esakal | लाभांशावर आता  ‘टीडीएस’
sakal

बोलून बातमी शोधा

TDS

एक एप्रिल २०२० पासून कंपन्या (शेअर्स) आणि म्युच्युअल फंडावरील लाभांश वितरण कर  रद्द करण्यात येणार आणि लाभांश घेणाऱ्या गुंतवणूकदारांना आपापल्या ‘टॅक्‍स ब्रॅकेट’ प्रमाणे प्राप्तिकर भरावा लागणार!

लाभांशावर आता  ‘टीडीएस’

sakal_logo
By
अतुल सुळे

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लाभांशावर (डिव्हिडंड) कर आकारण्याच्या पद्धतीत एक महत्त्वाचा बदल जाहीर केला होता. तो म्हणजे, एक एप्रिल २०२० पासून कंपन्या (शेअर्स) आणि म्युच्युअल फंडावरील लाभांश वितरण कर (डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्‍स) रद्द करण्यात येणार आणि लाभांश घेणाऱ्या गुंतवणूकदारांना आपापल्या ‘टॅक्‍स ब्रॅकेट’ प्रमाणे प्राप्तिकर भरावा लागणार! त्याआधी म्हणजेच ३१ मार्च २०२० पर्यंत जाहीर केलेल्या लाभांशावर संबंधित कंपन्या किंवा म्युच्युअल फंड कंपन्या २०.५६ टक्के ‘डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्‍स’ सरकारला भरत असत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात येणारा लाभांश हा करमुक्त होत असे. परंतु, आता मात्र गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश हा करपात्र असेल. या लाभांशातून उद्‌गम करकपात (टीडीएस) केली जाणार आहे. संबंधित गुंतवणूकदाराचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेच्या असेल तर त्याला ‘टीडीएस’ टाळता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याला फॉर्म १५जी अथवा १५एच वेळेवर सादर करणे आवश्‍यक आहे. याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात असलेल्या काही ठळक शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
प्रश्‍न - उद्‌गम करकपातीसाठी (टीडीएस) काही ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ आहे का? 
 होय, आर्थिक वर्षात लाभांशातून होणारे उत्पन्न रु. पाच हजारांपेक्षा अधिक असेल तर ‘टीडीएस’ होणार. 

प्रश्‍न - ‘टीडीएस’चा दर काय आहे? 
 एक एप्रिल २०२० ते १३ मे २०२० पर्यंत ‘टीडीएस’चा दर १० टक्के आहे. १४ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत हा दर ७.५ टक्के असणार आहे. ‘कोरोना’च्या साथीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यास साह्य म्हणून अर्थमंत्र्यांनी हा दर १४ मे २०२० पासून कमी केला आहे. 

प्रश्‍न - ‘पॅनकार्ड’ची नोंदणी, कंपनी/आरटीए/डीपीकडे केली नसल्यास जास्त ‘टीडीएस’ होतो का? 
 होय, अशा परिस्थितीत २० टक्के ‘टीडीएस’ होतो. त्यामुळे ‘पॅनकार्ड’ची नोंदणी जरूर करावी. 

प्रश्‍न - फॉर्म १५जी अथवा १५एच देऊन उद्‌गम करकपात टाळता येते का? 
 होय, आपण ‘टॅक्‍स ब्रॅकेट’मध्ये येत नसल्यास फॉर्म १५जी (ज्येष्ठ नागरिक नसल्यास) अथवा फॉर्म १५एच (ज्येष्ठ नागरिक असल्यास) सादर करून उद्‌गम करकपात टाळता येते. 

प्रश्‍न - हे फॉर्म कोठे सादर करावे लागतात? 
 आपल्या नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवरून आपण हे फॉर्म संबंधित कंपनी, म्युच्युअल फंड, डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) अथवा रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट (आरटीए) यांच्याकडे सादर करू शकता. 

प्रश्‍न - मला याबाबतचे ‘टीडीएस सर्टिफिकेट’ मिळते का व असेल तर ते कोठून मिळते? 
 लाभांशावर उद्‌गम करकपात झाली असल्यास ‘२६एएस’ या स्टेटमेंटमध्ये दिसणे अपेक्षित आहे. तुम्ही ‘ट्रेसेस’ या संकेतस्थळावरून फॉर्म १६-ए डाउनलोड करू शकता. 

प्रश्‍न - फॉर्म १५जी किंवा १५एच दिल्याने लाभांश करमुक्त होतो का? 
 नाही, हे फॉर्म दिल्याने फक्त ‘टीडीएस’ होत नाही. पण मिळणारा लाभांश हा आपल्या उत्पन्नाच धरला जातो आणि आपापल्या ‘टॅक्‍स ब्रॅकेट’नुसार करपात्र ठरतो.

(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार आहेत.)