esakal | ‘अर्थ’बोध : तुम्ही रत्ने विकून, दगड-गोटे तर सांभाळत नाही ना?
sakal

बोलून बातमी शोधा

‘अर्थ’बोध : तुम्ही रत्ने विकून, दगड-गोटे तर सांभाळत नाही ना?

‘अर्थ’बोध : तुम्ही रत्ने विकून, दगड-गोटे तर सांभाळत नाही ना?

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

शेअर बाजारातील निर्देशांक रोज नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहेत. त्याबरोबरच अनेक कंपन्यांच्या शेअरचे भावही वाढत आहेत. असे असूनही आपण घेतलेल्या शेअरचे भाव मात्र वाढताना दिसत नाहीत, असा बऱ्याच गुंतवणूकदारांचा अनुभव असेल. पण ‘हे असे का होते,’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना नेमके काय उपाय योजले पाहिजेत, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

प्रश्न तसा नेहमीचाच आणि बहुतेकांच्या ओळखीचा आहे. आज आपण त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करू.

प्रश्न असा आहे, की शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर आहे, परंतु माझे शेअर तोट्यात का आहेत?

आपल्याकडील जे शेअर वर असतात, त्याची चर्चा आपण सर्वांशी करतो आणि जे खाली असतात, ते ‘लाँग टर्म’साठी आहेत,’ असा गोड गैरसमज करून, ‘कधीतरी वर येतीलच की’, असे म्हणून आपण वर्षानुवर्षे जवळ बाळगतो. किंबहुना, नफ्यातील शेअर विकायची घाई करून, जे शेअर तोट्यात असतात, ते दीर्घकाळ सांभाळतो. यालाच इंग्रजीमध्ये  ‘सेलिंग विनर्स अँड होल्डिंग लूजर्स’ असे म्हणतात.

यावर पाच रामबाण उपाय आहेत :

उपाय क्र. १ : ज्या कंपन्यांच्या कामगिरीची कमान घसरती आहे, त्यांचे शेअर ताबडतोब विकायचे धैर्य दाखवा. ‘खरेदी करा आणि दीर्घकाळासाठी ठेवा’ ही पद्धत बहुतेक कंपन्यांसाठी चुकीची ठरते. मागील काही वर्षांत कित्येक कंपन्यांच्या शेअरचे व्यवहार बंद झाले आहेत. अशा अनेक कंपन्या आहेत, की ज्यांनी मागील १० वर्षांमध्ये ‘उणे’ परतावा दिला आहे. आपण फक्त ओळखीच्या सर्वांत वरच्या पाच कंपन्या पाहू.

तक्ता क्र. १

कंपनीचे नाव १० वर्षांतील परतावा

रिलायन्स पॉवर (-) ९२ टक्के

सुझलॉन (-) ८६ टक्के

जैन इरिगेशन (-) ८५ टक्के

डिश टीव्ही (-) ८० टक्के

जेट एअरवेज (-) ७७ टक्के

उपाय क्र. २ : माझ्याकडील शेअर ‘निफ्टी ५०’ मध्ये सामील आहेत, म्हणजे ते चांगलेच असले पाहिजेत आणि आपण ते दीर्घकाळासाठी ठेवले पाहिजेत, हा समज चुकीचा ठरू शकतो. आज ‘निफ्टी’ आतापर्यंतच्या सर्वांत उच्चांकी स्तरावर आहे; पण ‘निफ्टी’मधील काही शेअर आजही त्यांच्या उच्चांकी भावापासून ‘उणे’ परतावा देत आहेत. उदाहरणासाठी पुढील तक्ता पाहा.

तक्ता क्र. २

कंपनीचे नाव उच्चांकी स्तरापासून परतावा

इंड्‌सइंड बँक (-) ४८ टक्के

कोल इंडिया (-) ४८ टक्के

इंडियन ऑइल (-) ३५ टक्के

ओएनजीसी (-) ३० टक्के

मारुती सुझुकी (-) २२ टक्के

गेल (-) २१ टक्के

उपाय क्र. ३ : शेअर चांगल्या क्षेत्रामधील आहेत. त्यामुळे ते चांगलेच असतील, हा गैरसमज आहे. क्षेत्र चांगली कामगिरी करीत असले, तरीही तुमची कंपनी चांगले काम करते आहे का, ते तपासायला हवे. त्यामुळेच, क्षेत्राला महत्त्व न देता कंपनीला महत्त्व द्या. यालाच इंग्रजीमध्ये ‘बॉटम अप’ पद्धती म्हणतात. ‘बँक निफ्टी’ मागील तीन वर्षांत ३० टक्क्यांच्या वर आहे; परंतु काही बँकांनी उणे परतावा दिला आहे. तसेच ‘फास्ट मूव्हिंग कन्झुमर गुड्स’ने (एफएमसीजी) मागील तीन वर्षांत २० टक्क्यांच्या वर परतावा दिला आहे. परंतु, त्या क्षेत्रातील काही कंपन्यांची कामगिरी नकारात्मक आहे. काही उदाहरणे सोबत दिली आहेत.

तक्ता क्र. ३

कंपनीचे नाव मागील तीन वर्षांचा परतावा

आरबीएल बँक (-) ६८ टक्के

बंधन बँक (-) ५७ टक्के

इंडसइंड बँक (-) ४८ टक्के

बँक ऑफ बडोदा (-) ४४ टक्के

आयटीसी (-) ३० टक्के

इमामी (-) २ टक्के

उपाय क्र. ४ : सरकारी आणि त्यातून ‘नवरत्ने’ म्हणजे कंपन्या चांगल्याच असणार, असा समज असेल तर ‘भेल’, ‘गेल’, एनटीपीसी’, इंडियन आॅईल यांची शेअर बाजारातील कामगिरी तपासा, म्हणजे हा एक गैरसमज आहे, हे लक्षात येईल.

उपाय क्र. ५ : तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या, परंतु, कंपनीच्या मागील पाच वर्षांतील किमान पाच गोष्टी स्वतः तपासा. १. विक्री, २. कर्जे. ३. इक्विटीवरील परतावा, ४. कंपनीचा बाजारातील हिस्सा आणि ५. कॉर्पोरेट गव्हर्नन्स.

कदाचित आपल्याला कंपनीचा ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ तपासता येणार नाही. कारण त्यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांशी बोलावे, भेटावे लागते. त्यासाठी एक छोटी युक्ती करा, की हे संबंधित शेअर हे म्युच्युअल फंडांनी घेतले आहेत का, ते तपासा. याचा अर्थ असा अजिबात नाही, की कोणतेही शेअर दीर्घकाळ ठेऊ नयेत. काही कंपन्यांच्या शेअरनी दीर्घकाळात प्रचंड मोठा परतावा दिला आहे.

प्रश्न असा आहे, की किती जणांनी असे शेअर घेतले आणि १० वर्षे ठेवले आहेत?

असे शेअर्स तज्ज्ञांच्या मदतीने शोधणे सुरु ठेवा आणि मिळाले तर (उत्तर क्र. ५ लक्षात ठेऊन) दीर्घकाळ ठेवा. चुकीचे शेअर अधिक वर्षे पोर्टफोलिओत ठेवल्यामुळे, जो ‘ऑपॉर्च्युनिटी लॉस’ होतो, तो मोठा असतो. आपण ‘मल्टिबॅगर शेअर’वर लक्ष केंद्रित न करता, ‘मल्टिबॅगर पोर्टफोलिओ’कडे लक्ष दिले पाहिजे. बघा, पटतेय का?

(लेखक भांडवली बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार आहेत)

loading image
go to top