esakal | घाई : कर्जफेडीची नको : एसआयपीची हवी 
sakal

बोलून बातमी शोधा

घाई : कर्जफेडीची नको : एसआयपीची हवी 

म्युच्युअल फंड 'एसआयपी'मध्ये गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या केवळ 0.1 टक्के रक्कम गुंतवून तुम्ही सर्व व्याज भरून काढू शकता.गृहकर्जावरील व्याजाच्या तुलनेत अधिक पैसे म्युच्युअल फंड 'एसआयपी'तून मिळू शकतील.

घाई : कर्जफेडीची नको : एसआयपीची हवी 

sakal_logo
By
ऋषभ पारख

रिझर्व्ह बॅंकेने तीन महिन्यांचा 'ईएमआय हॉलिडे' देऊ केल्याने सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र सध्या जरी दिलासा मिळाला असला तरी भविष्यात कर्ज भरावे लागणारच आहे. यामुळे आतापासूनच यावर विचार करणे आवश्‍यक आहे. सध्या गृहकर्ज घेतले असेल आणि तुम्ही आधी केलेली गुंतवणुकीची रक्कम, बोनस किंवा इतर कोणत्या मार्गाने अधिकचा पैसा आल्यास तुम्ही काय कराल? हे जर कोरोना संकटाच्या आधी काही आठवडे घडले असेल तर काय, याबद्दल पुढे बोलूया. मात्र, प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे, बहुतांश लोक, विशेषतः नोकरदार वर्ग कायम शक्‍य तेवढ्या लवकर कर्जाचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु, गुंतवणुकीतून मिळालेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतविल्यास त्याचे फायदे व तोटे जाणून घेणे आवश्‍यक आहे. माहिती न घेता मुदतीआधीच कर्जाची फेड किंवा गुंतवणूक करू नका. कारण आता कोरोना संकटाच्या काळात आपल्या आयुष्यावर होणारा आर्थिक परिणाम आधी बघायला हवा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुदती आधी कर्ज फेडण्याचा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेऊ नये: 

मानसिक ताण ः तुम्हाला कायम कर्ज फेडण्याची चिंता सतावत असेल आणि कायम डोक्‍यावर टांगती तलवार आहे, असे वाटत असेल तरी भावनेच्या आहारी किंवा तणाव असताना कधीच आर्थिक निर्णय घेऊ नका. परंतु, याचे फायदे आणि तोटे समजून घेऊन ही उडी घ्यावी. 

कर सवलती : 
गृह कर्जाच्या तुम्हाला दोन कर सवलती मिळतात. यातील पहिली म्हणजे तुम्ही कर्जावर भरत असलेल्या व्याजावर आणि दुसरी म्हणजे मूळ रक्कमेवर व्याजावरील सवलत ही कलम 24 (आयबी) अंतर्गत 2 लाखांपर्यंत आणि मूळ रकमेवरील सवलत ही कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत मिळते. जोडीदार अथवा नातेवाईकांसोबत संयुक्त मालकी असल्यास व्याज सवलतीची मर्यादा 2 लाख रुपये आणि 80 सी सवलत पूर्णपणे घेतली नसेल तर, त्याचाही मोठा फायदा मिळेल. या दोन्ही सवलती एकत्रित केल्यास 3.5 लाख रुपयांवर (व्याज+मूळ रक्कम) तुम्ही 30 टक्के कर (30 टक्के टॅक्‍स स्लॅबमध्ये गृहीत धरून सेस आणि सरचार्जशिवाय) भरता असे गृहित धरल्यास 1.05 लाख रुपयांच्या कराची बचत करता येईल. यामुळे तुमच्या कर सवलती आधी तपासा आणि मगच कर्ज परतफेडीचा विचार करा. 

कोरोना काळात 'कॅश इज किंग': 
तुम्हा सर्वांना माहीत आहे, की कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेबरोबरच आपली नोकरी अथवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर होणार आहे. तुमच्याकडे अधिकचा पैसा असेल किंवा गुंतवणुकीतून मिळालेला एकरकमी पैसा असेल तर, कर्जाची मुदती आधीच पूर्ण परतफेड करण्याची घाई करू नका. कारण पुढील काळात तुमच्याकडील पैशाचा ओघ कमी झाल्यास ही रक्कम वापरता येईल. त्यामुळे सध्याच्या काळात 'ईएमआय' नियमितपणे भरा आणि रोख जवळ ठेवा. कारण मुदती आधीच कर्ज भरण्याची घाई संकटात नेऊ शकते. 

अधिकचा पैसा गुंतवता येईल का? किंवा म्युच्युअल फंडाचा पर्याय योग्य आहे? : 

होय, तुम्ही अधिकचा पैसा म्युच्युअल फंडातील 'एसआयपी' कायम ठेवण्यासाठी वापरू शकता. 'एसआयपी' कायम ठेवणे हे योग्य आहे, कारण रुपयातील चढउतारामुळे सरासरी फायदा मिळतो आणि बाजारातील अस्थिरतेवरही मात करता येते. मात्र, तुमची जोखीम आणि 'ऍसेट ऍलोकेशन' पाहूनच हे करा. 

'गृहकर्जाच्या ईएमआय'ची चिंता सतावत असेल तर, म्युच्युअल फंड 'एसआयपी'मध्ये गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या केवळ 0.1 टक्के रक्कम गुंतवून तुम्ही सर्व व्याज भरून काढू शकता. तुमच्या गृहकर्जावरील व्याजाच्या तुलनेत अधिक पैसे म्युच्युअल फंड 'एसआयपी'तून मिळू शकतील. म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक केल्यास भविष्यात परताव्याचा माध्यमातून मिळणारी रक्कम ही तुम्ही गृहकर्जावर एकूण जेवढे व्याज भरणार आहात तेवढी असू शकते. सध्या कोरोनामुळे इक्विटी मार्केटला फटका बसला आहे. मात्र भविष्यात ही परिस्थिती बदलेल आणि गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा चांगला परतावा मिळेल. 

कर्जाची मूळ रक्कम (रुपयांत) - 50,00,000 
ईएमआय (रुपयांत) - 46,934 
20 वर्षांत भरला जाणारा एकूण ईएमआय (रुपयांत) - 1,12,64,160 
एकूण भरले जाणारे व्याज (रुपयांत) - 62,64,160 

कर्जाच्या मूळ रकमेच्या 0.1 टक्के रकमेची एसआयपी सुरू करा 
एसआयपीसीठी किमान आवश्‍यक रक्कम (रुपयांत) - 5,000 
वार्षिक स्टेपअप एसआयपी @ - 10% 
20 वर्षांच्या कालावधीतील एकूण गुंतवणूक (रुपयांत) - 34,36,500 
20 वर्षांनंतर एकूण एसआयपी गुंतवणूक (रुपयांत) - 99,44,358 
भांडवलातील मूल्यवर्धन (रुपयांत) - 65,07,858 
(गृह कर्जावरील व्याजापेक्षा अधिक) 

वरील आकडेवारीत कर परिणाम गृहित धरलेला नाही. एसआयपीतील परताव्याचा दर 12 टक्के आणि एसआयपीतील वार्षिक वाढ 10 टक्के गृहित धरली आहे. वरील तक्‍त्यातील दिलेले आकडेवारी केवळ विषय समजण्यासाठी दिले आहेत.