बाजाराला तेजीचा ‘डोस’! 

भूषण गोडबोले 
Monday, 20 January 2020

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या डिसेंबर २०१९ च्या आकडेवारीनुसार देशातील किरकोळ महागाईदराने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या डिसेंबर २०१९ च्या आकडेवारीनुसार देशातील किरकोळ महागाईदराने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर २०१९ च्या तिमाही निकालानुसार, बॅंकांच्या वाढत्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटचे (थकीत कर्जांचे) आकडे स्पष्ट होऊ लागले आहेत. दुसरीकडे अमेरिकी शेअर बाजाराने तेजी दर्शविल्याने सकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सर्वोच पातळी गाठल्यानंतर सप्ताहअखेर ‘सेन्सेक्‍स’ ४१,९४५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १२,३५२ अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फार्मा कंपन्यांत तेजी अपेक्षित 
सध्या औषध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘एनएसई फार्मा इंडेक्‍स’ने नोव्हेंबर २०१९ पासून ८३२० ते ७९०९ या लिमिटेड रेंजमध्ये चढ-उतार दर्शविल्यानंतर शुक्रवारी ८३४५ अंशांवर बंद भाव देऊन आगामी कालावधीसाठी जणू भारतीय शेअर बाजाराला आणखी तेजीचे औषधच (डोस) दिले आहे. जोपर्यंत फार्मा इंडेक्‍स ८१७५ अंशांच्या वर आहे, तोपर्यंत फार्मा म्हणजेच औषध क्षेत्रातील कंपन्या आणखी तेजी दर्शविणे अपेक्षित आहे. औषध क्षेत्रातील डीव्हीज लॅब, डॉ. रेड्डीज लॅब्ज, टोरेंट फार्मा आदी कंपन्या तेजीचा कल दर्शवत आहेत. खरेदीचा व्यवहार करताना अंदाज चुकण्याचा धोका ओळखून ‘स्टॉपलॉस’ ठेवणे अत्यंत आवश्‍यक असते. 

डॉ. रेड्डीज लॅब्जकडे लक्ष 
‘डॉ. रेड्डीज लॅब्ज’च्या शेअरमध्ये शुक्रवारी ९६ रुपयांची वाढ होऊन तो ३०३४ रुपयांवर बंद भाव झाला. जोपर्यंत या शेअरचा भाव २९२० रुपयांच्या वर आहे, तोपर्यंत अल्पावधीमध्ये चढ-उतार दर्शवत तो आणखी वर जाऊ शकतो. त्यामुळे या शेअरमध्ये अल्पावधीसाठी खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल. मात्र, मागील लेखात नमूद केल्यानुसार बाजाराचा पीई-प्राईस अर्निंग रेशो २८ पेक्षा जास्त असल्याने म्हणजेच भारतीय शेअर बाजार महाग असल्याने ‘ट्रेडिंग’ करताना मर्यादितच भांडवल गुंतवणे; तसेच डॉ. रेड्डीज लॅब्ज या शेअरमध्ये ‘ट्रेड’ करताना २९२० चा ‘स्टॉपलॉस’ ठेवणे आवश्‍यक आहे. कारण अंदाज चुकल्यास ‘ना दवा काम आयेगी ना दुवा!’ 

(लेखकाने त्यांच्या अभ्यासानुसार वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan godbole article Retail inflation in the country has reached the highest level in the last five years