काळाचे भान ठेवूया, वेळेवर इच्छापत्र करूया !

वर्षे इच्छापत्र या विषयावर जनजागृतीचे काम करीत आहेत.
 इच्छापत्र
इच्छापत्र sakal

इच्छापत्र तर करायचे ठरले. पण ते केव्हा करावे? कधी करावे? हे प्रश्न मनात येऊ लागतात. याचे उत्तर अगदी सोपे आहे. ‘ज्येष्ठ नागरिक’ असा मानाचा किताब पदरी आला, की ताबडतोब इच्छापत्र करावे. नोकरीमधून निवृत्त झालो आहे, पण अजून ‘साठी’ गाठली नाही, तरी मृत्युपत्र करावे. तरुण वयात स्थावर संपत्ती नावावर झाली आहे, अशा वेळी इच्छापत्र करावेच. कुठल्या दुर्घर आजाराने गाठले आहे, आता आपल्या माघारी आपली पत्नी अथवा आपले पती, मुले, आपले वृद्ध आई-वडील यांची सोय कशी करावी, यासाठी सुद्धा इच्छापत्र करण्याची गरज भासते. एका महासाथीच्या संकटातून आपण सारे सावरतो आहोत, तेव्हा अकाली आलेल्या मृत्युच्या सावटाने सुद्धा आपल्या सर्वांना इच्छापत्र करणे किती गरजेचे असते हे शिकवले आहे.

पुढे दिलेली गोष्टीरूप उदाहरणे बघूया-

फक्त बत्तीस वर्षाच्या अनुजाने, स्वतःच्या हुशारीवर आणि हिमतीवर मोठा बंगला बांधला. तिने अजून स्वतःच्या संसाराचा विचार केला नव्हता. पण तरीही तिने आपल्या स्थावर व जंगम संपत्तीसाठी नोंदणीकृत ‘विल’ केले. तिला हे माहिती होते, की इच्छापत्र कितीही वेळा बदलता येते. त्यामुळे पुढे तिचा संसार सुरु झाल्यावर तिने ‘विल’ बदलले. बदलत्या काळानुसार तिने आपले योग्य वारस इच्छापत्रात लिहून ठेवले. समजा आपले आकस्मिक निधन झाले, तर आपली संपत्ती, योग्य वारसांच्या हाती पडेल अशी चोख व्यवस्था, वेळेचे भान ओळखून केली.

‘विल’ करायचे मनात होते; पण आज करू, उद्या करू अशी चालढकल करत शेवटी सुधाकरकाका ऐंशी वर्षांचे झाले. पत्नीने सुद्धा पंचाहत्तर वर्षे पार केली. त्यांना स्वतःला कमी दिसत होते, पत्नीला ऐकू येत नव्हते. अशा स्थितीत मृत्युपत्राचा दस्त करताना खूप त्रासाचे झाले. इतके थकल्यावर, अगदी चाकाच्या खुर्चीत स्थापना झाल्यावर इतके महत्त्वाचे दस्तऐवज करणे किती अवघड असते, हे दोघांना समजले होते.

आज यशवंतराव निवृत्त झाले. कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आता यशवंतकाकांना आणि त्यांच्या पत्नीला स्वतःचे आयुष्य जगायचे होते. राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. दोघे जण सक्षम असताना, मन, बुद्धी आणि शरीर ठीकठाक असताना, त्यांनी आपली उर्वरित संपत्ती योग्य वारसांना मिळेल, यासाठी संयुक्त इच्छापत्र बनवले आणि दोघे चिंतामुक्त झाले.

इच्छापत्र करण्याचा विचार मनात आला, की तो ताबडतोब अमलात आणला पाहिजे. करू पुढच्या महिन्यात, मुले गावी गेली, की बघूया. अशी कारणे देत वेळकाढूपणा अजिबात करू नये. इच्छापत्रात संपत्तीमधील बदल, वध-घट, हे सारे उल्लेख स्पष्टपणे करून कलमे लिहावीत. आपल्या दोघांच्या हयातीत होणारे खर्च झाल्यावर उर्वरित संपत्ती वारसांना द्यावयाची असते. आपल्या कष्टाच्या संपत्तीचे आपल्या पश्चात काय करायचे आहे? कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे? ही सारी कलमे आपल्या हयातीनंतर जी संपत्ती उरेल, त्या उरलेल्या संपत्तीसाठी ‘विल’ बनवायचे असते.

अगदी विकलांग स्थिती होईपर्यंत वाट बघू नये. आपले मन, बुद्धी आणि शरीर साथ देत आहेत, तोवरच सुजाण व्यक्तींनो, ओळखूया काळाची पावले आणि चालढकल, आळस सोडून, नोंदणीकृत इच्छापत्र बनवूया!

(लेखिका निवृत्त बँक कर्मचारी आहेत.गेली अनेक वर्षे इच्छापत्र या विषयावर जनजागृतीचे काम करीत आहेत. इच्छापत्र या विषयावरील सविस्तर लेख ‘सकाळ मनी’ या मासिकात प्रसिद्ध होत असतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com