
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत २०१४ मध्ये ‘सुकन्या समृद्धी योजना’ (एसएसवाय) सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसा जमविणे असे आहे.
सुकन्या शिकली, समृद्धी लाभली!
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत २०१४ मध्ये ‘सुकन्या समृद्धी योजना’ (एसएसवाय) सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसा जमविणे असे आहे. ही एक अल्पबचत योजना असून, १० वर्षांच्या आतील मुलींचे खाते बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमीत कमी रुपये २५० व जास्तीत जास्त रुपये १,५०,००० जमा करता येतात. या गुंतवणुकीवर प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत वजावट मिळते. व्याज; तसेच मुदतपूर्तीच्या वेळी मिळणारी रक्कम करमुक्त असते. या योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज मिळते व हा व्याजदर, दर तीन महिन्यांनी बदलू शकतो. सर्व अल्पबचत योजनांमध्ये हा व्याजदर सर्वाधिक आहे.
हे खाते उघडल्यापासून पुढील १५ वर्षे रक्कम भरावी लागते. योजनेची मुदत २१ वर्षे असली तरी मुलगी १८ वर्षांची झाली किंवा १० वी उत्तीर्ण झाली, की अर्धी रक्कम काढता येते. सध्याचा व्याजदर विचारात घेता, तुम्ही या योजनेत दर वर्षी रुपये १०,००० भरल्यास २१ वर्षांनंतर रु. ४,३९,००० मिळू शकतात आणि जर तुम्ही दरवर्षी रुपये १,५०,००० भरू शकलात तर २१ वर्षांनंतर तुम्हाला रु. ६६,००,००० मुलीच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी मिळू शकतील. पुढे हीच सुशिक्षित सुकन्या स्वतःला आणि एका कुटुंबाला समृद्धी आणेल, अशी अपेक्षा आहे.
मूळ योजनेत झालेल्या काही सुधारणा बऱ्याच जणांना माहीत नसल्याने, त्यांची माहिती करून घेणे मुलींच्या पालकांसाठी हितावह ठरेल. त्या सुधारणा अशा-
पूर्वी १० वर्षांवरील मुलगी या खात्यावर व्यवहार करू शकत होती. आता हे वय १८ वर्षे करण्यात आले आहे.
या खात्यावर आर्थिक वर्षात कमीत कमी रुपये २५० न भरल्यास ते खाते ‘डिफॉल्ट’ म्हणजे ‘अनियमित खाते’ मानून त्यावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या व्याजदराने, म्हणजे ४ टक्क्यांनी व्याज देण्यात येत असे. आता ते, नियमित व्याजदराने, म्हणजे सध्या ७.६ टक्के दराने देण्यात येईल.
मुलीचा किंवा पालकांचा मृत्यू झाल्यास, हे खाते मुदत पूर्ण होण्याआधी बंद करता येत होते. आता ते गंभीर आजार झाल्याससुद्धा बंद करता येईल.
हे खाते जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच उघडता येत असे. परंतु आता काही विशिष्ट परिस्थितीत तीन मुलींसाठीसुद्धा उघडता येईल. उदाहरणार्थ, पहिल्याच खेपेला तिळे (मुली) जन्माला येणे किंवा पहिल्या मुलीनंतर जुळ्या मुली जन्माला येणे.
खात्यात नियमित पैसे न भरल्यास जमा केलेले व्याज परत घेण्याची तरतूद पूर्वी होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे.
या सुधारणांमुळे ही योजना अधिकच आकर्षक झाली आहे. मुलगी जन्माला येताच हे खाते उघडून, त्यात पुरेशी रक्कम जमा करून, आपल्या सुकन्येचे भविष्य सुरक्षित करणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. तसे केले तरच ‘सुकन्या शिकली, समृद्धी लाभली!’ असे म्हणता येईल.
Web Title: Atul Sule Writes About Beti Bachao Beti Padhao Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..