esakal | नवीन बॅंक आणि तुम्ही...
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन बॅंक आणि तुम्ही...

बॅंकांचे एकत्रीकरण करण्यात आल्यामुळे ग्राहकावर निश्‍चितच परिणाम होणार आहे व त्यासाठी बॅंक ग्राहकाने देखील आवश्‍यक ती पाऊले उचलणे आवश्‍यक आहे.

नवीन बॅंक आणि तुम्ही...

sakal_logo
By
सुधाकर कुलकर्णी

केंद्र सरकारने एक एप्रिल रोजी सार्वजनिक क्षेत्रातील दहा बॅंकांचे एकत्रीकरण करून त्यातून चार बॅंकांची निर्मिती केली. बॅंकांचे एकत्रीकरण करण्यात आल्यामुळे ग्राहकावर निश्‍चितच परिणाम होणार आहे व त्यासाठी बॅंक ग्राहकाने देखील आवश्‍यक ती पाऊले उचलणे आवश्‍यक आहे. जी बॅंक मुख्य (अँकर) बॅंकेत विलीन झाली आहे त्या बॅंकेच्या ग्राहकावर परिणाम होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- बॅंकेच्या ग्राहकाने काय करावे किंवा करू नये. 

1)ग्राहकाने घाबरून जाऊन सध्याच्या बॅंकेतील खाते बंद करू नये किंवा बॅंकेतील मुदत ठेव (एफडी) मोडू नये. तुमची बॅंक ज्या बॅंकेत विलीन झाली आहे, ती एक सक्षम राष्ट्रीयकृत बॅंक असून ठेवी व बचत खात्यातील शिल्लक रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे. 

2)तुमची बॅंक ज्या बॅंकेत विलीन झाली आहे त्या बॅंकेचे व्याजदर ( ठेवींचे व कर्जाचे), सेवा शुल्क (सर्व्हिस चार्जेस), लॉकरचे भाडे, क्रेडिट-डेबिट कार्डची वार्षिक फी, विनाशुल्क देऊ करत असलेल्या सेवा, बचत खात्यावर किमान शिल्लक रकमेची अट( मिनिमम बॅलन्स कंडीशन) या बाबी समजून घ्या. 

3)ज्या मुख्य बॅंकेत तुमची बॅंक विलीन झाली आहे त्या बॅंकेचा नवीन 'कस्टमर आयडी', खाते क्रमांक, बॅंकेचा 'आयएफसी कोड' दिला जाईल. या खात्यावर तुमचा निवासाचा पत्ता' मोबाईल नंबर, ई-मेल नोंदविला गेला असल्याची खात्री करून घ्या. गरज असल्यास नव्याने नोंदणी करा. जर आपले खाते विलीन झालेल्या दोन बॅंकेत असेल व या दोन्ही बॅंका एकाच बॅंकेत विलीन झाल्या असतील तर या दोन्ही खात्यांसाठी एकच 'कस्टमर आयडी' दिला जाईल. 

4)मुख्य बॅंक वेळोवेळी देत असलेल्या सुचनांकडे लक्ष ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका या काळात बॅंकेतून बोलतोय असे सांगून खात्याबाबत माहिती मागितली तर कोणत्याही प्रकारची माहिती फोनवर देऊ नका. आलेली मेल बॅंकेकडूनच आली आहे याची खात्री करू घ्या. अन्यथा नवीन बॅंकेला फोन करून अथवा समक्ष जाऊन खात्री करून घ्या. 

5)ज्या ठिकाणी 'ईसीएस पेमेंट', 'एसआयपी', 'प्रीमियम पेमेंट', अन्य बिल पेमेंट, शेअर ब्रोकर, 'एनपीएस', इन्शुरन्स कंपनीसाठी आधीच्या बॅंके खात्याचा तपशील दिला असेल या सर्व ठिकाणी तुमचा नवीन बॅंकेचा खात्याचा तपशील (बॅंकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक 'आयएफसी कोड' यांची त्वरित माहिती देऊन संबंधित संस्थेकडून तशी पोहोच घ्यावी. या सर्व गोष्टी ऑनलाईन देखील करू शकता. त्यामुळे बॅंकेत न जाता घरबसल्या सगळ्या गोष्टी करा. 

6) जुनी बॅंक जर नुकत्याच विलीन झालेल्या मुख्य बॅंकेच्या जवळ असेल तर तुमची बॅंक शाखा बंद होण्याची देखील शक्‍यता असते. याबाबत माहिती घेऊन लॉकर सुविधेबाबत जागरूक राहा. 

7) विलीनीकरण झालेल्या बॅंकेच्या शेअरधारकाला बॅंकेचे एकत्रीकरण करताना शेअरचा जो रेशो ठरला असेल त्या प्रमाणात मुख्य बॅंकचे शेअर मिळतील. उदा. जर आपल्याकडे विलीनीकरण झालेल्या बॅंकेचे 100 शेअर असतील आणि शेअर रेशो 'दहास एक शेअर' असा ठरला असेल तर मुख्य बॅंकचे दहा शेअर मिळतील. 

वरील सर्व बाबींची आवश्‍यक अशी माहिती घेतल्यास तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. उलट, तुम्ही एका मोठ्या बॅंकेचे ग्राहक झाले असल्याने अधिक सुविधा आणि विस्तारलेल्या नेटवर्कचा फायदा घ्या. 

एकत्रीकरण झालेल्या बॅंका 
- मुख्य बॅंक: पंजाब नॅशनल बॅंक (देशातील दुसरी मोठी बॅंक) 
विलीन झालेल्या बॅंका: ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडिया. 
------- 
मुख्य बॅंक: कॅनरा बॅंक (देशातील चौथी मोठी बॅंक), विलीन झालेली बॅंक: सिंडिकेट बॅंक 
---------- 
मुख्य बॅंक: युनियन बॅंक (देशातील पाचवी मोठी बॅंक), 
विलीन झालेल्या बॅंका: आंध्रा बॅंक आणि कार्पोरेशन बॅंक 
---------- 
मुख्य बॅंक: इंडियन बॅंक (देशातील सातवी मोठी बॅंक), 
विलीन झालेली बॅंक: अलाहाबाद बॅंक 

लेखक सर्टिफाईड फायनान्सियल प्लॅनर (सीएफपी) आहेत. 

loading image