव्यात; ज्यामुळे गुंतवणुकीचे व्यवस्थापन सुलभ होईल.

Web Title: arthavishwa news mutual fund support to old people