वेध बाजाराचा : शेअर बाजाराची चौफेर टोलेबाजी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
वेध बाजाराचा : शेअर बाजाराची चौफेर टोलेबाजी!

वेध बाजाराचा : शेअर बाजाराची चौफेर टोलेबाजी!

सन २०२०, २०२१ आणि २०२२ चे वर्णन आपण लाल दिवा, पिवळा दिवा व हिरवा दिवा असे ट्रॅफिक सिग्नलच्या भाषेत करू शकतो. २०२० मध्ये कोरोनाच्या महासाथीने सर्व जगाला खिळवून ठेवले होते. हे वर्ष लवकरात लवकर विसरलेलेच बरे. पुढे २०२१ मध्ये सावधगिरी बाळगत जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आणि आता नववर्षात, गेल्या दोन वर्षांतील नुकसान भरून काढण्यासाठी सर्वजण जोरदार प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे, बघूया प्रत्यक्षात काय घडते ते!

सन २०२१ हे वर्ष ‘इक्विटी- शेअरचे वर्ष’ असे म्हणावे लागेल; कारण या वर्षात शेअर बाजाराने चौफेर टोलेबाजी करीत गुंतवणूकदारांना मालामाल केले. गेली काही वर्षे बाजाराचे निर्देशांक वाढत होते, पण ते केवळ काही ठराविक शेअरच्या जोरावर. परंतु, २०२१ मध्ये सर्वांच्याच शेतात पाऊस पडलेला दिसला. मार्च २०२० मधील २५-२६ हजारांच्या पातळीपासून ‘सेन्सेक्स’ने ५०-६० हजारांची विक्रमी पातळी ओलांडून १०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला. मिडकॅप, स्मॉलकॅप कंपन्यांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली. प्राथमिक भांडवल बाजारातही (आयपीओ) जबरदस्त तेजी बघायला मिळाली. २०२१ मध्ये ६३ कंपन्यांची नव्याने नोंदणी झाली व त्यांनी बाजारातून १.१८ लाख कोटी रुपये जमा केले. यातील काही छोट्या कंपन्यांचे भाव चौपट झाले! नव्या वर्षातही सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे ‘आयपीओ’ बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे, त्यापैकी ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी (३१ डिसेंबर) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘निफ्टी’ १७,३५४ अंशांवर, तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ ५८,२५३ अंशांवर बंद झाला, म्हणजेच वर्षभरात ‘निफ्टी’ने २४ टक्के, तर ‘सेन्सेक्स’ने २२ टक्के परतावा दिला. २०२१ मध्ये स्मॉलकॅप कंपन्यांनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५९ टक्के परतावा दिला, तोही २०२० च्या ३१ टक्के परताव्यानंतर! मिडकॅप कंपन्यांनी २०२१ मध्ये ३७ टक्के परतावा दिला, तोही २०२० च्या १९ टक्के परताव्याउपरांत! लार्जकॅप निर्देशांकांनी सुमारे २१ टक्के परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला, २०२० च्या १४ टक्के परताव्यानंतर! अशाप्रकारे इक्विटी- शेअरनी २०२१ गाजविले. काही तज्ज्ञांच्या मते, नव्या वर्षात ‘निफ्टी’ २१,००० अंशांपर्यंत, तर ‘सेन्सेक्स’ ७२,००० अंशांपर्यंत मजल मारू शकतो, म्हणजेच हे निर्देशांक २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकतात, जर महागाई व महासाथ आटोक्यात राहिली तर...

सेक्टरचा विचार केल्यास २०२१ मध्ये मेटल क्षेत्राने सर्वोत्तम कामगिरी केली. या निर्देशांकाने ७० टक्के परतावा दिला. वेदांत, हिंदाल्को यांचे भाव दुप्पट झाले. त्याखालोखाल आयटी क्षेत्राची कामगिरी होती. या निर्देशांकाने ५८ टक्के परतावा दिला. रिअल इस्टेट क्षेत्राने ५३ टक्के परतावा देत भरीव कामगिरी केली. डीएलएफ, ब्रिगेड इंटरप्राईजेस यांनी उत्तम परतावा दिला.

सरलेल्या वर्षात सोन्या-चांदीने (-) ४.७४ टक्के व (-) ९.४६ टक्के परतावा दिला असला तरी तो गेल्या दोन वर्षांतील भरीव कामगिरीनंतर हे लक्षात घेतले पाहिजे. नव्या वर्षात सोने प्रति १० ग्रॅम रुपये ५२,५०० पर्यंत, तर चांदी औद्योगिक मागणीमुळे प्रति किलो रुपये ७४,५०० पर्यंत जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

२०२१ मधील नियमित उत्पन्न देणाऱ्या म्हणजे फिक्स्ड इन्कम गुंतवणुकीची कामगिरी एकंदरीत निराशाजनकच होती. नव्या वर्षात वाढत्या महागाईमुळे व्याजाचे दर वाढण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्राची कामगिरीसुद्धा ‘यिल्ड’च्या दृष्टीने निराशाजनक ठरली. रेंटल यिल्ड २-३ टक्के, तर कमर्शियल जागेचा यिल्ड ७-८ टक्के पडला. असे असले तरी कोणत्याही एकाच क्षेत्रात सर्व किंवा अधिक गुंतवणूक न करता आपली संपत्ती विविध ‘ॲसेट क्लास’मध्ये विभागून ठेवणे श्रेयस्कर ठरते, कारण कोणता ‘ॲसेट क्लास’ कधी उत्तम कामगिरी करेल, हे सांगणे कठीण असते.

(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share MarketAtul Sule
loading image
go to top