फिनटेक : ‘क्वांट’ योजना कशी असते?

अलीकडच्या काळात गुंतवणूक या विषयाचे महत्त्व खूप वाढलेले आहे. शेअर, म्युच्युअल फंड याखेरीस इतरही प्रकारच्या गुंतवणुकींच्या पर्यायांविषयी सातत्याने बोलले जाते.
Quant Scheme
Quant SchemeSakal
Summary

अलीकडच्या काळात गुंतवणूक या विषयाचे महत्त्व खूप वाढलेले आहे. शेअर, म्युच्युअल फंड याखेरीस इतरही प्रकारच्या गुंतवणुकींच्या पर्यायांविषयी सातत्याने बोलले जाते.

अलीकडच्या काळात गुंतवणूक या विषयाचे महत्त्व खूप वाढलेले आहे. शेअर, म्युच्युअल फंड याखेरीस इतरही प्रकारच्या गुंतवणुकींच्या पर्यायांविषयी सातत्याने बोलले जाते. आभासी चलनामधील गुंतवणुकीविषयी तर प्रचंड मोठी चर्चा सुरू असते. या पार्श्वभूमीवर ‘क्वांट’ प्रकारच्या गुंतवणुकीविषयीही सर्वसामान्य लोकांनी जाणून घेणे गरजेचे ठरेल. याचे कारण म्हणजे भारतामध्ये या प्रकारची गुंतवणूक सध्या थोड्याच प्रमाणात होत असली तरी भविष्यात या गुंतवणुकीचा आवाका वाढेल, अशी दाट शक्यता आहे.

काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी ‘क्वांट’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या गुंतवणूक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांची कामगिरी आजवर फार भरीव म्हणता येईल अशी नसली तरी नजीकच्या काळामध्ये त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल, असे काही तज्ज्ञ म्हणतात. ‘क्वांट’ योजनेचा सारांश म्हणजे अशा योजनेमध्ये नेमक्या कोणत्या शेअरमध्ये किंवा बाँड्समध्ये पैसे गुंतवायचे हा निर्णय गुंतवणूक योजनेचे व्यवस्थापन करणारा निधी व्यवस्थापक घेत नाही. तसेच या योजनेमध्ये ‘इंडेक्स’ प्रकारच्या योजनेमध्ये जशी ठराविक शेअरमध्ये गुंतवणूक होते, तशी गुंतवणूकसुद्धा होत नाही. म्हणजेच ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’ अशा निर्देशांकांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजना म्हणजे ‘क्वांट’ योजना नव्हेत. याहून वेगळा प्रकार येथे घडतो. त्यासाठी अशी योजना आखणारी म्युच्युअल फंड कंपनी या योजनेचे धोरण आधी जाहीर करते. हे धोरण काही निकष स्पष्टपणे जाहीर करते.

उदाहरणार्थ, ज्या कंपन्यांना गेल्या सलग दोन वर्षांमध्ये अमुक टक्के नफा झालेला असेल, ज्यांच्या शेअरचा पी/ई रेशो ठरावीक पातळीच्या खाली असेल, ज्यांच्यावरच्या कर्जाचा आकडा शून्य असेल, अशा प्रकारच्या काही निकषांवर उतरणाऱ्या कंपन्यांमध्येच ही योजना गुंतवणूक करेल. तसेच कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये एकूण गुंतवणुकीच्या रकमेपैकी किती रक्कम गुंतवायची हेसुद्धा या निकषांमध्ये ठरवलेले असेल.

आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निकष एकदा ठरले, की त्यानुसार गुंतवणूक केली जात असताना त्यात गुंतवणूक निधी व्यवस्थापक त्यामध्ये अजिबात लुडबूड करणार नाही. निधी व्यवस्थापकाचे काम फक्त ठरलेल्या निकषांनुसार सगळे होत आहे ना, एवढे तपासण्याचे असेल. तसेच काही काळानंतर मुळात ठरवलेले हे निकषच बरोबर आहेत ना, का त्यात बदल करण्याची गरज आहे, हे कदाचित तपासून त्यात सुधारणा केली जाईल.

गुंतवणुकीमधील मानवी हस्तक्षेप टाळणे आणि भावनांच्या भरातील निर्णय त्यामुळे घेतले न जाणे, हे ‘क्वांट’ योजनांचे मुख्य उद्दिष्ट असते, असे आपण म्हणू शकतो.

(लेखक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com