कोरोना काळात "क्रेडिट स्कोअर' जपा

अतुल सुळे
Monday, 8 June 2020

"क्रेडिट स्कोअर' ही जणु काही तुमची"कर्जाची कुंडलीच'असते.यामध्ये,तुम्ही कोणकोणत्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून केव्हा,कशासाठी,किती कर्ज घेतले व त्याची परतफेड नियमितपणे केली की नाही याची नोंद असते.

कोविड 19 आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करता यावा म्हणून 27 मार्च 2020 रोजी रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना तीन महिन्यांच्या 'ईएमआय हॉलिडे' जाहीर केला आणि हे देखील स्पष्ट केले की, या काळात वित्तीय संस्थांचे व्याजाचे मीटर सुरूच राहणार आहे. कर्जदारांना दिलासा देताना रिझर्व्ह बँकेने  आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला की, ईएमआय न भरण्याने कर्जदारांचा "क्रेडिट रिपोर्ट' खराब होणार नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेने 22 मे रोजी कर्ज हप्ता स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढविला. तेव्हाही स्पष्ट केले की, "क्रेडिट स्कोअर'वर याचा परिणाम होणार नाही. त्या निमित्ताने हे  रिपोर्ट कोण बनविते, कशा आधारे बनविते, त्यात काय माहिती असते, त्याचा उपयोग काय आणि त्याबाबत असलेले काही प्रमुख गैरसमज आणि वस्तुस्थिती समजून घेणे कर्जदारांसाठी हितावह ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभरातील वित्तीय संस्थानी दर महिन्याला पुरविलेल्या कर्जविषयक माहितीच्या आधारे, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी' प्रत्येक कर्जदाराचा क्रेडिट रिपोर्ट व स्कोअर तयार करते. रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेले काही प्रमुख क्रेडिट ब्युरो असे- ,"सिबील ट्रान्सयुनियन', "एक्सपिरियन', "इक्विफॅक्स', "हायमार्क'पैकी "सिबील' 2001 पासून तर इतर कंपन्या 2010 पासून अस्तित्वात आल्या.

तुमचा "क्रेडिट रिपोर्ट' व "क्रेडिट स्कोअर' ही जणुकाही तुमची "कर्जाची कुंडलीच' असते. या रिपोर्टमध्ये, तुम्ही कोणकोणत्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून केव्हा, कशासाठी, किती कर्ज घेतले व त्याची परतफेड नियमितपणे केली की नाही याची नोंद असते. तुमच्याकडे  किती क्रेडिट कार्ड्स आहेत व त्यांचा तुम्ही कसा वापर करता याची देखील माहिती असते. शिवाय तुम्ही कर्जासाठी कोठे कोठे अर्ज केला होता याची सुद्धा नोंद असते. कर्जदारांनी कोणते कर्ज बुडविले किंवा तडजोड करून "सेटल' केले याची माहिती देखील असते. या सर्वांची माहिती घेऊन मॉडेलच्या आधारे क्रेडिट स्कोअर ठरविण्यात येतो. हा आकडा सर्वसामान्यतः 300 ते 900 च्या दरम्यान असतो. ज्यांचा स्कोअर 750 च्या पुढे असतो त्यांना कमी व्याजदराने अधिक कर्ज मिळू शकते. 

इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्रेडिट स्कोअर विषयी जनमानसात असलेले काही ठळक वस्तुस्थिती आणि गैरसमज

गैरसमज: सहा महिन्यांची मुदतवाढ मंजूर झाल्याने माझा क्रेडिट रिपोर्ट खराब होणार नाही व मला नवीन कर्जे मिळू शकतील.

वस्तुस्थिती: सहा महिन्यांचे हप्ते व व्याज थकविल्याने तुमचा क्रेडिट रिपोर्ट बिघडला  नाही तरी तुमच्या एकूण कर्जात वाढ झाल्याने वित्तीय संस्था नवे कर्ज देताना हात आखडता घेऊ शकतात. 

गैरसमज: माझे उत्पन्न चांगले असल्याने माझा क्रेडिट स्कोअर चांगलाच असणार.

वस्तुस्थिती: क्रेडिट रिपोर्टमध्ये उत्पन्नाचा उल्लेख देखील नसतो. व्यक्तीचे उत्पन्न चांगले असून देखील कर्जाची नियमितपणे फेड करत नसेल तर तिचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल.याउलट एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असून देखील नियमित कर्जफेड करत असल्याने क्रेडिट स्कोअर चांगला असेल. 

गैरसमज: मी आतापर्यंत कधीच कर्ज घेतलेले नाही. म्हणजे माझा रिपोर्ट चांगला असेल.

वस्तुस्थिती: तुम्ही आतापर्यंत कर्ज घेतलेले नाही म्हणजे कोणत्याच वित्तीय संस्थेने तुमची कर्जफेडीची क्षमता तपासलेली नाही. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर रिपोर्ट तयार नसेल व  अशा व्यक्तींना बँका कर्ज देण्यास उत्सुक नसतात. 

गैरसमज: मी अनेक कर्जे काढलेली आहेत, त्यामुळे माझा रिपोर्ट चांगला नसेल.
वस्तुस्थिती: तुम्ही किती कर्जे घेतलीत हे महत्त्वाचे नसून त्याची परतफेड कशी करता आहात ते महत्त्वाचे असते.

गैरसमज: पाच-सहा बँकांनी मला क्रेडिट कार्ड्स दिलेत म्हणजे माझा स्कोअर चांगला असेल.
वस्तुस्थिती: कार्डाच्या संख्येपेक्षा तुम्ही त्याचा वापर कसा करता हे बघितले जाते. लिमिटच्या 30 टक्क्यांपर्यंत वापर चांगला समजला जातो. शिवाय जास्त क्रेडिट कार्ड असणे धोकादायक असते. 

गैरसमज: एका कर्जावरून बँकेबरोबर वाद झाला होता. परंतु मी ते आता फेडून टाकले म्हणजे माझा रिपोर्ट सुधारेल.

वस्तुस्थिती: कर्ज फेडले तरी ते कसे फेडले याची नोंद पुढील 2 ते 3 वर्षेतरी आपल्या क्रेडिट रिपार्टमध्ये राहते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे नियमितपणे कर्ज फेडल्यास स्कोअर वाढतो.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट ब्युरोजना, कर्जदारांना वर्षातून एकदातरी क्रेडिट रिपोर्ट मोफत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जी ब्युरोच्या संकेतस्थळावरून आवश्यक ती माहिती भरून मिळवू शकता.

सध्या कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने जरी सहा महिन्यांसाठी "ईएमआय हॉलिडे' जाहीर केला असला तरी, सर्वच कर्जासाठी "ईएमआय हॉलिडे' या सवलतीचा फायदा घेऊ नका. कारण ही कर्जमाफी नाही भविष्यात कर्ज परतफेड करावीच लागणार आहे. त्यामुळे "ईएमआय हॉलिडे' संपल्यावर एकदम येणार नाही. परिणामी तुमचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला राहील.

लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule artcle about credit score