आर्थिक विजयाचा षटकार!

अमित हापसे
सोमवार, 17 जून 2019

निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं.... 

निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं.... 
धनंजय : हो ना, यामुळं आपली 'क्रिकेट'मधली गुंतवणूक 'कॅन्सल..' 
निखिल : तुझं आर्थिक ज्ञान चांगलं आहे, हे माहितेय रे... पण सगळीकडं काय 'गुंतवणूक' हाच विषय? 
धनंजय : नाही रे, स्वतःचं कौतुक नाही; पण नीट विचार केलास, तर तुलाही पटेल... क्रिकेट आणि गुंतवणुकीत खूप साम्य आहे. 
निखिल : कसं काय? क्रिकेटचं मैदान आणि गुंतवणुकीचं विश्व तर खूपच वेगळं आहे. 
धनंजय : आता हे बघ, क्रिकेटमधली 'टेस्ट मॅच', 'वन डे' आणि 'टी-ट्‌वेंटी' म्हणजेच गुंतवणुकीतील "लॉंग टर्म', "मीडियम टर्म' आणि "शॉर्ट टर्म' उद्दिष्ट!

निखिल : म्हणजे नक्की काय? 
धनंजय : आपल्याला साधारणपणे 7-10 वर्षांनंतर लागणारे पैसे म्हणजे आपलं "लॉंग टर्म' उद्दिष्ट, साधारणपणे 3-5 वर्षांनंतर लागणारे पैसे म्हणजे "मीडियम टर्म' उद्दिष्ट आणि साधारणपणे पुढच्या सहा महिन्यांत किंवा 2-3 वर्षांत लागणारे पैसे म्हणजे 'शॉर्ट टर्म' उद्दिष्ट. 
निखिल : ओह... ओके! 
धनंजय : आपापल्या उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीसाठी असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांमधून निवड करावी लागते. आता मला सांग, क्रिकेटच्या एका संघात कोण-कोण असतात? 
निखिल : फलंदाज, गोलंदाज, यष्टिरक्षक.... 
धनंजय : बरोबर, म्हणजेच वेगवेगळे खेळाडू असतात, त्या-त्या कामासाठी आणि गुंतवणुकीतही असंच असतं, गरजेनुसार "लिक्विड फंड', "डेट फंड', "फिक्‍स्ड डिपॉझिट', "बॅलन्स्ड फंड', "इक्विटी फंड' असे विविध पर्याय उपलब्ध असतात. 
निखिल : बरोबर... "संघ' म्हणजेच भिन्न शक्तिस्थानं असलेले लोक एकत्र येणं.

धनंजय : अजून विशेष म्हणजे, जसं क्रिकेटमध्ये कधी-कधी वेगानं धावा करायची गरज असते, तसंच गुंतवणुकीतही "मिड कॅप', "स्मॉल कॅप' असे पर्याय "हिटर' म्हणून असतात; पण जसे फटकेबाजी करणारे फलंदाज लवकर बाद होऊ शकतात, त्याप्रमाणे इथेदेखील "रिस्क' असते. 
निखिल : "रिस्क' म्हटलं, की मी तर पळूनच जातो... 
धनंजय : क्रिकेटच्या मैदानात "पिच' बघून फलंदाज आणि गोलंदाज आपलं धोरण ठरवतात, पळून नाही जात. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतलं "पिच' म्हणजे "इक्विटी मार्केट' व "डेट मार्केट'! त्यांचा अभ्यास करून आणि त्यावर लक्ष ठेवून गुंतवणूक करावी लागते. 

निखिल : येस, क्रिकेटचं "पिच' कधी "बाउन्सी' असतं, तर कधी "स्पिनिंग'ला साथ देणारं... 
धनंजय : हो, त्याप्रमाणेच "इक्विटी मार्केट'सुद्धा वर-खाली होत असतं. क्रिकेटमध्ये जसं "रेकलेस' फटका मारून विकेट फेकायची नसते, तसंच गुंतवणुकीतदेखील "पेशन्स' दाखवणं खूप गरजेचं असतं... 
निखिल : ओहो... या "वर्ल्ड कप'प्रमाणे, आर्थिक विश्वातही उन्हाळे-पावसाळे असतात तर.... 
धनंजय : हो तर, म्हणूनच जेवढं लवकर आणि चांगली सुरवात करू तेवढं चांगलं... म्हणजे क्रिकेटमधलं "ऑफ टू अ गुड स्टार्ट'! 
निखिल : ओ येस!

धनंजय : क्रिकेटमध्ये फक्त चौकार किंवा षटकार मारून चालत नाही... विकेट जाण्याची शक्‍यता असते. परिस्थिती बघून एकेरी-दुहेरी धावाही खूप महत्त्वाच्या असतात; तसंच गुंतवणुकीत एकरकमीप्रमाणेच "एसआयपी'द्वारे गुंतवणूक करणंदेखील खूप महत्त्वाचं असतं. 
निखिल : किरेकटमध्ये सोपा चेंडू आला, की फलंदाज संधीचा फायदा घेतात... 
धनंजय : अगदी तसंच "इक्विटी मार्केट' खाली असताना योग्य तेवढी एकरकमी गुंतवणूक करून घसरत्या भावाचा फायदा घेतला गेला पाहिजे. 
निखिल : जेव्हा "इंन्सेंटिव्ह' किंवा "बोनस' मिळतो, तेव्हाही असं करता येईल. 
धनंजय : अगदी बरोबर आणि जसं निव्वळ सर्वोच्च धावसंख्येपेक्षा योग्य सरासरी ठेवून विजय मिळवणं महत्त्वाचं असतं, तसंच केवळ "हायेस्ट रिटर्न्स'च्या मागे न धावता, दीर्घकाळात चांगले "ऍव्हरेज रिटर्न्स' मिळवणं जास्त महत्त्वाचं असतं.

निखिल : हो, पटतंय मला तुझं म्हणणं... 
धनंजय : क्रिकेटमध्ये असं म्हणतात, की "कॅचेस विन मॅचेस'... म्हणजेच उच्च प्रतीचं क्षेत्ररक्षण असलंच पाहिजे; तसंच आपले पैसे जर वायफळ खर्च होत असतील, तर त्यांचं रक्षण करणं जरुरीचं ठरतं. 
निखिल : खरंय... पैशाला हजार वाटा असतात... त्यामुळं काळजी घेतलीच पाहिजे... 
धनंजय : अजून एक महत्त्वाचं म्हणजे, आपले खेळाडू जसं "पॅड' आणि 'ग्लोव्ह्‌ज' घालून आपल्या शरीराची काळजी घेतात, त्याचप्रमाणं आपणही "टर्म इन्शुरन्स' आणि "हेल्थ इन्शुरन्स' घेणं अतिशय गरजेचं आहे. 
निखिल : हो, शेवटी... "सर सलामत तो पगडी पचास!' 
धनंजय : अरे वा! पठ्ठ्या तयार झालास की! एवढं मात्र कायम लक्षात ठेवावं... गुंतवणुकीच्या बाबतीत "कॅप्टन कूल' धोनीसारखं कायम थंड डोक्‍यानं चालावं... "इमोशन्स'ला थारा देऊ नये, म्हणजे विजय नक्की होतो! 
निखिल : हो, खरंय तुझं म्हणणं....

धनंजय : आणि... प्रत्येक खेळाडू जशी "कोच'ची मदत घेतो, त्याप्रमाणे आपणही एखाद्या अनुभवी, जाणकार आर्थिक सल्लागाराकडून योग्य मार्ग जाणून घ्यायला हवा! 
निखिल : हो रे! क्रिकेट आणि गुंतवणुकीत एवढं साम्य असेल, असं कधीच वाटलं नव्हतं! परवा जरी विराटची फटकेबाजी 'मिस' केली, तरी तुझ्या या आर्थिक फटकेबाजीमुळं खूप काही समजलं.... धन्यवाद मित्रा! भेटू पुन्हा! 
(लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about the investment written by Amit Hapse