"एडलवाईज टोकियो लाईफ"ची अवयवदानावर जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

देशात अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स' या विमा कंपनीने पुढाकार घेतला आहे.

मुंबई : देशात अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स' या विमा कंपनीने पुढाकार घेतला आहे. "एडलवाईज टोकियो लाईफ"ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 24 टक्के भारतीयांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असून केवळ 3 टक्के भारतीयांनी अवयवदानासाठी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

एडलवाईज टोकियो लाईफ, मोहन फाउंडेशन आणि अभिनेता राहुल बोस यांच्या संयुक्त उपक्रमातून नोव्हेंबर महिना अवयवदान जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. देशात दरवर्षी पाच लाख व्यक्ती अवयव उपलब्ध न झाल्याने दगावतात. अवयवदानाबद्दल समाजाला जागरूक केल्यास अवयवदानाची मोहीम भक्कम होईल, असे मत एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक सुमीर राय यांनी व्यक्त केले.

विमा कंपनी म्हणून आम्ही व्यावसायिक गुंतवणूक करत असतो. आता अवयवदान मोहीमेसाठी पुढाकार घेऊन आम्ही सामाजिक गुंतवणूक करत आहोत, असे एडलवाईज समूहाचे अध्यक्ष राशेश शहा यांनी सांगितले. एक व्यक्ती अवयवदान करून नऊ जणांना जीवदान देऊ शकते, असे मत मोहन फाउंडेशनचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सुनील श्रॉफ यांनी व्यक्त केली. अवयवदानाबाबत गैरसमज दूर केल्यास नागरिक पुढे येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

राहुल बोसने केले अवयवदान 

वेगळ्या धाटणीचा अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता राहुल बोस याने अवयवदान केले आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, अवयवदानाने आपण दुसऱ्या नवे आयुष्य देतो. अवयव उपलब्ध न झाल्याने मित्रपरिवारात झालेल्या दु:खद प्रसंगानंतर आपण अवयवदानाचा निर्णय घेतल्याचे बोस यांनी सांगितले. 

web title :  Awareness on the organ donation by  "Edelweiss Tokyo Life"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness on the organ donation by "Edelweiss Tokyo Life"