मालमत्ता विभाजन करणाऱ्या गुंतवणूक योजना

bonds-stocks
bonds-stocks

चालू वर्षाच्या सुरवातीपासून भांडवली बाजारात जागतिक; तसेच देशांतर्गत कारणांमुळे वध-घटीचे हेलकावे सुरू आहेत. असे अस्थिरतेचे वातावरण गुंतवणूकदारांना धडकी भरवणारे आणि बाजारात पहिलेच पाऊल टाकणाऱ्या नवगुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षाच घेणारे असते. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता व्हायला हवी, हेच अंतिम सत्य असते आणि त्याचीच कास धरत सर्व बाजारचक्रांच्या परिस्थितीत गुंतवणुकीत कायम राहणे महत्त्वाचे असते. 

एकूण परिस्थिती पाहता एखाद्याने त्याची ‘एसआयपी’ गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये चालू ठेवणे श्रेयस्कर ठरेल. मात्र, फंडाची निवड अशी असावी, ज्यायोगे बाजारचक्रातील उच्च आणि निम्न अशा दोन्ही आवर्तनांतील संधींना त्यातून पकडले जाईल. ज्यांनी शेअरमध्ये पुरेशी गुंतवणूक केली आहे, त्यांनीही बाजारातील वादळी हालचालींना बेदखल करीत गुंतवणुकीत राहणे चांगले. कारण स्पष्ट आहे आणि ते हेच की त्यांचा पोर्टफोलियो हा बाजारातील तेजीला गृहित धरूनच बनविलेला असतो. मात्र, हेही लक्षात घ्यायला हवे, की जेव्हा बाजाराचे मूल्यांकन जसे वाढत जाते, तसे आणि त्या प्रमाणात बाजारातील अस्थिरताही वाढत असते. 

त्याचप्रमाणे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे, की त्यांच्या बाजारातील प्रवेशास उशीर कधीच होत नसतो. १० वर्षे कालावधीसाठी एक मालमत्ता वर्ग (ॲसेट क्लास) म्हणून शेअरमधील गुंतवणुकीची कामगिरी ही नेहमीच अन्य मालमत्तांच्या तुलनेत सरस राहिली आहे. काही विशिष्ट वेळी बाजाराचे मूल्यांकन महागडे असू शकते. मात्र, अर्थव्यवस्थेतील वाढ ही सरासरी ७ टक्के दराने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यता गृहित धरल्यास, भारतासारख्या वृद्धीक्षम अर्थव्यवस्थेत दशकभरात आणखी वाढीसाठी भरपूर वाव दिसून येणे स्वाभाविक ठरते.  

दीर्घावधीच्या गुंतवणुकीला आणखी एक पैलू आहे आणि तो म्हणजे ॲसेट ॲलोकेशन अर्थात मालमत्ता विभाजनाचा! एखाद्याच्या आर्थिक उद्दिष्टानुरूप, वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये संतुलित प्रमाणात गुंतवणुकीचे वाटप म्हणजे मालमत्ता विभाजन होय. याचाच अर्थ विशिष्ट मालमत्ता वर्गात तेजी दिसून आल्यास, पोर्टफोलियोमधील त्या घटकासाठी वितरीत निधी कमी करून मालमत्ता विभाजनात इच्छित फेरसंतुलन साधले जायला हवे. 

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा मालमत्ता विभाजनाचा प्रवास सुकर करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांनी डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड’ सादर केलेले आहेत. त्या त्या मालमत्ता वर्गाच्या सापेक्ष आकर्षणावर आधारीत विशिष्ट वेळी शेअर (इक्विटी) आणि रोखे (डेट) यांचे पोर्टफोलियोमध्ये योग्य प्रमाण राखणारी या फंडांची रचना असते. त्यामुळे एकाच फंडात विविध मालमत्ता वर्गांचे वैविध्य आपल्याला मिळू शकते.

(लेखक पारस इन्व्हेस्टमेंटसचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com