‘यूपीआय’मधील गैरव्यवहार

‘यूपीआय’मधील गैरव्यवहार

‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) म्हणजेच एका अर्थाने फोन पे, गुगल पे, भीम यांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढताना दिसत असल्यामुळे त्याविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. अगदी सहजपणे पैसे आपल्या बॅंक खात्यामधून काढून घेणारे सायबर भामटे आपल्याला फसवू शकतात, याची जाणीव त्यासाठी मनात बाळगणे आवश्यक आहे. तसेच यासाठी ते नेमके काय करतात, हे जाणून घेणेही गरजेचे आहे.

‘यूपीआय’मध्ये ‘पैसे पाठवा’ आणि ‘पैसे स्वीकारा’ अशा दोन सुविधा असतात. आपण एखाद्या दुकानदाराला किंवा इतर कोणाला ‘यूपीआय’ वापरून पैसे देतो, तेव्हा आपला स्मार्टफोन आपली ओळख पटवून घेण्यासाठी आपला ‘पिन’ मागतो. त्यामुळे आपला फोन इतर कोणाच्या हाती पडला तरी आपला ‘पिन’ माहीत नसल्यामुळे आपल्या ‘यूपीआय’ खात्यातून तो माणूस पैसे हडप करू शकत नाही. भामट्यांनी यावर शोधलेला उपाय म्हणजे ते आपल्याला व्हॉट्सअॅप, एसएमएस, ई-मेल अशा माध्यमांमधून एक ‘लिंक’ पाठवतात. त्या ‘लिंक’वर आपण ‘क्लिक’ केल्यावर आपल्या खात्यात पैसे जमा होतील, असे तो भामटा सांगतो. उदाहरणार्थ, समजा आपण ‘ओएलक्स’सारख्या वेबसाइटवरून एखादी वस्तू विकत आहोत किंवा ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू काही कारणामुळे परत करत आहोत. अशा वेळी आपल्याला अशी ‘लिंक’ येऊ शकते आणि अशी ‘लिंक’ पाठवल्याचा फोनही येऊ शकतो. आपण त्या माणसाच्या सांगण्यानुसार, त्या ‘लिंक’वर क्लिक करतो. तिथे आपला ‘यूपीआय’चा ‘पिन’ मागितला जातो. आपण तो तिथे भरल्यावर पैसे आपल्या खात्यात येण्याऐवजी आपल्या खात्यातीलच पैसे त्या भामट्याच्या खात्यामध्ये जातात. हे कसे घडते?

भामट्याने ‘यूपीआय’ची ‘पैसे स्वीकारा’ ही सुविधा वापरलेली असते. म्हणजेच आपल्यासाठी तो ‘पैसे भरा’ असा व्यवहार असतो. वरवर आपल्या हे लक्षात येत नसल्यामुळे आणि त्याने पाठवलेल्या ‘लिंक’वरून हे स्पष्ट होत नसल्याने आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. त्याने पाठवलेल्या ‘लिंक’मध्ये आपण आपल्या खात्यामधील पैसे त्याच्या खात्यात भरण्यासाठीची योजना असते. आपण आपला ‘पिन’ भरून त्यावर शिक्कामोर्तब करतो. त्यानंतर आपल्या खात्यात पैसे का आले नाहीत म्हणून आपण बुचकळ्यात पडण्याआधी आपल्या खात्यातून उलट पैसे गेल्याचे बघून आपण हतबल होतो. म्हणूनच कोणीही अशी ‘लिंक’ पाठवली तर त्यावर ‘क्लिक’ न करणे आणि आपला यूपीआय ‘पिन’ गुप्त राखणे या दोन सोप्या उपायांनी आपण आपले ‘यूपीआय’ खाते बऱ्‍याच अंशी सुरक्षित ठेवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com