esakal | फिनटेक : ‘अँटी मनी लाँडरिंग’
sakal

बोलून बातमी शोधा

AML

फिनटेक : ‘अँटी मनी लाँडरिंग’

sakal_logo
By
अतुल कहाते akahate@gmail,com

बॅंका; तसेच पैसे हाताळणाऱ्या अधिकृत वित्तसंस्था यांनी पैशांच्या गैरवापराला आणि अवैध हस्तांतराला आळा घालावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. काळ्या पैशांची निर्मिती; तसंच असे पैसे बॅंका तसेच इतर वित्तसंस्था यांच्यामार्फत अधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये आणणे किंवा हे अवैध पैसे अधिकृत माध्यमांमधून एकीकडून दुसरीकडे नेणे हे प्रकार टाळण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये अनेक प्रयत्न झाले आहेत. फिनटेकच्या भाषेत त्यांना ‘अँटी मनी लाँडरिंग’ (एएमएल) असे म्हणतात. उदाहरणार्थ, बॅंकांमधील पैसे दहशतवादी संघटना, अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या, मानवी तस्करी करणारे लोक अशांच्या हाती पडू नयेत, असा यामागचा प्रयत्न असतो.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले पैसे अशा अवैध कारणांसाठी वापरतात. यामागचे एक मुख्य कारण म्हणजे हे पैसे कोठून आले, याचा तपास करताना तपास यंत्रणा या गुन्हेगारांपर्यंत पोहोचू नयेत, असा त्यांचा प्रयत्न असतो. यासाठी गुन्हेगार मंडळी आधी हे पैसे अधिकृत व्यवसाय चालवत असलेल्या आपल्या हस्तकांकरवी बॅंकांमध्ये भरतात. यामुळे मूळचे काळे म्हणजे अवैध असलेले पैसे आता अधिकृत होतात. त्यानंतर हे पैसे चलाखीने गुन्हेगारी कामांसाठी वापरले जातात. याला ‘मनी लाँडरिंग’ असे म्हणतात. याचे कारण म्हणजे काळे पैसे जणू धुवून आणि इस्त्री करून पांढरे केल्यासारखा हा प्रकार असतो!

असे प्रकार रोखण्यासाठी एएमएल तंत्रज्ञानामध्ये बऱ्याच सोयी असतात. संशयास्पद खाती, देश, व्यवहार, मध्यस्थ अशा अनेक गोष्टींवर ‘एएमएल’चे सॉफ्टवेअर लक्ष ठेवून असते. तसेच कोणत्याही खात्यामध्ये पैसे आल्यावर ते किमान पाच दिवस काढता किंवा हस्तांतरित करता येणार नाहीत, अशा प्रकारची बंधनेही घातली जातात. गुन्हेगारीसाठी कुख्यात असलेल्या देशांमध्ये किंवा संघटनांपाशी हे पैसे जात नाहीत ना, याची खातरजमा करण्यासाठी ‘एएमल’मधील माहिती सतत अद्ययावत केली जाते. सर्व आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून त्यांची कसून तपासणी केली जाते. मोठ्या रकमांच्या आर्थिक व्यवहारांवर तर अजूनच जास्त लक्ष दिले जाते.

‘एएमएल’पासून बचाव करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बॅंकांचा वापर करण्याऐवजी ‘बिटकॉइन’सारख्या आभासी चलनांचा वापर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. ‘बिटकॉइन’चे व्यवहार तपासणे आणि त्यामधील गैरप्रकारांना आळा घालणे अजून तरी शक्य झाले नसल्याचा गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो. म्हणूनच ‘बिटकॉइन’कडे काहीजण गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून बघत असले तरी दुसरीकडे गुन्हेगारांनाही ‘बिटकॉइन’चा मोठा फायदा झालेला आहे.

loading image