आपले घर, आपला आर्थिक सोबती

लक्ष्मीकांत श्रोत्री
Monday, 5 October 2020

स्वतःचे घर असणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. गृहकर्जावरील व्याजदर हे मागच्या दशकातील सर्वांत कमी झाले आहेत. आज हे व्याजदर हे ७.२५ ते ८ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने मुद्रांक शुल्कामध्येही सवलत दिली आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे बांधकाम व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता, तो आता हळूहळू सुरू होत आहे.

स्वतःचे घर असणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. गृहकर्जावरील व्याजदर हे मागच्या दशकातील सर्वांत कमी झाले आहेत. आज हे व्याजदर हे ७.२५ ते ८ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने मुद्रांक शुल्कामध्येही सवलत दिली आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे बांधकाम व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता, तो आता हळूहळू सुरू होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बांधकाम व्यवसायासमोर आता भांडवल, मजूर आणि ग्राहक मिळवणे, असे मोठे प्रश्न आहेत. पण या सर्व परिस्थितीचा आपण आपल्या फायद्यासाठी उपयोग केला तर आपल्याला नक्कीच चांगले ‘डील’ मिळू शकते. ज्यांना शक्य आहे आणि ज्यांनी बराच काळ घर घेण्याचे पुढे ढकलले आहे, त्यांच्यासाठी ही नामी संधी चालून आली आहे. घरखरेदीदारांचा एक ग्रुप जमवला, तर ‘सोने पे सुहागा’! कारण ग्रुप बुकिंगची संधी सध्याच्या बाजारात कोणताही बिल्डर सोडणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपले घर म्हणजे आपला आर्थिक सोबती असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आपले घर आर्थिक सोबती म्हणून मदत करेल, कसे ते पाहूया.

घरखरेदीचे फायदे समजून घ्या!

 • तुम्ही राहता त्या शहरात घर घेतले, की तुम्हाला स्थिरता येते.
 • तुम्ही जे महिन्याला पैसे घरभाडे भरण्यात घालवता, त्या पैशाचा तुम्ही हप्ता भरण्यासाठी वापर करू शकता.
 • घराचे भाडे दरवर्षी काही प्रमाणात वाढते, त्यामुळे तुमचे भाडे भरण्यावर होणारा खर्च हा दरवर्षी वाढत असतो.
 • घराची किंमत काळाप्रमाणे वाढत असते, त्यामुळे आज जे शक्य आहे ते काही वर्षांनी अशक्य होऊ शकते. 

आर्थिक फायदे कोणते?

 • घरासाठी मिळणारे कर्ज हे बाकी व्यावसायिक कर्जांपेक्षा कमी व्याजदराने मिळते.
 • ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा फायदा करून घेता येऊ शकतो.
 • घराच्या कर्जाच्या हप्त्यामध्ये तुम्ही जी मुद्दल भरता, त्यावर तुम्हाला कलम ८० सी नुसार दीड लाखांपर्यंत करवजावट मिळते.
 • घराच्या कर्जाच्या हप्त्यामध्ये तुम्ही जे व्याज भरता, त्याची तुम्हाला कलम २४ नुसार दोन लाखांपर्यंत करसवलत मिळते.
 • वार्षिक आधारावर साधारणपणे लाखभर रुपये करातून वाचवता येऊ शकतात.

इतर फायदे काय?

 • तुमचे दुसरे घर हे तुम्हाला दर महिन्याला भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळवून देऊ शकते. 
 • घराचे भाडे हे महागाईप्रमाणे वाढवू शकता.
 • घराला तारण ठेवून तुम्ही अडचणीला रक्कम उभी करू शकता. 

उत्पन्नाचे साधन कसे बनेल?
आपले घर हे निवृत्तीच्या काळात, उत्पन्नाचे साधन बनू शकते. आपण ‘रिव्हर्स मॉर्गेज’च्या बाबतीत ऐकले नसेल, तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे. पण सामान्यपणे निवृत्त लोकांना कर्ज मिळत नाही, पण या प्रकारात तसे होत नाही. 

‘रिव्हर्स मॉर्गेज’ची ठळक वैशिष्टे अशी

 • निवृत्तीच्या काळात पैशांची गरज भासेल, तेव्हा उपयोगी ठरते.
 • घराचा ताबा द्यावा लागत नाही. तुम्ही आणि तुमची पत्नी हयात आहात तोपर्यंत घराचा ताबा आणि घर हे तुमच्याच मालकीचे राहते.
 • साधारणपणे घराच्या बाजारमूल्याच्या ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते.
 • एकरकमी, वार्षिक किंवा महिन्याला पैसे मिळविण्याचा पर्याय.
 • हे कर्ज आहे, त्यामुळे त्यावर कर भरावा लागत नाही.- तुमच्या पश्चात तुमच्या वारसदारांना कर्ज फेडून घराचा ताबा मिळविण्याचा पर्याय उपलब्ध. समजा, तुमचे कर्ज एक कोटी रुपये आहे आणि घराची बाजारात किंमत दीड कोटी रुपये आहे, तर तुमचे वारसदार कर्ज फेडून घर ताब्यात घेऊ शकतात किंवा फरकाचे पैसे त्यांना मिळू शकतात.

तुम्ही घर घेण्याचा विचार करीत असाल, तर वर दिलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.कारण आगामी नवरात्र- दसरा-दिवाळीच्या काळात घर खरेदीच्या आकर्षक संधी बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर - सीएफपी आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article laxmikant shrotri on home