उद्यापासून तीन दिवस बॅंका बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

 पगारवाढ व सेवाशर्तींतील सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे 31 जानेवारी, एक आणि रविवार दोन फेब्रुवारी असे तीन दिवस बॅंका बंद राहणार असून, या संपात देशभरातील दहा लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मुंबई  - पगारवाढ व सेवाशर्तींतील सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे 31 जानेवारी, एक आणि रविवार दोन फेब्रुवारी असे तीन दिवस बॅंका बंद राहणार असून, या संपात देशभरातील दहा लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

बॅंक कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर 2017 पासून नवीन वेतनश्रेणी लागू व्हायला हवी होती; पण 27 महिन्यांपासून वाटाघाटी सुरू असूनही तोडगा निघालेला नाही. दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांसमोरही वाटाघाटी झाल्या; मात्र बॅंक प्रशासनाने तोट्याचे कारण सांगत पगारवाढ देणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले. बॅंका नफ्यात आहेत; पण थकीत कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीमुळे तोटा होतो. या थकीत कर्जांत 79 टक्के वाटा मोठ्या उद्योगांचा आहे, असे युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले. 

केंद्र सरकारने पाच वर्षांत जनधन, सामाजिक सुरक्षिततेच्या विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आधार जोडणी, मुद्रा आदी योजना राबवल्या. त्यामुळे बॅंकांमधील कामाचा बोजा वाढला. बॅंकांनी कर्मचाऱ्यांचा मृत्यू, राजीनामा, निवृत्ती, पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागा भरल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा खूप वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंक कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी योग्य ठरते, अशी भूमिका तुळजापूरकर यांनी मांडली. 

"आम्हाला शिक्षा का?' 
रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय बॅंकांतून 2018-19 अखेर 48 कर्जखाती प्रत्येकी 10 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची आहेत. 739 खात्यांनी प्रत्येकी 100 कोटींचे कर्ज थकवले आहे. पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकीची तब्बल 6699 खाती आहेत. एकूण थकीत कर्जाच्या 16.4 टक्के रक्कम 100 मोठ्या कर्जदारांकडे आहे. बॅंकांच्या दुरवस्थेला मोठे कर्जदार जबाबदार असताना सामान्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिक्षा का, असा प्रश्‍न युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने उपस्थित केला आहे. 

या संपात राज्यातील 10 हजार बॅंक शाखांमधील 40 हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, जुन्या खासगी बॅंका, विदेशी बॅंका, ग्रामीण बॅंकांतील कर्मचारी व अधिकारी संपात भाग घेतील. त्यामुळे 31 जानेवारी व एक फेब्रुवारीला राज्यातील बॅंकिंग ठप्प होईल. 
- देविदास तुळजापूरकर, निमंत्रक, युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks closed for three days from tomorrow