फिनटेक : टोकनायझेशन

‘टोकन’ हा शब्द तसा आपल्याला अपरिचित नाही. पूर्वी बॅंकांमध्ये तर जवळपास सर्व व्यवहार ‘टोकन’ या संकल्पनेशिवाय पूर्ण होऊ शकत नसत.
tokenization
tokenizationsakal

‘टोकन’ हा शब्द तसा आपल्याला अपरिचित नाही. पूर्वी बॅंकांमध्ये तर जवळपास सर्व व्यवहार ‘टोकन’ या संकल्पनेशिवाय पूर्ण होऊ शकत नसत. उदाहरणार्थ, आपल्याला समजा पैसे काढायचे असतील, तर आपण कॅशियरकडे त्यासाठीचा फॉर्म किंवा चेक दिल्यानंतर आपल्याला एक टोकन दिले जाई आणि आपला टोकन क्रमांक येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागत असे. याच टोकनच्या संकल्पनेचा अभिनव वापर आर्थिक व्यवहारांमध्ये खुबीने केला जातो. पण तिथे रांगेत वाट बघण्याच्या हेतूने टोकनचा वापर होत नाही; तर गोपनीय माहिती कोणाच्या हाती लागू नये यासाठी जी यंत्रणा उभी केली जाते तिला ‘टोकनायझेशन’ असे म्हणतात. आपल्या क्रेडिट आणि आता डेबिट या प्रकारच्याही कार्डांचे व्यवहार करीत असताना ही संकल्पना वापरली जाणार असल्यामुळे आपण तिच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

आपण एखाद्या वेबसाइटवरून खरेदी केल्यावर ती वेबसाइट आपल्या कार्डाचे तपशील स्वत:कडे नोंदवून ठेवत असल्यामुळे ती वेबसाइटच हॅक झाली किंवा मुळात अशी वेबसाइटच भोंदू निघाली आणि तिने आपल्या कार्डाचे तपशील भामट्यांना विकून टाकले तर त्याचा फटका आपल्याला विनाकारणच बसतो. हे टाळण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने ‘टोकन’ची संकल्पना एक जानेवारी २०२२ पासून अमलात आणण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे कोणत्याही वेबसाइटला आपल्या कार्डाचे गोपनीय तपशील साठवून ठेवता येणार नाहीत.

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. आपण एका वेबसाइटवर खरेदी करून आपला क्रेडिट कार्ड क्रमांक आणि त्यासंबंधीचे इतर तपशील भरले. नव्या यंत्रणेमधील तरतुदींनुसार संबंधित वेबसाइट हे तपशील ‘टोकनायझेशन’ यंत्रणेकडे पाठवून देणार. ही यंत्रणा आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या १६ अंकी क्रमांकाऐवजी एक १६ अंकी ‘टोकन’ जारी करणार. हे १६ अंकी टोकन आपण खरेदी करीत असलेल्या वेबसाइटकडे परत येणार.

उदाहरणार्थ, समजा आपला क्रेडिट कार्ड क्रमांक ५६४९ १८०१ ३९२२ ८७१० असा असेल, तर त्याऐवजी ३१५१ ६७११ ८३५६ ०९१० असे टोकन मिळाले. हे टोकन संबंधित वेबसाइट आपल्या बॅंकेकडे पाठवेल. ते ग्राह्य मानून आपली बॅंक हा व्यवहार मान्य असल्याची पोच संबंधित वेबसाइटला देईल. संबंधित वेबसाइटला आता आपल्या क्रेडिट कार्डाचे तपशील नोंदवून ठेवता येणार नाहीत. अर्थातच यासाठी बॅंका, टोकन देणारी यंत्रणा अशा सर्वांमध्ये योग्य व्यवहार करण्यासाठीची यंत्रणा आधी बसवावी लागेल.

यामुळे कार्डांचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील, असे मानले जाते. साहजिकच आपण या तरतुदीकडे आशेने बघू शकतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com