बँकिंग क्षेत्रातील शेअर लाभदायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HDFC

बँकिंग क्षेत्रातील शेअर लाभदायी

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ६१,६६३ अंशांवर तर ‘निफ्टी’ १८,३०७ अंशांवर बंद झाले. गेल्या शुक्रवारी जागतिक पातळीवर संमिश्र संकेत मिळाल्याने शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने ८७ अंशांची तर ‘निफ्टी’ने ३६ अंशांची घसरण दर्शविली. मध्यम अवधीच्या आलेखानुसार ऑक्टोबर २०२१ पासून ‘सेन्सेक्स’ तसेच ‘निफ्टी’ अद्यापही ‘ब्रेक आऊट’च्या प्रतीक्षेत हेलकावे घेत असताना, बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक ‘बँक निफ्टी’ने गेल्या शुक्रवारी ४२,४३७ अंशांवर बंद भाव देत तेजीचा कल दर्शविला आहे. ऑक्टोबर २०२१ पासून तो ४१,८२९ ते ३२,१५५ या पातळ्यांमध्ये चढउतार दर्शवित होता.

गेल्या दहा वर्षांत भारत अनेक समस्यांमधून वाटचाल करत करत आहे. बँकिंग क्षेत्राचा विचार करता नोटाबंदी, कॉर्पोरेट अनुत्पादित कर्ज, एनबीएफसी संकट, कोविड अशा अनेक घटनाक्रमांमध्ये भारतीय बँकांनी मार्गक्रमण केले आहे. कॉर्पोरेट लोन अंडररायटिंग,अनुत्पादित कर्ज ओळख,अनुत्पादित कर्ज वसुली आदी प्रक्रियेत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली आहे. किरकोळ ठेवींचे दर गेल्या सहा ते नऊ महिन्यांत वाढले आहेत, मात्र गेल्या सहा महिन्यांत कर्जवाढीचा वेगदेखील वाढला आहे. बँकांनी ‘आरबीआय’च्या व्याजदरातील वाढ कर्जाच्या दरांपर्यंत पोचवण्यास तत्परता दाखवली असली तरी, ते त्यांच्या दायित्वांमध्ये म्हणजेच ठेवींमध्ये हस्तांतरित करण्याचा वेग तुलनेने कमी आहे.

निव्वळ व्याज मार्जिन म्हणजे बँक किंवा इतर वित्तीय संस्थेने कर्जावर कमावलेले व्याज उत्पन्न आणि तिच्या ठेवीदारांना दिलेले व्याज यांच्यातील फरकाचे मोजमाप. बँका अर्थातच ठेवींचे व्याजदर वाढवत आहेत; परंतु बँकांना शक्यतो निव्वळ व्याज मार्जिन कायम ठेवायचे आहे, म्हणूनच ते जास्त ठेवी दर देऊ करत नाहीत आणि हा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्याने बँकांच्या निव्वळ नफ्यात झपाट्याने वाढ नोंदवली आहे. निव्वळ व्याज मार्जिन व्यवस्थापन करून वाढत्या व्याज दरांमुळे बँका बचतकर्त्यांना जे पैसे देतात आणि कर्जदारांकडून जे कमवतात यामधील फरकातून अधिक कमाई करू शकतात.

ऐतिहासिकदृष्ट्या, ‘आरबीआय’चा रेपो दर एप्रिल २००९ मधील ४.७५ टक्के नीचांकावरून जानेवारी २०१४ मध्ये आठ टक्क्यांपर्यंत वाढले. या कालावधीत भांडवलावर उत्तम परतावा मिळवत प्रगती करणाऱ्या अनेक कंपन्यांच्या शेअरनीदेखील केवळ सहा महिन्यांच्या परताव्यात प्रचंड चढउतार दर्शविला, मात्र दीर्घावधीमध्ये व्यवसाय वृद्धीला प्राधान्य देत निर्देशांकापेक्षा उत्तम परतावा दिला. नोव्हेंबर २०१० ते मार्च २०१४ या काळात ‘सेन्सेक्स’ने २१,१०० ते १५,१३५ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढउतार दर्शविला. २०१० ते २०१४ या काळात निव्वळ व्याज मार्जिन व्यवस्थापन, उच्च दर्जाचे अंडररायटिंग आणि अनुत्पादित कर्जांचे प्रमाण कमी ठेऊन बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक, कोटक बँक तसेच कर्ज वितरण व्यवसायात गुंतलेली बजाज फायनान्स या कंपन्यांनी व्यवसाय वृद्धी केली, तसेच या कंपन्यांच्या शेअरनीदेखील या काळात निर्देशांकापेक्षा उत्तम परतावा दिला.

खासगी क्षेत्रातील बँकांना देशांतर्गत वाढत्या आर्थिक बचतीद्वारे वित्तपुरवठा केला जात आहे. खासगी क्षेत्रातील बँका गेल्या १० वर्षांत कर्ज पुरवठ्यात प्रति वर्ष साधारण १८ टक्के दराने प्रगती करत आहेत, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका वार्षिक सात टक्के वाढ नोंदवू शकल्या आहेत. या आकडेवारीनुसार, एचडीएफसी, कोटक बँक या बँकांनी गेल्या दहा वर्षात मालमत्ता आणि दायित्व या दोन्ही बाजूंनी मजबूत पाया तयार केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, दीर्घावधीमध्ये एकूणच बँकिंग क्षेत्रातील होणारी प्रगती, ध्रुवीकरण तसेच एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांचे संभाव्य विलीनीकरण आणि व्यवसाय वृद्धीचा विचार करता सध्या एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १,६१३) तसेच इक्विटीवर उत्तम परतावा देत कर्ज वितरणात गेल्या १० वर्षांमध्ये सर्वांत वेगाने वाढणाऱ्या बजाज फायनान्स (शुक्रवारचा बंद भाव रु. ६,७९१) या कंपन्यांच्या शेअरमध्ये धोका लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)