esakal | बॅंकिंग सेवा महागणार? 
sakal

बोलून बातमी शोधा

बॅंकिंग सेवा महागणार? 

बॅंकिंग सेवा महागणार? 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - गेल्या पाच वर्षांत चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची सेवा नि:शुल्क उपभोगलेल्या ग्राहकांना सेवाशुल्कापोटी पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. वस्तू आणि सेवाकर महासंचालकांनी बॅंकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत कर भरण्याची नोटीस पाठवली असून, या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेपास नकार दिला आहे. परिणामी, सेवा शुल्काचा भुर्दंड ग्राहकांकडून वसूल करण्याचे संकेत बॅंकांनी दिले आहेत. आजपासून बॅंकांकडून सेवा शुल्काची वसुली केली जाण्याची शक्‍यता आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

वस्तू आणि सेवा करापोटी बॅंकांकडे जवळपास 15 हजार कोटींचा कर थकीत आहे. व्याज आणि दंडात्मक शुल्कामुळे थकबाकी तब्बल 35 हजार कोटींपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे बॅंकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांतील नि:शुल्क सेवांचा कर भरण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाने बॅंकांकडे तगादा लावला आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत करग्राहकांकडून वसूल करण्याची तयारी बॅंकांनी केली असल्याचे इंडियन बॅंक असोसिएशनच्या सूत्रांनी म्हटले आहे. किमान शिलकीच्या खातेधारकांना सर्वाधिक फटका बसेल. यापुढे चेकबुक, नवे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागतील. 

बॅंकांचे धाबे दणाणले 
पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत कर भरण्याची नोटीस बॅंकांना पाठविण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेकडे सर्वाधिक 6 हजार 500 कोटींची कर थकबाकी आहे. आयसीआयसी बॅंक 3 हजार 500 कोटी, ऍक्‍सिस बॅंक 2 हजार 500 कोटी आणि भारतीय स्टेट बॅंकेकडे एक हजार कोटींची थकबाकी आहे. 

loading image