फिनटेक  : इन्स्टा पर्सनल लोन

insta-personal-loan
insta-personal-loan

तातडीचे वैयक्तिक हमीवरचे कर्ज म्हणजे ‘पर्सनल इन्स्टा लोन’. अर्थातच अशा प्रकारचे कर्ज कोणालाही सहजासहजी मिळू शकत नाही. याचे कारण म्हणजे अशा कर्जांमध्ये तारण किंवा हमी म्हणून नेमके काय गृहीत धरायचे, हा प्रश्न असतो. संबंधित माणसाची आर्थिक पत हा या कर्जांमधील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. गृहकर्ज किंवा वाहनकर्ज देत असताना बॅंक किंवा संबंधित वित्तसंस्था यांना कर्जदाराने हे कर्ज फेडायला असमर्थता दर्शवली तर घर किंवा वाहन हे कायदेशीर तरतुदींच्या अंतर्गत जप्त करण्याची परवानगी असते. या मार्गाने ते आपले नुकसान काही प्रमाणात तरी भरून काढू शकतात. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत मात्र जप्त करण्यासारखे काहीच नसण्याची शक्यता असू शकते.

वैयक्तिक पातळीवरील कर्ज देणे बॅंका आणि वित्तसंस्था यांना जास्त जोखमीचे वाटते, यात शंकाच नाही. यामुळे असे कर्ज देताना त्या जास्त सावध असतात. तसेच अशा प्रकारच्या कर्जामधून जास्त वसुली करण्याची संधीही त्यांना मिळते. याचे कारण म्हणजे सर्व उपाय करून झाल्यावरच शक्यतो सर्वसामान्य माणूस शेवटचा उपाय म्हणून अशा प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करीत असतो. म्हणूनच अशा कर्जावरील व्याज किमान १० टक्क्यांपासून ते थेट ३०-३५ टक्क्यांपर्यंतचेही असू शकते. तसेच हे कर्ज देत असताना ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून बॅंका १ ते ४ टक्के जास्तीची रक्कमसुद्धा आकारतात. या सर्व कारणांमुळे हे कर्ज खरोखरच कर्जदारांसाठीही अत्यंत जोखमीचे ठरू शकते.

उत्पन्न, उत्पन्न कमाविण्याचे साधन आणि त्याचे नक्की स्वरूप, वय, आजवरची आर्थिक परिस्थिती किंवा पत, ज्या संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे, तिच्याबरोबरचे संबंध असे अनेक घटक अशा प्रकारचे कर्ज मिळणार का नाही, हे ठरवायला कारणीभूत ठरतात. तसेच अशा कर्जाशी संबंधित असलेल्या जाचक अटी काही प्रमाणात जरा सैल होण्यालाही तेच मदत करतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या बेजबाबदारपणे वागणारे, आर्थिक शिस्तीची घडी मोडणारे लोक असे कर्ज मिळायलाही अपात्र ठरतात. उलट, जे लोक सातत्याने आपली आर्थिक परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अपवादात्मक संकटकाळी वैयक्तिक कर्जांचा हा तातडीचा मार्ग उपयुक्त ठरू शकतो. जे लोक याकडे आर्थिक आणीबाणीदरम्यान वापरण्याचा शेवटचा उपाय म्हणून बघत नाहीत, त्यांना मात्र हे कर्ज संकटाच्या खाईमध्ये लोटू शकते. याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात आणि म्हणूनच पुढच्या वेळी आपण त्याचे एक नेमके उदाहरणच बघणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com