फिनटेक : मशिन लर्निंग | Machine Learning | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिनटेक : मशिन लर्निंग
फिनटेक : मशिन लर्निंग

फिनटेक : मशिन लर्निंग

अधिकृत स्रोताकडून प्रसारित केली जाणारी माहिती अर्थातच खूप विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांच्या वेबसाईट किंवा कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट अशा ठिकाणांहून येत असलेली माहिती महत्त्वाची असते. त्या मानाने इतर अनधिकृत ठिकाणांहून येत असलेल्या माहितीवर विसंबून राहता येईलच, असे आपण म्हणू शकत नाही. काही जण ‘माहिती म्हणजे आधुनिक जगाचे तेल’ असे म्हणतात. याचा सोपा अर्थ म्हणजे पूर्वीपासून तेल आणि ऊर्जेचे इतर स्त्रोत यांचे जे महत्त्व आपल्यासाठी होते, तेच महत्त्व आता माहितीला आले आहे. ज्याच्याकडे उपयुक्त माहितीचे साठे असतील, तो माणूस खूप यशस्वी ठरू शकतो, असे यातून ध्वनित होते. यामधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुसते माहितीचे साठे गोळा करून उपयोग नसतो; तर या माहितीतून उपयुक्त ठरतील असे निष्कर्ष काढणे महत्त्वाचे असते. जसे जमीन खणून त्यातून कोळसा, खनिज आदी उपयुक्त गोष्टी आपल्याला मिळतात, तसेच ‘माहिती खणून’ आपल्याला उपयुक्त निष्कर्ष मिळू शकतात. म्हणून अशा प्रकारे माहिती खणून त्यातून फक्त आपल्याला हवी असलेलीच माहिती मिळविण्याच्या कामाला ‘डेटा मायनिंग’ असे म्हणतात. याच्या जोडीला आता ‘मशिन लर्निंग’ नावाची संकल्पनाही वापरली जाते.

या संकल्पनांच्या मदतीने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या साठ्यामधून चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती बाजूला काढून टाकणे सोपे जाते. इतकेच नव्हे, तर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून भविष्यात काय घडू शकेल, याविषयीचे अंदाज बऱ्यापैकी अचूकपणे बांधणेही जमू शकते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मशिन लर्निंग’चे ‘सुपरव्हाइज्ड’ म्हणजे देखरेखीखाली होणारे आणि ‘अनसुपरव्हाइज्ड’ म्हणजेच देखरेखीविना होणारे असे दोन प्रकार असतात.

आपण आपल्या अनुभवांमधून शिकत जातो. म्हणजेच आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींनुसार आपण पुढच्या आयुष्यातील निर्णय घेत जातो. असाच प्रकार ‘सुपरव्हाइज्ड मशिन लर्निंग’च्या बाबतीत घडतो. येथे आपण संगणकाला आतापर्यंत पुरविलेल्या माहितीच्या आधारे संगणक काही नियम तयार करतो. या नियमांच्या आधारे संगणक पुढच्या प्रसंगांमध्ये त्याला योग्य वाटेल अशी कृती करीत राहतो. याउलट ‘अनसुपरव्हाइज्ड मशिन लर्निंग’मध्ये संगणकाला पुरविण्यात आलेल्या माहितीमध्ये नियमबद्ध असे काही नसते. म्हणजेच ही माहिती विखुरलेली असते. त्यातून संगणकाला कोणतेही नियम तयार करता येत नाहीत. साहजिकच संगणक या वेळी नियोजित प्रकारे काम करीत नाही. उलट, पुरविण्यात आलेल्या या माहितीच्या साठ्यामधून आपल्याला काही नियम तयार करता येतील का, यासाठी संगणक प्रयत्नशील असतो. हे समजून घेण्यासाठी आपण क्रेडिट कार्डांशी संबंधित असलेले उदाहरण पुढच्या वेळी घेऊ.

loading image
go to top