कशी होती दिवाळी; कशी असेल दिवाळी?

अतुल सुळे
Monday, 16 November 2020

गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत सोने, चांदी, शेअर्सनी कसा परतावा मिळवून दिला तसेच पुढील दिवाळीपर्यंत याच ‘ॲसेट क्लास’मधून किती परतावा मिळणे अपेक्षित आहे, हे समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी हितावह ठरेल.

विक्रम संवत २०७६ नुकतेच संपले व २०७७ सुरू झाले. अशा वेळी गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंत सोने, चांदी, शेअर्सनी कसा परतावा मिळवून दिला तसेच पुढील दिवाळीपर्यंत याच ‘ॲसेट क्लास’मधून किती परतावा मिळणे अपेक्षित आहे, हे समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी हितावह ठरेल.

सोने - २०१९ च्या दिवाळीला सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव रु. ३८,६३० होता, जो या दिवाळीला रु. ५०,५३६ पर्यंत वाढला; म्हणजेच ३०.८२ टक्के परतावा! कोविड, जागतिक व्यापारयुद्ध, अमेरिकेतील निवडणुकीची अनिश्चितता, यामुळे भाव वाढले. तज्ज्ञांच्या मते, पुढील दिवाळीपर्यंत हाच ‘ट्रेंड’ चालू राहून सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव रु. ६०,००० पर्यंत जाऊ शकतो; म्हणजेच १८ ते २० टक्के परतावा अपेक्षित आहे.

चांदी - दिवाळी ते दिवाळी विचार केल्यास चांदीने सर्वाधिक परतावा दिला. गेल्या दिवाळीला एक किलो चांदीचा भाव रु. ४६,८२० होता, जो या दिवाळीला रु. ६२,७०४ वर गेला; म्हणजेच सुमारे ३४ टक्के परतावा! ऑगस्ट २०२० मध्ये हा भाव रु. ७८,००० पर्यंत वाढला होता. जागतिक अर्थव्यवस्था सुधारून औद्योगिक मागणी वाढल्यास चांदीचा भाव पुढील दिवाळीपर्यंत प्रत किलो रु. ८०,००० ते ८६,००० पर्यंत वाढू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

शेअर्स - गेल्या दिवाळीपासून ‘सेन्सेक्स’ सुमारे १० टक्के वाढला असला, तरी मार्च २०२० मध्ये ‘कोविड’च्या भीतीमुळे झालेल्या पडझडीत ज्यांनी खरेदी करायची हिंमत दाखविली, त्यांना ५० ते ६० टक्के परतावा मिळाला. पुढील दिवाळीपर्यंत हा निर्देशांक ४७,००० अंशांपर्यंत गेलेला असेल; म्हणजेच ८ टक्के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मिडकॅप, स्मॉलकॅप कंपन्यांकडून उत्तम परताव्याची अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule article diwali