म्युच्युअल फंड : विविधतेसाठी परदेशी फंड

आजकाल आपल्या खाण्यामध्ये महाराष्ट्रीय, पंजाबी, दाक्षिणात्य अशा देशी पदार्थांबरोबर इटालियन, मेक्सिकन आणि थाई अशा परदेशी खाद्यपदार्थांचाही समावेश केला जात आहे.
Mutual Fund
Mutual FundSakal

आजकाल आपल्या खाण्यामध्ये महाराष्ट्रीय, पंजाबी, दाक्षिणात्य अशा देशी पदार्थांबरोबर इटालियन, मेक्सिकन आणि थाई अशा परदेशी खाद्यपदार्थांचाही समावेश केला जात आहे. सर्वांनाच त्याची चव आवडतेच, असे नाही. पण नव्या पिढीला मात्र अशा ‘एक्झॉटिक’ पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याच धर्तीवर, आजकाल म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत ‘एक्झॉटिक’ योजनांचा समावेश असावा, असे अनेकांना वाटू लागले आहे.

‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ हा आपल्या गुंतवणुकीचे यश ठरविणारा सर्वांत मोठा घटक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या अ‍ॅसेट क्लासमध्ये (म्हणजे इक्विटी, डेट, सोने आदी) किती प्रमाणात गुंतवणूक करून तुमचा पोर्टफोलिओ तयार केला आहे, त्यावरून तुम्हाला मिळणारा परतावा (रिटर्न) आणि त्याची जोखीम निश्चित होते. पोर्टफोलिओला स्थिरता येण्यासाठी विविधता (डायव्हर्सिफिकेशन) जरुरीचे असते. त्यासाठी त्यातील योजनांच्या परताव्याचे नाते एकमेकांशी कमीत कमी निगडित असले पाहिजे. (जास्तीत जास्त निगेटिव्ह को-रिलेशन असले पाहिजे.) यासाठी परदेशी गुंतवणूक तुमच्या मदतीला येऊ शकते.

भारतीय शेअर बाजारात (एनएसई + बीएसई) सुद्धा चांगल्यापैकी खोली आणि विविधता आहे. बँकिंग, आयटी, फार्मा अशा १५ पेक्षा अधिक क्षेत्रांमधील पाच हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंद झाली आहे. त्यात झोमॅटो सारख्या नव्या उद्योगांची भर पडतेच आहे. एकूण इक्विटी या अ‍ॅसेट प्रकारात लार्ज कॅप, मल्टि कॅप अशा २४ उपप्रकारांचा समावेश असल्याने निवडीला भरपूर वाव आहे. यापलीकडे जाऊन परदेशी कंपन्यांचे शेअर हा एक वेगळा अ‍ॅसेट क्लास आता उपलब्ध आहे. परदेशातील शेअर घेणे वैयक्तिक पातळीवरसुद्धा आता फारसे कठिण नाही. पण त्यांची निवड करण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास, अनुभव आणि आवश्यक वेळ आपल्याकडे नसतो. त्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय म्युच्युअल फंडांच्या फंड ऑफ फंड्स (एफओएफ) योजना किंवा अ‍ॅक्टिव्ह फंड हे पर्याय आहेत आणि ते कमी खर्चात उपलब्ध झाले आहेत. विविधतेसाठी त्यांचा समावेश आपण करू शकतो, परंतु जगातील सर्वच शेअर बाजार हे एकमेकांशी तसे निगडित झाले आहेत, हे लक्षात ठेवावे.

भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप जागतिक मार्केट कॅपच्या तुलनेत फक्त ३ टक्के असल्याने भारताबाहेर गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे अमेरिका व जगातील अन्य शेअर बाजारातील निवडक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी अशा योजनांमधून मिळू शकते. अमेरिकेतील नॅस्डॅक एक्स्चेंजवरील नॅस्डॅक १०० आणि न्यूयॉर्क एक्स्चेंजवरचा एस अँड पी ५०० हे दोन निर्देशांक महत्त्वाचे आहेत. त्यांचे भारतीय शेअर बाजाराबरोबर २५ टक्के को-रिलेशन आहे, जे कमी आहे. म्हणजेच परताव्याचे नाते फारसे दृढ नाही.

अ‍ॅपल, कोका-कोला अशा अमेरिकेतील कंपन्या या सर्व जगाला पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांचे मार्केट कॅप प्रचंड आहे. जागतिक ‘जीडीपी’च्या २६ टक्के हिस्सा अमेरिकेचा आहे. त्यामुळे तेथील उत्तम शेअरमध्ये गुंतवणूक करण्याने फायदा होऊ शकतो, हे ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच्या दहा वर्षांमधील तुलनात्मक (सीएजीआर) परतावे बघून लक्षात येईल.

भांडवली लाभ कर

ज्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय शेअर असतील, त्या योजनेला इक्विटी योजनेचा १० टक्के भांडवली लाभ कराचा फायदा मिळतो. त्यामुळे या परदेशी योजनांना (इंडेक्सेशननंतर) २० टक्के भांडवली लाभ कर लागू होतो.

विनिमय दराचा परिणाम

गुंतवणूकदारांकडून या परदेशी योजनांची खरेदी रुपयांत होते आणि नंतर म्युच्युअल फंडांकडून या रुपयांचे परदेशी चलनात रुपांतर करून परदेशी शेअर घेतले जातात. तसेच विक्रीच्या वेळी योजनेतील शेअर परकी चलनात विकले जाऊन त्याचे परत भारतीय रुपयात रुपांतर करून गुंतवणूकदाराला रक्कम दिली जाते. म्हणजे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जर रुपया वधारला, तर मूळ खरेदी केलेल्या डॉलरचे रुपयांमधील मूल्य कमी झाल्याने ‘एनएव्ही’ कमी होते. या उलट अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जर रुपया घसरला, तर ‘एनएव्ही’ वाढते. गेल्या १० वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया दरवर्षी ५ टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजे फक्त विनिमय दरातील फरकाने ‘एनएव्ही’ ५ टक्क्यांनी वाढली आहे. ‘नॅस्डॅक १००’ सारख्या निर्देशांकाची कामगिरी सध्या उत्तम असली तरी ती पुढेही तशीच राहील, याची खात्री नाही. त्यामुळे असे सुचवावेसे वाटते, की भारतीय शेअर बाजारातील योजनांना प्राधान्य देऊन त्यात पुरेशी गुंतवणूक झाल्यानंतर अशा परदेशी योजनांचा विचार करावा.

(लेखक म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com